मै चली, मै चली देखो प्यार की गली मुझे रोके ना कोई मै चली, मै चली……. हे पडोसन मधील सायरा बानू च्या अभिनयातील गाणे असो किंवा मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची राणी गं,मीच माझ्या रुपाची राणी गं…….. ही गाणी ऐकताना आणि बघताना एक वेगळीच मस्ती धुंदी चढते ना आपल्या अंगात? कारण शब्दच असे आहेत ते आपल्या त्या वयाला अनुसरून लिहिले गेलेले आहेत. बालपण , तारुण्य आणि म्हातारपण या तीन मुख्य वयांमधील तारुण्य ह्या आशा आकांशा, भावनांच्या आवेगाने भरलेले , आकाशात उंच उंच जाणाऱ्या आणि खूप काही महत्वाकांशी कार्य करण्याच्या इच्छेने ओथंबलेले वय असते. आपण बालपणात आई-वडिलांच्या कुशीत खेळून बागडून असतो. सर्वांनी लाडाने केलेले कोडकौतुक आणि मायेच्या वर्षावात आपण वाढत असतो. बालपणातील हरकती, मस्ती, चुका सर्व जण पोटात घालतात कारण ते खट्याळ बालपण शिकवून सवरून आपल्याला हुशार बनवत असते.
शाळेतून जेव्हा आपण काॅलेजची पायरी चढतो त्यावेळी वयामध्ये होणारा बदल शरीरातील बदलांमुळे समजून येतो. अवखळ असणारी मुलगी अचानक थोडी गंभीर ,थोडी खट्याळ, चुलबुली, जास्त लाजरी आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला सांभाळणारी होते. मनाच्या कोपऱ्यात एक सुंदर कोपरा सजवू लागते. ज्यामध्ये ती तिचे एक अनोखी विश्व ती निर्माण करते. उंबरठ्यावरती मिळालेली ती एक अमूल्य देणगी असते. स्वतःच्या स्वप्नातील राजकुमाराची स्वप्ने बघते. त्याचे चित्र मनाच्या कोपर्यात लपवून ठेवते. स्वतःच्या भावना कुणाला कळणार नाही याची ती पुरेपूर काळजी घेते. स्वतःला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी प्रयत्न करत राहते. शिक्षणामध्ये उत्कृष्ट काम करून लहान वयातच मोठे नाव कमावणाऱ्या खूप व्यक्ती असतात. काहींना शिक्षणासाठी काही नवीन शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते.” Age is no bar” काय म्हटले जाते ते काही खोटे नाही. कधी साठाव्या वर्षी सुद्धा स्वतःचे राहिलेले ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे सुद्धा आहेत. वयोमानानुसार शरीराच्या कुरबुरी सुरू होतात. वयाला न जुमानता माणसे अथक परिश्रम करताना दिसतात. हाडांची होणारी झीज ,अवयवांची होणारी कुचंबणा व्यक्तीला सक्षम राहायला देत नाही. डोळ्यांची क्षमता पण कमी होते. कानाने ऐकायला येत नाही अशावेळी वृद्धापकाळाची खूप भीती वाटते. जेष्ठ नागरिकांचे वय नव्वदी पार करू लागले आहे. योग, आहाराची काटेकोर बजावणी,निसर्गाची साथ संगत ,योग्य व्यायाम आणि खूप महत्त्वाचे म्हणजे पैशाचे केलेले विचारपूर्वक नियोजन .स्वतःच्या म्हातारपणा साठी केलेली तजवीज या वयात म्हातारपण चांगल्या रीतीने जगायला मदत करते.
वय कसे भरभर निघून जाते. बाल्यावस्थेतील ऐकलेली शुभंकरोती अगदी वयाच्या नव्वदीतही आपल्या लक्षात राहते. बालपण म्हणजे मातीचा गोळा आणि आपण कुंभार असतो. त्या मातीच्या गोळ्याला व्यवस्थित आकार देऊन गरम भट्टीतून ताऊन सुखावून मजबूत करण्याचे काम आपले म्हणजे आई वडिलांचे असते वयानुसार येणारी परिपक्वता तुम्हाला, कुटुंबाला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवतो. माणसाने मनाने हिरवे राहिले पाहिजे .मनसोक्त खेळा, हसा, खा, दुसऱ्यांना सुद्धा हसवा आणि आनंदित रहा. नवीन नवीन कला शिका. छंद जोपासा. तरुण वयात नोकरीधंदा करून व्यवस्थित पैसे कमवा. पैशाचा आवक कसा वाढत राहील हे पहा. एक्सपोर्ट माणसांची मदत घेऊन नियोजन करा. कारण एका विशिष्ट वयानंतर जेव्हा आपण थकतो तेव्हा हाच पैसा आपल्या कामाला येतो. मला तर वाटते शाळेमध्ये सुद्धा पैशांचे नियोजन कसे करावे याचे शिक्षण दिले गेले पाहिजे जेणेकरून आपण सुदृढ ,श्रीमंत होऊ, दुसऱ्या समोर हात पसरावे लागणार नाही….
तुम्हाला काय वाटते? सांगा हां….
भेटूया पुढच्या लेखात …….
साधना अणवेकर