friendship

हॉस्पिटलची डॉक्टर एकदा आजारी पडली,
ड्युटीवर असताना चक्कर येऊन पडली.
धावा धाव झाली असे कसे झाले?
खाटेवर घालून सलाईन चढवले. ||1||

बाजूलाच माझ्या होती रिकामी खाट
डॉक्टर बाई झाल्या त्यावर विराजमान.
रोज रोज मग ब्लड चेकअप झाले,
अंगातले रक्त थोडे थोडे नेले. ||2||

खाताना जेवताना त्यांची मला साथ
जेवणाच्या ताटात पदार्थ नव्हती खास.
बेचव अन्नाला खायचे तरी कसे?
रोज रोज पडवळ आणि दुधीचीच भाजी घश्याखाली उतरे ||3||

मसाला सुद्धा नाही आणि मिठाई पण नाही
पाण्यासारख्या वरणा मध्ये डाळ सुद्धा नाही.
तोंडी काही लावू म्हणून लोणचे थोडे घेतले,
तर डायटीशन येऊन म्हणाली अहो हे तुम्हाला कुठून मिळाले? ||4||

तिला काय सांगू आता? मी पक्की मासेवाली कोकणी
तुमच्या शाकाहारी जेवणाने खळली नाही भरली.
एकदा चक्क सुकट करून आणले घरून
त्या दिवशी दुपारी भात घेतला मागून. ||5||

डॉक्टर बाई बिचाऱ्या होत्या पक्क्या शाकाहारी
दुधी, पडवळ्याच्या भाजीचा ध्यास त्यांच्या मनी.
औषधे ती किती टाईम टू टाईम घ्यायची,
चहा सुद्धा एवढासाच खुटाच प्यायची. ||6||

शेजारी माझ्या राहून डॉक्टर सुद्धा रमल्या,
गुजगोष्टी करता करता माझ्या सखी झाल्या.
आता चक्क मिळाला डिस्चार्ज तीला आणि मला,
अहो माझ्या जीवनाला नवीन अर्थ मिळाला. ||7||

Leave a Reply

Your email address will not be published.