जीव जन्माला आल्यापासून त्याचे अस्तित्व आणि त्याची ओळख ही एक अमूल्य देणगी देव प्रत्येकाला देतो. जन्माला आलेला जीव पुरुष आणि स्त्री किंवा नर आणि मादी ही प्रथम ओळख घेऊन येतो. आपल्या अपत्याला आपले नाव घेऊन ती घट्ट केली जाते .ओळख  किती विविध प्रकारची असू शकते “नावात काय आहे?” असे म्हणणाऱ्या व्यक्तीच त्या विशिष्ट नावासाठी धडपडत असतात. जगात तुकाराम किती तरी असतील पण संत तुकाराम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर कपाळावर गंधाचा  गोल टिळा लावलेले, हातात चिपळ्या आणि गळ्यात एकतारा घेतलेले ज्ञानी पंडित संत तुकारामांची छबी येते . आपण त्यांना लगेच ओळखतो. ही ओळख त्यांच्या  अगाध अमृततुल्य अभंगातून निर्माण झाली आहे. बहिणाबाई यांच्या ‘जात्यावरच्या ओव्या’ सर्वत्र प्रसिद्ध आहेत. एक उत्तम कवियत्री म्हणून बहिणाबाईंची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी हिंदू जनतेचा राजा,शूर पराक्रमी राजा, मोगलांच्या छाये पासून हिंदुत्वाचे रक्षण करणारा राजा अशी ओळख शिवाजी महाराजांची आहे. ह्यासाठी आपले आचार विचार चांगले ठेवले पाहिजे. मृत्यूनंतर सुद्धा आपली ओळख ठेवणारे, आपली आठवण काढणारे आपण तयार करायला हवे. परोपकार,  स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठता, हुशारी, चाणाक्षपणा यामुळे लोक आपल्याला ओळखू लागतात. त्यांच्या मनात आपली छबी निर्माण होते. चांगले वाईट अनुभवातून हृदयाच्या जवळ ही ओळख पक्की होते ती मेल्यावर सुद्धा ही पुसली जात नाही.

आपण केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्यासारखे वाटते जेव्हा एखादी व्यक्ती आपली ओळख आवर्जून दुसऱ्याला करून देते. मानाने सांगते. रतन टाटा, बिर्ला, मंगेशकर कुटुंब, आचार्य अत्रे, मंगेश पाडगावकर, पु ल देशपांडे, तसेच फिल्मी जगतातील राज कपूर, नर्गिस, गुरुदत्त, सुलोचना चव्हाण, बालगंधर्व यांच्या नावाने ते ओळखले जातात. त्यांचे कार्य अगणित आहे. पण मृत्यूनंतरही हे जिवंतच राहणार आहेत सर्वांच्या मनात. ही ओळख कधीच पुसली जाणारी नसते. लग्नानंतर मुलगी आपल्या वडिलांच्या नावा एवजी पतीचे नाव लावते  ही तिची नवीन आयुष्याची ओळख कागदोपत्री नमूद केली जाते. सर्वच बदलून जाते कां अशी ओळख बदलल्यामुळे?? याचे उत्तर हो आणि नाही दोन्ही द्यावी लागतील कारण आपले संस्कार, शिकवण, वागणूक, आचार विचार  जर पक्के असतील तर आईकड ची ओळख कधीच मिटली जात नाही. स्वतःच्या कर्तुत्वाने आणि प्रयत्नाने माहेर आणि सासर दोन्हीकडची ओळख पक्की व्हायला आणि परिपक्व व्हायला मदतच होते. हां… आता काही ठिकाणी ही ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होतो कधी आपसूकच तर कधी मुद्दाम.
माणसाने आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांसोबत ओळख वाढवत न्यायला हवी. नव्या ओळखी कराव्यात पण जुन्यांना विसरू नये. कधी कोण ,कुठे, कसा प्रसंगाला मदत म्हणून धावून येईल हे सांगता येत नाही. ओळखीच्या माणसांबद्दल एक प्रकारची आत्मीयता असते. शिशु वर्गातील झालेली ओळख अगदी म्हातारपणात सुद्धा आठवते,  कामाला येते. एक धीर वाटतो जेव्हा आपल्याला कुणी ‘मी आहे ना’ असे म्हणतात. संकट असो किंवा विरह या तीन शब्दांची जादू वेगळीच असते. कधी काळी झालेली ओळख , त्यातून वाढलेली मैत्री मग ती साधी बाजारात भाजी आणायला गेले असता अचानक भाजीवाल्या च्या ठेल्यावर झालेली ओळख असो किंवा भर पावसात छत्री नसल्यामुळे भिजत उभी असताना दिलेल्या छत्रीच्या आधाराच्या  वेळी झालेली ओळख असो. अशा ओळखींचे वलय आपल्या मनात असतेच. आज स्वयंसिद्धा या संस्थेसोबत जोडले गेले असताना खूप सार्‍या छान ओळखी झाल्या. त्यांच्या मनावर आणि माझ्या मनावर सुद्धा त्यांचे पडसाद उमटत असतात. तुम्हालापण अशा झालेल्या ओळखीं विषयी काय वाटते??….. सांगा हा भेटूया पुढच्या लेखात……..
धन्यवाद
लेखिका:– सौ -साधना अणवेकर

Leave a Reply

Your email address will not be published.