माझी मुलगी एसवायबीएला आहे. प्रथम तिला सायकोलॉजीमध्ये करिअर करण्याची इच्छा होती, पण आता तिचा कल सोशिओलॉजीकडे झुकत आहे. सायकोलॉजीमधील काही विषयात तिला तितकासा रस वाटत नसल्याचं ती सांगत आहे. माझ्या माहितीनुसार सायकोलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी बऱ्यापैकी संधी आहेत, पण सोशिओलॉजीला कितपत संधी आहेत याची मला माहिती नाही. सोशिओलॉजीमध्ये बीए केल्यावर नोकरीच्या काय संधी आहेत, याची माहिती द्या. या विषयात ग्रॅज्युएशन केल्यावर तिला पुढे काय करता येईल, याबद्दल मार्गदर्शन करा. पुढे करण्यासारखे आणखी काही कोर्सेस आहेत का? हे कोर्सेस उपलब्ध असणारी चांगली कॉलेजेस कोणती? आमचा थोडा गोंधळ उडाला आहे, त्यामुळे कृपया योग्य ते मार्गदर्शन करा.
सोशिओलॉजीमध्ये बीए केल्यावर पुढे शिक्षण आणि नोकरी असे इतर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसारखेच पर्याय खुले आहेत. सोशिओलॉजी, मास मीडिया, लॉ, एज्युकेशन, मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी यासारख्या क्षेत्रातील कोर्सेस करण्याचा पर्याय तुमच्या मुलीकडे आहे. त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र सेवा आयोग किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याबाबतही ती विचार करू शकते. सोशिओलॉजीमध्ये एमए केल्यावर कायद्याशी संबंधित पोलीस, सार्वजनिक कल्याण, कौशल्य विकास कार्यक्रम, आदिवासी कल्याणकारी योजना, ग्रामविकास योजना, आरोग्य कल्याणकारी कार्यक्रम आदी खात्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना बँका, शैक्षणिक क्षेत्र, संशोधन संस्था आदी ठिकाणीही नोकरीच्या संधी मिळू शकतात. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये सोशिओलॉजीमध्ये एमए हा कोर्स उपलब्ध आहे. तुमची मुलगी यापैकी तिच्या पसंतीचा एक पर्याय निवडू शकते.
मी बारावीची परीक्षा दिली आहे. आयटी मॅथ्स, इको आणि बुक किपिंग हे माझे मुख्य विषय होते. मला चित्रकलेची आणि कम्प्युटरवर काम करायला खूप आवडतं. माझ्या पदवीनंतर मला एमबीए इन फायनान्स डिप्लोमा करायचा आहे. तरी आपण मला माझी वरील निवड योग्य आहे का किंवा अजून दुसरे काही पर्याय आहेत का ते सांगावं?
प्रियांका तावडे
तुला कोर्स निवडी संदर्भात आत्मविश्वास असेल तर ते उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्वतयारी करायला हरकत नाही. आपली निवड योग्य का अयोग्य ते आपल्या अंतरबाह्य घटकावर अवलंबून असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, आपली निवड ही आपल्या सामर्थ्य आणि कमकुवतपणा यावर आधारित असेल. तुझी क्षमता, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व याबद्दल माहिती नसल्यानं मी याबाबत अचूक मार्गदर्शन करू शकत नाही.
मी सिंधुदुर्गमधून या वर्षी बारावी सायन्स (पीसीएमबी) ची परीक्षा दिली आहे आणि सीइटी (CET) आणि नीट (NEET) साठी फॉर्म भरला आहे. दहावीत मला ९८ टक्के गुण होते. बारावी नंतर करिअरचे कोणकोणते पर्याय आहेत त्याबद्दल मला माहिती हवी आहे. मी शेतकरी कुटुंबातील आहे. इंजिनीअरिंग आणि मेडिकल व्यतिरीक्त अन्य पर्यायांबद्दलही सांगा.
प्रसाद राणे
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राव्यतिरिक्त आपल्याला लाइफ सायन्स, अॅग्रीकल्चर यासारख्या क्षेत्रामध्ये पुढे अभ्यास करण्याचा पर्याय आहे. सायन्स क्षेत्रा व्यतिरिक्त कॉमर्स, ह्युमॅनिटीज, व्यवस्थापन, मीडियासारखे अनेक पर्याय आहेत. सध्या आयटी आणि कम्प्युटरचा विस्तार वाढत आहे. जोपर्यंत या क्षेत्रात सतत स्वतःला अपडेट कराल तसतसे आपल्या श्रेणीमध्ये वाढ होण्यास मदत होते
मी या वर्षी दहावी दिली आहे, मला आर्किटेक्टमध्ये डिप्लोमा करायला आवडेल. त्याबद्दल मला मार्गदर्शन करावं?
धनश्री खोंडे
महाराष्ट्रामध्ये दहावीनंतर एखद्याला तीन वर्षाच्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेता येऊ शकते. ही प्रकिया ऑनलाइन पद्धतीने असून या बाबतची अधिक माहिती MSBTE च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
मी सध्या बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. मला बीएससी झूओलॉजी केल्यावर नोकरीसाठी पुढे कोणते पर्याय आहेत याबद्दल माहिती हवी आहे.
राजेश शेलार
झूओलॉजीमध्ये बीएससी केल्यावर तुम्हाला प्राणीसंग्रहालयं, मत्स्यालयं आणि पशुवैद्यकीय रुग्णालयं आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. याशिवाय तुम्ही इंडियन फॉरेस्ट्स सर्व्हिसेसचीही तयारी करू शकता
Source : Maharashtra Times (Link)

Leave a Reply

Your email address will not be published.