गिफ्ट्स, उपहार कोणाला आवडत नाही? सर्वांनाच भेटवस्तू विषयी उत्सुकता असते. अप्रूप असते. लहानां पासून ते मोठ्यापर्यंत या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात पण ह्याचे महत्व त्यांनाच कळते ज्यांच्याकडे ती नसते. मग ती दोन गुलाबाची फुले सुद्धा का असेना , त्याचे किती वर्णन करावे आणि देणाऱ्याचे किती कौतुक करावे हे त्यांनाच कळते ज्यांच्या जीवनात अशा गोष्टी घडतात. लहान मुलांना चॉकलेट, लॉलीपॉप, आईस्क्रीम,, खेळणी, एखाद्या सुंदर बागेची सफर, पुस्तके ,कपडे यात किती आनंद मिळतो. गिफ्ट देणाऱ्या विषयी त्यांच्या मनात एक प्रेमळ जागा बनते. आईने भरवलेला प्रेमाचा तूप भाताचा घास सुद्धा तृप्त करून जातो. बाबांनी आल्यावर प्रेमाने उचलून जरी धरले तरी मुलांचा आनंद हा वर्णन करण्या पलीकडचा असतो. आपण आपली आठवण म्हणून भेटवस्तू वाढदिवस, लग्नसमारंभात देतो. पूर्वीच्या काळी अशा भेटवस्तुनीच एक नवा संसार सुरू व्हायचा. घराला लागणारी भांडी, सामान यामुळे संसार उभा करताना मदत व्हायची. पण ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, जे पैशाने सर्वकाही विकत घेऊ शकतात त्यांना याचे महत्व कधी कळणारच नाही. छोट्या छोट्या वस्तूमध्ये जे प्रेम आणि आपुलकी लपलेली असते त्या शब्दात सांगू शकत नाही. त्यांना मोठ्याची हवा असते जसे नेकलेस, डायमंड रिंग, भरजरी महाग कपडे, गाड्या वगैरे वगैरे.
मध्यमवर्गीय माणूस आपले घर आणि कुटुंब सांभाळून जसे तसे प्रत्येक कार्याला हजर राहतो आणि फुल ना फुलाची पाकळी अशी जमेल ती भेटवस्तू बनवून देतो. आताच्या काळात भेटवस्तूची व्याख्या FD (फिक्स डिपॉझिट), Mutual fund मध्ये बदलायला लागली आहे आणि ती काळाची गरज आहे. ती अनिवार्य आहे. तरतूद करण्यासाठी सर्वांनीच अशा भेटवस्तू बद्दल विचार करायला हवा जसे रिटायर झालेल्या माणसाला पेंन्शन नसेल तर महिन्याला नाहीतर वर्षाला घर खर्चाला पैसे मिळतील अशी योजना अंमलात आणली पाहिजे जेणेकरून त्यांना दुसऱ्यांसमोर हात पसरावा लागणार नाही. लहान मुलांसाठी कन्या विकास पत्र, पोस्टाची योजना अशा योजना सर्वांना समजावून सांगायला पाहिजे. कारण कधी कधी कोणाला काही माहीतच नसते. समाज सुधारण्याचे काम हे व्हायलाच हवे. मला तरी असे वाटते? तुम्हाला काय वाटते? सांगा हां…..
भेटूया पुढच्या लेखात.
धन्यवाद
लेखिका:- सौ. साधना अणवेकर