आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे ५० टक्के स्त्रिया आहेत. पुरुषांच्या बरोबरीने असणारी ही संख्या आहे. सुमारे ८० ते ८५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. या सर्वच स्त्रियांची जगण्याची आणि अस्तित्वाची लढाई, संघर्ष चालू असताना दिसतो आणि दुसऱ्या बाजूला शहरी मुलांमध्ये व मुलींमध्ये शिक्षणानं नेमकं काय साध्य केलं असा विचार केला तर हाती काहीच लागत नाही की काय, अशी शंका यावी इतकी वाईट अवस्था आहे.
बाह्य अवस्था बघितली तर भाषा, पोशाख, त्यांचं हॉटेलिंग, गाड्या हे सर्व डोळे दिपवून टाकणारे श्रीमंती राहणीमान आहे; पण त्यांचा वैचारिक प्रवास बघितला तर निराश व्हायला होतं. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर महिला दक्षता समितीत लग्नाला दीड वर्ष झालेली आयटी क्षेत्रातील दोघं घटस्फोट हवा म्हणून येऊन समोर बसली.
घटस्फोट घ्या; पण कारणं काय आहेत याची चाचपणी केली तर मुलगा म्हणाला, ‘गेल्या दीड वर्षात माझ्या बायकोनं माझे एकदाही कपडे धुतले नाहीत; मग हिचा काय उपयोग बायको म्हणून? तिचं जे कर्तव्य आहे ते जर ती करीत नसेल तर हिच्याबरोबर राहण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही.’
दोघेही शिकलेले आहेत; पण पुरुषसत्ताक मानसिकतेमध्ये वाढलेला हा मुलगा माणूसपणाचा विचार करू शकत नाही, हे खूप मोठे दुर्दैव आहे. ती इंजिनिअर असली तरी तिने घरातील आणि बाहेरच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या पाहिजेतच, अशी तरुणांची अपेक्षा असते.
अशा बऱ्याच केसेस आपल्या अवतीभवती घडत आहेत. त्याचं एक मुख्य कारण असं आहे की, मुलांचा ‘विवाह अभ्यास’ होतच नाही. विवाह हा अभ्यास करण्याचा विषय आहे, असं कुणालाही वाटत नाही. आपल्याला शिक्षण मिळालं म्हणजे आपण शहाणे झालो; पण आपला विवेक जागृत झाला का? तर नाही!
कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अनेक महाविद्यालयांमध्ये जाते. अभ्यासाव्यतिरिक्त मुलं इतर अवांतर वाचन काय करतात, असं विचारलं तर १०० मुलांमध्ये एक-दोन मुलांचे हात वर येतात. वाचनाने माणूस समृद्ध होतो म्हणतात व तरुण वयात ही मुलं वाचत नसली तर यांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारची समृद्धी येणार, हा एक मोठा प्रश्नच आहे. अनेक तरुण मुलीही तशाच बघितल्या.
एक पालक सांगत होते, मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी सात-आठ लाख रुपये घातले आहेत. आता तिने लग्न साधेपणानं करावं अशी माझी खूप इच्छा आहे; पण मुलगी इतकी हट्टाला पेटली होती की, तिच्या कॉलनीमध्ये असलेला साधा हॉल लग्नासाठी नको म्हणाली. तिला अतिशय महागडा हॉल हवा होता.
वडिलांनी मुलीपुढे हात टेकले होते आणि भरपूर कर्ज काढून त्यांनी मुलीचं लग्न करून दिलं. वडिलांनी खूप काटकसर करून आपल्याला शिकवलं हे तिच्या गावीदेखील नव्हतं. शिक्षणाने या जाणिवा निर्माण होत नाहीत; मग शिक्षणाचा काय उपयोग?
आम्हांला महिला दक्षता समितीमध्ये वरचेवर आढळून येणारी गोष्ट म्हणजे मोबाईलमुळे संसारात होणारा अडथळा. मुलगी लग्न होऊन सासरी जाते; पण तिथे घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती तिला आपल्या आईला सांगायची असते आणि दिवसातून तिला अनेक वेळा फोन करायचे असतात.
यामुळे होतं काय, की मुलींना काय-काय तिथं करायचं आणि काय करू नये याचे मोफत सल्ले आया देत राहतात आणि त्यांच्या संसारांमध्ये विनाकारण लुडबुड करतात. तिने भाजी कुठली केली, भांडी कुणी घासली, सासूने काय काय कामं केली इथपर्यंतच्या सगळ्या बातम्या आईला सांगायच्या असतात.
काय कारण आहे एवढ्या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याची? पण हे आज आपल्याभोवती खूप होताना दिसते. त्यामुळे नवरा-बायकोच्या मधली भांडणं वाढलेली आहेत. आपल्या मुलीशी सतत संपर्क ठेवण्यासाठी अनेक मुलींना त्यांचे आई-वडील मोबाईल घेऊन देतात. त्यामुळे आमच्या महिला दक्षता समितीमध्ये जेव्हा तडजोड केली जाते, तेव्हा मुलाकडचे लोक अशी अट घालतात की, तिच्या आई-वडिलांनी आमच्या घरी यायचं नाही बघा!
आम्ही म्हणेल तसं सुनेनं वागलं पाहिजे ही मुलांकडील लोकांची अट आणि दुसऱ्या बाजूला ‘आम्ही काय आमची मुलगी यांना विकलेली नाही’ असं मुलीच्या आईवडिलांचं म्हणणं. ह्या दोन्ही गोष्टी फारच टोकाच्या आहेत. म्हणून पुन्हा आपल्या विचारांची दिशा नेमकी काय, याचा विचार मनात सारखा येत राहतो.
कोल्हापूर जिल्हा हा सधन. येथे दुधाचा पैसा भरपूर, उसाचा पैसा भरपूर, टेक्नॉलॉजी हाताशी आहे. या सगळ्यांचा फायदा पुरुषसत्ताक मानसिकता घेत असताना आपल्याला दिसते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेली स्त्री-भ्रूणहत्या! हजारो मुली वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या इथे मारल्या जात आहेत, याचं कोणालाही सोयरसुतक नाही.
या सर्व महिला मुलगा झाला तरच आपला संसार टिकणार या मानसिकतेमध्ये दवाखान्यांमध्ये दाखल होतात आणि स्त्री-भ्रूणहत्या होते असं निदर्शनास येतं. कोल्हापूरच्या परिसरामध्ये महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन तर अतिशय पारंपरिक आणि पुरुषसत्ताक मानसिकतेने भरलेला आहे.
याचे कोल्हापुरातील एक उदाहरण देते. अतिशय नामांकित असे हे वकील आहेत. त्यांच्या बहिणीला नवऱ्याकडून आणि सासरच्या लोकांकडून त्रास होत होता म्हणून ती भावाकडे हे सगळं सांगायला गेली. भाऊ म्हणाला, ‘तुला त्या घरात आम्ही दिलेली आहे. उंबऱ्याच्या आतच मरायचं. तू मेलीस की आम्ही सगळे स्मशानात येणार तुला अग्नी द्यायला.’
ज्यांचा पाठिंबा मिळणं मुलीला गरजेचं असतं, त्याच घरातून अशा प्रकारची उत्तरं येतात हे दुर्दैव आहे आणि आमच्या शब्दाच्या बाहेर मुलगी नाही किंवा सून नाही असा टेंभा मिरविणारे लोकही आपल्या आजूबाजूला खूप दिसतात. मग या सगळ्यांचा त्रास होणाऱ्या बायका आपल्या मुलांना मोठं करण्यात आपलं आयुष्य व्यतीत करतात. कितीही त्रास होत असला तरी त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे घर सोडू शकत नाहीत.
अशा कुचंबणा होणाऱ्या महिलांची संख्या आपल्या समाजामध्ये फार मोठी आहे. मुलं मोठी होऊन नोकऱ्या करायला लागली की त्यांची स्वप्नं पुरी झाल्यासारखं त्यांना वाटतं. स्वत:च्या इच्छा, आकांक्षा, सुख, आनंद या सगळ्यांवर त्यांनी पाणी सोडलेले असतं. आपल्या भावनांचा विचार करण्याऐवजी इतरांच्या भावनांचा विचार करीत या आपलं आयुष्य जगत राहतात. घटस्फोट घेऊन वेगळं राहण्याचा विचार त्या करू शकत नाहीत; कारण एकट्या राहणाऱ्या बाईवर पुन्हा वाईट नजरेचे लोक लक्ष ठेवतील, अशी भीती त्यांच्या मनामध्ये असते.
आज ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे. या निमित्ताने या सर्वच मानसिकतेकडे आपण गांभीर्याने बघून विचार करणं गरजेचं आहे. यासाठी सबल आणि सक्षम माणूस बनणं महत्त्वाचं आहे. आज आपली गरज आहे ती अशी की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण विवेकी बनूया. आज महिला दिनाचे अनेक कार्यक्रम होताना दिसतात; पण त्यामध्ये विवेकजागृतीचे कार्यक्रम फारच कमी असतात.
आपण पुन्हा रूढी-परंपरा, अंधश्रद्धा यांच्या अवतीभवतीच फिरताना दिसतो. निसर्गाने बाईलाही पुरुषांइतकीच बुद्धी दिलेली आहे, हे विसरू नये. तिचा विकास होण्याच्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली विचार प्रक्रिया चालू झाल्याशिवाय आपलं भलं होणार नाही हे सर्व स्त्रियांनी लक्षात घेतले पाहिजे.
स्त्रियांनी आपला विवेक जागृत करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. आपण शहाण्या झालो; पण विचारी झालो का? हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सर्वजणी विचारी माणूस बनू या. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने जो विचार माझ्या डोक्यामध्ये सतत घोंघावत असतो तो मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले यांच्या डोक्यात असलेली आत्मभान जागृत झालेली स्त्रीप्रतिमा तयार करण्यासाठी आपण सर्वजणी झटू या.
तनुजा शिपूरकर
(कोल्हापुरातील नव्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्या व महिला दक्षता समितीच्या सदस्या आहेत.)

Source : Lokmat (Link)

Leave a Reply

Your email address will not be published.