गेल्या आठवडयात बुलढाणा जिल्हयातील लोणार येथे जाण्याचा योग आला. लोणार हे तसे जगप्रसिध्द गाव. उल्कापातामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या सरोवरामुळे संपुर्ण जगातील पर्यटकांचे लक्ष लोणारकडे लागलेले असते. आता या गावात पर्यटन विभागाने पर्यटकांना थांबण्यासाठी विश्रामगृहाची सोय केलेली आहे.
लोणार हे गाव मेहकरच्या दक्षिणेत बारा मैलावर आहे. वऱ्हाडातील सर्वात प्राचीन असे हे गाव आहे. विरज क्षेत्र असे या गावाचे पुराणात नाव आहे. विष्णुने लवणासुरावर या ठिकाणी विजय मिळविला. येथे दैत्य सुदनाचे सुंदर हेमांडपंती देवालय शिल्प आहे. ऐने-इ-अकबरीत या स्थळाचा विष्णुगया म्हणून उल्लेख आहे.
लोणारला हेमांडपंथी फार जुने देवालय आहे. महाराष्ट्रातील स्थापत्य शिल्पातले नमूने म्हणजे मध्य युगात येथे बांधले गेलेली देवालय, डोंगरातील कोरीव लेणी हे महाराष्ट्राचे खास वैशिष्टये आहे. भारतीय स्थापत्य व शिल्प शास्त्रातील सहा पध्दती पैकी नागर, वेसर आणि द्राविड या तीनच पध्दती विशेष प्रचारात होत्या.
मध्य भारतातील देवालयांच्या पायाची आखणी नक्षत्राकृती असते. देवालयांची शिखरे दक्षिण भारतातील मजलेदार गोपुरांपेक्षा अगदी वेगळया तऱ्हेने उभारलेली दिसतात. रामदेव यादवांचा प्रधान हेमाडपंत याने मध्य भारतातील पुष्कळ देवळे महाराष्ट्रात बांधली म्हणून या शिल्पपध्दतीस हेमांडपंती हे नाव प्राप्त झाले. हेमांडपंती पध्दत ही मध्य भारतातील आर्य शिल्पाचीच एक उपशाखा आहे. या बांधणीत चुना वापरीत नाही. या देवळातील शिखरांची बांधणी विशिष्ट प्रकारची असते.
महाराष्ट्रात यादवकालीन हेमांडपंती देवळे ठाणे जिल्हयात अंबरनाथ, पुणे जिल्हयात पुर, बेल्हे. पश्चिम खानदेशात एरंडोल, संगमेश्वर, घरखेड, चांगदेव, वाघली, पाटण. पूर्व खानदेशात झोडगे, देवलण, चांदोर, अंजनेरी, सिन्नर, त्रिंगणवाडी. अहमदनगर जिल्हयात कोकमठाण, अकोले, टाकरी, पेडगाव, कर्जत, श्रीगोंदे, मांडगाव, रत्नवाडी. सातारा जिल्हयात सिंघणपूर, खटाव. सोलापूर जिल्हयात माळसिरस, वेळापूर, पंढरपूर. बार्शीटाकळी, सानगाव, साकेगाव, मेहकर, शिरपूर, लोणार व औंध वऱ्हाड येथे आहेत.
हेमांडपंती मंदिराची रचना चुन्याच्या किंवा कसल्याही सहाय्यावाचून केवळ एकावर एक दगड ठेवून केली जाते. दुसऱ्या कोणत्याही पध्दतीपेक्षा अगदी वेगळी असलेली या मंदिराच्या शिखराची घडण हे प्रमुख हेमांडपंती वैशिष्टये आहे.
देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल नेमकी त्याच प्रकारची अगदी लहान आकृति शिखरावरील आमलकाची बैठकी बनते. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशव्दाराची व्यवस्था केलेल्या या इमारतीच्या पायाची आखणीच अनेक कोनबध्द अशी केली जाते. त्या पायावर उभारलेल्या भिंतीनी जे कोन बनतात. त्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून निघून थेट कळसापर्यंत उभ्या गेलेल्या दिसतात. आणि त्या शिखराच्याच छोटया छोटया प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसविल्यामुळे ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते. शिखराच्या सर्व प्रतिकृति जागच्या जागी मजबूत राहव्यात म्हणून उपयोगात आणलेल्या मधल्या दगडावर नक्षीकाम केल्या कारणाने शिखराला चांगला उठाव मिळतो.
मंदिराच्या कोनाकृति भिंती पायापासून वरपर्यंत चढत गेल्यामुळे त्या अगोदरच उठून दिसतात. आणि छायाप्रकाराच्या परिणामामुळे त्यांच्या भरीवपणाला अधिक उठाव मिळतो. तळापासून कळसापर्यंत गेलेल्या भितीकोनाच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळया थरांच्या आडवटींनी कमी झाल्यासारखा वाटतो. या थरामध्ये विविध प्रकार व आकार आहेत. त्यात अश्वथर, गजथर, पुरुषथर कणि हे प्रकार प्रामुख्याने वापरले आहेत. दोन मोठया थरांच्या मध्यभागी योजना झालेल्या कणीच्या दगडाचा आकार दुधारी सुरीच्या पत्याचा आडवा छेद घेतल्या सारखा दिसतो.
हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.
अनिल ठाकरे