बंगला पाहायला आलेली पार्टी भलतीच खुश झाली होती. इतका मोठा बंगला स्वस्तात मिळाला म्हणून आनंद गगनात मावेनासा झाला होता. सासगेकरांनी टोकन रक्कम देऊन डिल फिक्स केली आणि श्रीयुत माने यांचे आभार मानून सासगेकर मोठ्या आनंदाने ही बातमी आपल्या कुटुंबाला देण्यासाठी गाडीत बसले. कामाच्या निमित्ताने भटकंती करणाऱ्या सासगेकरांना आपल्या कुटुंबासाठी जागा अगदी योग्य वाटली. शहरापासून जरा दुर पण निसर्गाच्या जवळ असलेला बंगला, बोरवेल चे 24 तास पाणी, आंबा ,फणस, चिकू ची झाडे आणि फुलांची सुंदर बाग असलेली ही जागा इतक्या स्वस्तात आपल्याला मिळाली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण होऊन त्यांना बंगल्यात यायला पंधरा दिवस उलटले. एका शुभमुहूर्तावर ते आपल्या पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सासू सासरे आणि आपल्या वडिलांना घेऊन राहायला आले.
बंगल्याच्या आवारात शिरतानाच ती काळी मांजर आडवी गेली पण त्याकडे दुर्लक्ष करून ते आत आले. नाही म्हणायला सासगेकरांच्या सासऱ्यांना हे काही पटले नाही. जरा निराशेनेच त्यांनी बंगल्यात पाऊल टाकले. प्रशस्त दिवाणखाना, त्याच्या एका कोपऱ्यात तबला पेटी एका मस्त दिवाणावर ठेवली होती. सुंदर नक्षीकाम असलेले झुंबर वर लटकत होते आणि खाली अफगाणिस्तानचा गालिचा लक्ष वेधून घेत होता. मोठे टिक टिक करणारे आणि प्रत्येक तासाला घंटानाद करणारे घड्याळ भिंतीवर होते. दिवाणखान्याच्या उजव्या बाजूला स्वयंपाक घर आणि वरच्या मजल्यावर चार मोठ्या खोल्या होत्या. प्रत्येकात संडास बाथरूम होते. मधल्या मोकळ्या जागेत एक मोठे रांजण ठेवले होते त्यात सुक्या फुलांचा बनवलेला सुंदर फुलगुच्छ होता. सासगेकरांच्या मुलांना आणि कुटुंबाला हा बंगला खूपच आवडला होता. सामानाची आवरा आवर करुन थकलेली मंडळी जेवणासाठी टेबलाजवळ एकत्र आली. स्वयंपाक करणाऱ्याने उत्तम जेवण बनवले होते. रात्रीचे नऊ वाजले होते. 9 चा घंटानाद सुरू झाला आणि अनपेक्षितपणे त्या घड्याळ्याच्या जवळच असलेल्या भिंतीतल्या कपाटाचे दार सुद्धा उघडझाप करू लागले. टेबलावर बसलेले सर्व जण भीतीने थरथर कापू लागले. हा काय विचित्र प्रकार म्हणून एकमेकांकडे पाहू लागले. नऊ चे ठोके संपले आणि त्याबरोबर ते दार उघड बंद होणे ही थांबले. ताटातील जेवण लवकर लवकर संपवून सासगेकरांनी बंगल्याचा केअर टेकर अप्पांना बोलवून झालेला प्रकार सांगितला. आप्पांच्या चेहऱ्यावरचा भाव हळूहळू बदलत गेलेला त्यांना दिसत होता. आप्पांनी एकदम डोळे वर नेले ,जीभ बाहेर काढून खदाखदा हसायला लागले. त्यांचे हे भयानक रुप पाहून सर्वांचे धाबे दणाणले. सर्वांनी वरच्या मजल्यावर धूम ठोकली. सर्वांच्या हृदयाचे ठोके जोराने वाजत होते जणू काही जीव आत्ताच बाहेर येणार असे त्यांना वाटू लागले होते. त्यातच ते ज्या खोलीत एकत्र आले होते त्या खोलीतील पलंगावर कोणीतरी बसलेले असल्याचा भास त्यांना झाला. पलंगावरची चादर चुरगळत होती. ऊशी इकडची तिकडे होत होती. पण कोणच दिसत नव्हते. सासगेकरांच्या पत्नीने एक मोठी किंकाळी फोडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. मुलगी पण ओक्साबोक्सी रडायला लागली. काय करावे ते सुचेना. पलंगावर च्या हालचाली आणखीनच वाढल्या होत्या आणि त्यात हसण्याच्या आवाजाने सर्वांची दातखिळी बसली होती. किती कर्कश आणि महाभयंकर हसणे होते ते……सासगेकरांनी आपल्या बायकोला उचलले आणि सर्वजण दुसर्या खोलीत आले. पाण्याचा हबका मारून तिला शुद्धीवर आणले. सासगेकरांनी लगेच मोबाईल वरून त्यांच्या मेहुण्याला आणि मित्रांना ह्या प्रकारा बद्दल सांगितले. नवीन घरातील पूजेसाठी सर्वजण येणार होते. आपल्याबरोबर हे काय होते आहे आणि आपण ही वास्तू घेऊन फसलो आहोत याची त्यांना कल्पना आली. पण संकटांना घाबरेल ते सासगेकर कसले? त्यांनी ह्या सर्व प्रकाराचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतला.
रात्रीचे बारा वाजत आले होते. आजूबाजूला वस्ती नसल्यामुळे त्या भयाण रात्रीची तीव्रता अधिक भयाण होत होती. सर्वांना एका खोलीत एकत्र रहायला सांगून सासगेकर बाहेर आले. हातातील मोबाईलच्या प्रकाशात ते चाचपडत खाली आले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आहे असे वाटू लागले. केअर टेकर आप्पा जमिनीवर बसले होते आणि त्यांची मान 360° फिरत होती. टेबलावरची सर्व जेवणाची भांडी हवेत तरंगत होती. दूरवर कुत्र्यांचे भुंकणे तेवढे चालू होते. सासगेकर उलट्या पावली परत आपल्या सर्वजण असलेल्या खोलीत आले आणि दरवाजा घट्ट बंद करून देवाचे नाव घेत राहिले. अशाच अवस्थेत सकाळ कधी झाली ते समजलेच नाही. पक्षांचा किलबिलाट आणि सूर्याच्या किरणांनी सर्वांच्या जीवात जीव आला. बंगल्यात राहायचे नाही हे सासगेकरांच्या कुटुंबांनी रात्रीच ठरवले होते पण सासगेकरांना ते मान्य नव्हते. इतके पैसे घालून घेतलेली ही प्रॉपर्टी कशी सोडून कुठे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. बंगल्यात आल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा ठेवली होती आणि त्यासाठी त्यांचे मित्र आणि मेहुणे येऊन पोहोचले. त्यांनी ही परिस्थिती ऐकून सासगेकरांना धीर दिला. पूजेची सर्व तयारी झाली पण भटजी यायला तयार होईना. या भागातील सर्वांना या बंगला विषयी माहिती असल्याचा पुरावाच होता तो…सासगेकरांनी त्यांच्या मित्राला पूजा मंत्र म्हणावयास सांगितले आणि पूजा संपन्न केली. त्या रात्री नऊ वाजायच्या आतच सर्वांनी खोलीमध्ये बंद करून घेतले होते. आप्पा कालचे आपल्याला काही माहीतच नाही अशा अवस्थेत आणि काय झाले अशा आश्चर्यचकित नजरेने सर्वांकडे पाहत होते. जेवणाचा बेत मात्र मस्त जमला होता.
घड्याळात रात्रीचे नऊचे ठोके पडायला सुरुवात झाली आणि परत कालचा संपूर्ण चित्रपट परत सुरु झाला. घड्याळ च्या बाजूचे भिंतीतील कपाट उघड झाप करून खदाखदा हसत होते. आप्पांच्या कर्कश हसण्याच्या आवाजाने सर्वांना थरथरायला झाले होते. कपाटाचा जोराजोरात उघडझाप होतानाचा आवाज आणि त्यात अप्पांचे ते भयंकर कालचे रूप आठवून सर्वांचा जीव कंठाशी आला. सासगेकरांनी सर्वांना शांत राहायला सांगितले कारण कोणतरी पायऱ्या चढत होते त्यांच्या खोलीजवळ यायला. आता मात्र सर्वांची पाचावर धारण बसली. पायर्यांवरुन चढण्याचा आवाज बंद झाला आणि त्यांच्या खोलीच्या दरवाजा खालून असलेल्या फटीतून काळा धूर आत शिरू लागला. सासगेकर वहिनी आणि मुले जरा जोरात किंचाळू लागली. काय करावे ते सुचेना. तो काळा धूर आता पूर्णपणे आत आला आणि छतावर त्याचे गोलाकार आकाराचे चित्र तयार झाले आणि गोल गोल फिरू लागले आणि बघता बघता सासगेकरांच्या मित्राच्या अंगावर कोसळले. त्यांच्या मित्राला काही समजण्याच्या आतच त्याच्या शरीराचा ताबा त्या दुष्ट काळ्या सावलीने घेतला. तो डोळे गरगर फिरवू लागला. त्याच्या हाताची बोटे अजून लांब झाली, पाय आणखीन लांब झाले. मान 360° अंशात फिरवून तो बसला एकटक भिंतीकडे पाहत. हे सर्व इतके भयानक होते कि सासगेकर वहिनी परत बेशुद्ध पडल्या.
सासगेकरांना काही समजायच्या आत त्यांचा मित्र विजेच्या वेगाने त्या खोलीतून गायब झाला. सर्व जणांची भितीने पार गाळण उडाली होती. छपरा वरती कोणीतरी जोरजोराने उड्या मारत होते . कसला भयानक आवाज होता तो… त्या भयाण रात्री जीव मुठीत घेऊन सर्वजण तसेच बसून राहिले. सकाळ झाली तसे मित्राला शोधायला सर्वजण बाहेर पडले. आजूबाजूची झाडेझुडपे, विहिरी, फुलांचे मळे, तळघरातील खोली सर्व पिंजून काढले पण त्यांच्या मित्राचा ठावठिकाणा लागला नाही. आप्पांनी येऊन सांगितले की बंगल्याच्या डावीकडे असलेल्या स्मशानभूमीच्या दारात एक माणूस पडलेला आहे. सर्वजण त्या ठिकाणी धावत गेले तर खरच सासगेकरांचा मित्र तिथे पडलेला त्यांना मिळाला. त्याला उचलून बंगल्याच्या खोलीत आणून झोपवले. तोंडावर पाणी मारताच त्याला शुद्ध आली डोळे विचित्र दिसत होते. एका विचित्र हास्याने त्याने सर्वांकडे पाहिले आणि खूप भूक लागली आहे, खायला द्या असे सांगू लागला. त्याला चिकन आवडायचे पण आज त्याने चिकनच्या पदार्थांकडे ढुंकून पाहिले नाही. मटणाच्या कलेजी वर तो तुटून पडला. सर्वजण अवाक् झाले होते. तीन किलो ची कलेजी त्याने एकट्याने संपवली होती. या सर्व प्रकाराने सासगेकरांची पत्नी आणि मुलगी घायकुतीला आल्या होत्या. वडिलांना “आपण इथून जाऊया बाबा” अशी विनंती ती जीव तोडून करत होती पण सासगेकर काही बंगला सोडायला तयार नव्हते. त्यांनी जरा जाऊन येतो असे सांगून आपल्या मुलाला बरोबर घेऊन शहरात जाऊन भूतपिशाच्च काढणाऱ्या एका मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिक बाबा घरात येताच बंगल्याची दारे धडा धडा वाजू लागली. आपल्या कमंडलू मधील पवित्र पाणी घरभर शिंपडत ते पुढे पुढे सरकू लागले. घड्याळ्याच्या जवळच्या भिंतीतल्या कपाटाकडे पोहोचताच त्यांना एक विचित्र संवेदना होऊ लागली. ते जोरात मंत्र म्हणत होते आणि आपल्या जवळील पवित्र पाणी शिंपडत होते. त्यांच्या अंगावरच्या रेशमी भगव्या वस्त्राचा वरची हनुमान चालीसा आणि कपाळावरचा अंगारा त्यांना त्या भयानक स्थिती सुद्धा घट्ट शक्ती देत होते. त्यांनी सासगेकरांना त्या कपाटाला फोडायला सांगितले. त्याप्रमाणे कुदळ, फावडा घेऊन सासगेकर आणि त्यांचे मेहुणे ते फोडायला लागले. जसे जसे ते फोडत गेले एक विचित्र वास सर्वत्र पसरू लागला आणि सर्वांना तो असह्य होऊ लागला. मांत्रिक बाबांनी कोणत्याही परिस्थितीत ते फोडणे थांबायचे नाही असे सांगितले. सांगितल्याप्रमाणे फोडता फोडता दोन सांगाडे खळखळ खाली पडले. अचानक झालेल्या प्रसंगाने सासगेकर आणि मेहुणे पार गांगारून गेले पण मांत्रिक बाबांनी सांगितले होते म्हणून ते फोडतच राहिले आणखीन काही अंतर फोडल्यावर एक भयंकर आकाराचा सांगाडा दिसू लागला. मांत्रिक बाबांनी त्या तीनही सांगाड्यांना एका मोकळ्या जागेत नेऊन अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. इतका वेळ जेवत असलेला त्यांचा मित्र भिंतीवरून सरकत सरकत त्या जागी आला. मांत्रिक बाबांनी घाई करण्यास सांगितली त्या प्रमाणे येथून तेथून लाकडे आणून चिता रचण्यात आली आणि त्या तीनही सांगाड्यांना अग्नी देण्यात आला. अग्नि देताच त्यांचा मित्र जो छपरावर पाली सारखा चिटकून बसला होता तो धपकन खाली पडला. त्याचे शरीर मोठ्यामोठ्याने उडत होते. जसा जसा अग्नि भडकत गेला तसे तसे त्याचे शरीरही शांत होऊ लागले. बाबांनी सांगितले की फार वर्षांपूर्वी एका घटस्फोटीत श्रीमंत महिलेचा तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने खुन केला होता आणि त्या भिंतीत लपवला होता त्यावर कपाट बसवले होते . पण तिला मारल्यावर दुसऱ्याच दिवशी दोघांचाही गुढ मृत्यू झाला होता. कोणाला याची खबर नव्हती. इतका सुंदर बंगला मग त्या बंगल्याचे राखणदार आप्पा सांभाळत राहिले. विकण्याचा खूप प्रयत्न केला पण दर वेळी आलेले गिराईक एक दोन दिवसातच पळून जायचे. सासगेकरांनी अशा रीतीने या गुढ बंगल्याचे रहस्य उलगडून काढले होते. मांत्रिक बाबांनी त्यांना सर्वांना एक एक मंतरलेला ताईत गळ्यात घालायला दिला. दर अमावस्येला नारळ बंगल्याच्या दरवाजाच्या जवळ फोडायला सांगितला. पूजा हवन करण्यात आले. सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. आता बंगला पूर्णपणे शुद्ध झाला असे वाटले सर्वांना हायसे वाटले. पै पाहुण्यांचे येणे जाणे सुरू झाले.
पण……… त्यांना माहीतच नव्हते की बंगल्याच्या तळघरात अजूनही कोणीतरी त्याची वाट पाहत होते……….. शु….. शु….
समाप्त
लेखिका:- साधना अणवेकर