साधना
स्त्री देवाने बनवलेली एक अप्रतिम, मजबूत, संवेदनशील, स्वाभिमानी कलाकृती. देवाच्या हातातून घडलेली ही मूर्ती अतिशय मोहक, नाजूक हळवी ममत्वाने भरलेली असते. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत फक्त दुसऱ्यांच्या च्या सेवेसाठी तत्पर असते. “बेटी धनाची पेटी” अशी  म्हण आहे. मुलीच्या रूपाने लक्ष्मी देवी , सरस्वती देवी, काली माता देवी घरात जन्म घेतात. बालपणी तिच्या बोबड्या बोलांनी आणि   पैजण घातलेल्या पावलांनी घर कसे आनंदाने भरून जाते. आईच्या पदराखालून अमृत प्यालेला जीवाला आईची माया काय असते आणि मातृत्व म्हणजे काय? याचे प्रशिक्षण बालपणापासूनच मिळत असते. स्वयंपाक घरात सतत काही ना काही करत आईच्या मागे पुढे घुटमळत असते.  वडिलांची ती परी असते. सर्वच बाबांची असते असे नाही पण ज्यांना मुलींचे महत्त्व आणि प्रेम खरंच माहीत असते त्यांना आपली मुलगी क्षणाक्षणाला मोठी होताना पाहण्याचे सुख काय आहे हे उमगते. मुला मुलींना समान वागणूक देणाऱ्या लोकांमध्ये अजून खूप तफावत आहे . मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवल्यानंतर जो संतोष प्राप्त होतो तो शब्दात सांगता येत नाही.
आत्मनिर्भरता आणि सहनशीलता याविषयी स्त्रीला शिकवावे लागत नाही. तिच्या अंतरंगात भिनलेले असते. स्वतःच्या लहानपणी बाहुला-बाहुलीचे लग्न लावताना सुद्धा  मोठ्या जाणकार बाईसारखे वर्तन असते तिचे. स्त्री मुळातच सुंदर नाजूक तिला नटण्यामुरडण्याचा आशीर्वाद देवाने दिलेलाच आहे. सुंदर लांबसडक केस ,पाणीदार डोळे, कमनीय बांधा ,सुरेखा काया, मनमोहक वर्तन यामुळे तिची छबी सर्वांवर नेहमीच पडते. पारंपरिक वेशभूषा केलेली तरुणी, पाश्चिमात्य वेशभूषेतील तरुणी त्या त्या प्रमाणे आपले व्यक्तिमत्व खुलवत असते. शिक्षण घेऊन प्रगल्भ झालेली आणि शिक्षणाचा सारखा दागिना घातलेली स्त्री सर्वांग सुंदर दिसते.  स्वतः शिकते आणि आपल्या कुटुंबाला सक्षम, शिक्षित बनवते. आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन जीवनाच्या ह्या धर्मयुद्धात खंबीर, चतुर, कर्तव्यशील असा योद्धा बनवण्याचे सारे श्रेय स्त्रीला जाते. क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणूनच स्त्रीचे वर्णन करता येईल.
आपल्या संसाराचे दोर घट्ट विणत असताना स्वतःमध्ये होणारे बदल ती हसत हसत स्वीकारते. बाल संगोपनासाठी स्वतःच्या शारीरिक बदलांना झेलणारी ती त्याबदल्यात फक्त प्रेम ,जिव्हाळा, ममत्व, आत्मीयता, आधार मागत असते. विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती धडपडते, आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणतेही धारिष्ट करायला ती मागेपुढे बघत नाही. सामाजिक बांधिलकी असलेल्या स्त्रीमध्ये स्वतःचे रक्षण करण्याची शक्ती कालीमातेच्या रूपाने उतरलेली असते. घर आणि घराचे नियोजन, कौटुंबिक जडण-घडण, नैतिक जबाबदारी ती स्वताहून अंगीकारते कारण देवाने तिला या जगाचा उत्कर्ष करण्यासाठीच निर्मिली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाहुणचार करताना एक नवीन विश्व ती निर्माण करत असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला घासून-पुसून चमकदार, दिमाखदार ,उत्कृष्ट बनवण्यासाठी ती खूप मेहनत करते. कल्पना चावला, अरुंधती रॉय, सई परांजपे, इंदिरा गांधी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे. किती वैभव भरलेले आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात.
आजकालच्या पिढीतील स्त्री खरे म्हणजे ऑक्टोपस सारखे काम करत असते. घर नोकरी सांभाळून ती देशाला, आपल्या कुटुंबाला आधार देते. व्यवसायात उतरलेल्या विविध स्त्रियांची तर” बातच कुछ और होती है”. आपल्यातील सुप्त गुणांना वाव देत त्या स्वप्नांना आकाशात उंच भरारी घेण्यात त्यांचा मौलिक भार असतो. एकट्या उद्योगाला सुरुवात करत मग हजारो स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यास त्या समर्थ असतात. जिद्द, कसोशीने काम करणे, अखंड मेहनत आणि तपश्चर्या, अंतरंगातील दुःख बाहेर न दाखवता सतत प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांची खरी व्यथा त्या एका देवालाच माहित आहे, तुम्ही पण जाणता का त्या व्यथा?? सांगा……
भेटू परत पुढच्या सत्रात…
धन्यवाद
लेखिका –साधना अणवेकर
दिनांक:-4/12/2021

Leave a Reply

Your email address will not be published.