स्वर्गीय कोकण

“गोमू माहेर ला जाते हो नाखवा , गो तीच्या घोवाला कोकण दाखवा” हे” वैशाख वणवा” पिक्चर मधील गाणे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या, मंद ,मस्त प्रेमळ, गारवा भरलेल्या या गाण्याच्या ओळी इतक्या वर्षांनी ही मनात अजून कायम कोरलेल्या आहेत. किती सुंदर आहे हे गाणे. कोकण तिकडची माणसे किती आपुलकीने भरलेली आहेत. पिकलेला फणस जसा पटकन उघडला की गरे कसे फटाफट बाहेर येतात. स्वादिष्ट ,रसाळ, चविष्ट, गोड रसाने भरलेले ,तशी ही माणसे ‘यो रे ज्येवपाक, जेवूनच वच रे’,म्हणतात प्रत्येकाला मग तो आपला असो किंवा परका. घरातील अन्न दुसऱ्यांना भरवण्यात कोकणी माणसाला परमानंद मिळत असतो. मऊसर लाल माती पावसाच्या पाण्याने जेव्हा सुगंधाने भरून जाते तो सुगंध तन मनात साठवून ठेवायला मला खूप आवडते. हिरव्यागार शेतात मोठ्या मोठ्या पसरलेल्या बागात वेगवेगळी झाडे, झुडपे ,वेली त्यावरची सुगंधीत रंगीबेरंगी फुले, बोर, चिंच, जांभळे, गऱ्यानी टम्म फुगलेला फणस, बेहोश करणारा आंब्याचा सुवास, केळ्यांनी लगडलेले केळीचे खांब, उंच उंच नारळाची झाडे, सर्व कसे आपले आहे. ती कौलारू टुमदार उबदार घरी आपली आहेत, आपल्या माणसांची आहे , हे सर्व माझे कुटुंबच आहे असे वाटते. कोकिळेचा सप्तसूर, कोंबड्यांची बांग, एक दिवस ऐकली नाही असे होतच नाही. देवळातील होणाऱ्या घंटेचा नादसवर कानात पडताच मन कसे तृप्त होते. मन निवांत देवाच्या चरणी लीन होते. सर्व चिंता, समस्या चुटकी सरशी सुटतील यावर प्रचंड विश्वास बसतो. शेतावरच्या मालकाला कांदा, भाकर ,मिरची ,पेजीची गाठोडी बांधून नेणाऱ्या अर्धांगिनी पण खूप भावतात.

नजरेत न मावणारी शेती आणि जमीन त्यात व्यवस्थित लावलेले आंबा, फणस, काजू, माड ,पेरूची झाडे कशी जीव अडकवून ठेवतात ना? झुळू झुळू वाहणारे ओहोळ, शेतीला नीट पाट दिलेले बंधारे, एकावर एक अगदी रेखीवपणे रचलेल्या लाल लाल दगडांच्या विटांचे कुंपण, गाई म्हशींचे गोठे, कोंबड्यांची खुराडे ,त्यांची चिवचिव करणारी पिल्ले, घराच्या दारात राखण करणारा कुत्रा,माज घरात पायात बुडणारी माशांची हावरट मनीमाऊ सर्व कसे उबदार आपलेच असते. आपले काम बरे आणि आपले घर बरे अशा विचारसरणीत वावरणारी, वेळोवेळी दुसऱ्यांच्या मदतीला धावणारी, मनापासून आशीर्वाद देणारी प्रेमळ माणसे, शिक्षण कमी असले तरी व्यवहारिक ज्ञान ठासून भरलेली असतात. लहान मुलांवर संस्कार करताना लाड तेव्हा लाड पण कठोर प्रसंगी कठोरताच कामी आणतात. भगुण्यात (मोठ्या मातीच्या भांड्यात) शिकणारी पेज, कच्च्या कैरीचे लोणचे, माशाचे कालवण तोंडी असेल किंवा चुलीवर भाजलेला सुका बांगडा असेल कि स्वर्गाहून सुंदरच. असे ते जेवण दोन घर जास्त जेवतो. मिठाने भरलेल्या चिनी मातीच्या जारात भरून ठेवलेल्या अख्या कैऱ्या या वर्षभर तोंडी लावायच्या कामी येतात.

प्रशस्त, मोकळी, सुंदर रेखीव काम असलेली मंदिरे आणि गाभाऱ्यातील शांत मूर्ती, तिच्या समोर पेटणाऱ्या समईच्या मंद प्रकाशात कशी भव्य दिव्य भासते. मन शांत होते .थंडगार हवा, आणि देवाबरोबरचे ध्यान मन प्रसन्न करते. यात्रा, पूजा, शिगमा, पालखी, यज्ञ होम करताना प्रत्येक स्त्री-पुरुष अगदी लीन होऊन जातो. म्हणून तर कोकणात आपले घर असावे असे वाटते. काही काहींच्या पडवीत लाकडाचा झोपाळा असतो त्याच्यावर बसलो म्हणजे स्वर्गीय आनंद मिळतो. मुंबई शहरात माणसांनाच राहायला जागा नसते तर मग झोपाळ्याचे स्वप्न ते काय बघणार? तरी काहीजण घरट्यासारख्या खोपा झोपाळा लावून आपली इच्छा पूर्ण करतात. पर्वतरांगा , त्याच्या मागून उगवणारा सूर्योदय, रात्रीचा मंद वारा, मोकळ्या माळ्यावरती शेतावरती आकाशातील चांदणे टिपत पहुडणे आपल्याला शक्य होईल का? नोकरी धंद्याच्या पाठी धावता धावता आपणास हा स्वर्गीय ठेवा अनुभवण्यास वर्षातील थोडे दिवस तरी काढायला लागतील. चला तर मग जाऊया कोकणात……. काय येताय ना ?

तुम्हाला काय वाटतं …….सांगा हां

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.