अनुभवातून माणूस शिकतो हे वाक्य मी लहानपणापासून सर्व जाणकारांच्या तोंडातून ऐकले आहे. लहानपण याचा अर्थ कळत नव्हता पण जशी जशी मोठी होत गेले तसे या शब्दांचा अर्थ अधिक गहिरा झाला. मनाच्या कोप-यात कोरल्या प्रमाणे चिटकून बसला. खरंच आपण रोजच्या जीवनात जे अनुभव घेतो त्यातून पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी अधिक पटीने ज्ञान आपल्याला मिळते. संस्कार, शिक्षण, शिकवण, बोलणे, चालणे आचार-विचार, देवाण-घेवाण यातून खूप अनुभव मिळत जातो.“त्यांचा अनुभव याबाबतीत दांडगा आहे”, “याबाबतीत मला खूप अनुभव आहे” अशी वाक्य आपण ऐकतच असतो. या सगळ्यात मुख्य काय तर अनुभव. आपण जगताना आलेले सुखदुःखाचे प्रसंग, त्यात आपल्याला आपल्या माणसांनी दिलेली साथ किंवा दगा, जर सुखाचे प्रसंग असतील तर त्यात मिळालेल्या आनंदाचा अनुभव, दुःखाच्या प्रसंगातून मात करून बाहेर पडण्याचा अनुभव खूप काही शिकवून जातो. आपले कोण? किंवा आपण का जगतो?, आपल्याला जीवनात काय करायला हवे? ,परत वाईट प्रसंग येऊ नये म्हणून काय करावे?  याचा मार्ग आपणास मिळतो.

जेव्हा कोणी आपल्याला ” अगं दोन अनुभवाचे बोल ऐक गं, तुझ्या कामी येतील? ” असे म्हणतात तेव्हा आपण शांतपणे खरंच ते ऐकून घ्यायला हवे पण  अंतर आत्मा मध्ये असलेला  ” इगो” नावाचा राक्षस ते ऐकून घ्यायला तयार नसतो पण त्यामुळे कधी कधी आपले नुकसान होऊ शकते. अनोळख्या ठिकाणी जाताना तिथे जाउन आलेल्या व्यक्तींचे अनुभवाचे बोल खूप काही माहिती देऊन जातात. आपण पुढील वाटचालीसाठी अजून चांगल्या रीतीने योजना आखू शकतो. अनुभवाची पण किती रूपं असतात. शाळेतील पहिला दिवसाचा अनुभव, पहिल्या मातृत्वाचा अनुभव, नोकरीच्या पहिल्या दिवसाचा अनुभव आणि पहिला पगार हाती पडल्यानंतर च्या सुखात आनंदाचा अनुभव. आपल्याला किती छान वाटतं जेव्हा आपण आपले अनुभव  दुसऱ्या बरोबर  बोलतो, मन हलके होते.

आपण हल्ली किती दुःखद घटनांचा अनुभव घेतला आहे. निसर्गाचा कोप आणि त्यातून आलेले असंख्य त्रास, मानवाने स्वतःहून निर्माण केलेले करोना सारखे भयंकर रोग आणि लाखो लोकांना आपले जीव गमावण्याचा अनुभव आणि, आता परत युद्धाच्या हृदयद्रावक घटना! किती आणि काय म्हणून सहन करायचे  तेच समजत नाही . परक्या देशात शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात आलेले हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. जग सुंदर करायचे सोडून काही इर्षा असलेली मनकवडी माणसे हे जग विनाशाकडे घेऊन चालली आहेत. तुम्हाला काय वाटते? …. सांगा हां

भेटूया पुढच्या लेखात…… धन्यवाद

लेखिका:– सौ. साधना अणवेकर

Leave a Reply

Your email address will not be published.