प्रसूतीगृहा तील बाळंतिणीचे विव्हळणे आपल्याला कष्टदायी होते. एका नव्या अंकुराला नऊमास उदरामध्ये वाढवून या जगात आणताना त्या मातेला भयंकर प्रसव कळा आणि कष्टदायी यातना सोसाव्या लागतात पण त्या कोवळ्या जिवाचा एक रडण्याचा आवाज तिचे सर्व दुःख आणि यातना संपवून जातो. हेच ते देवाचे देणे जे प्रत्येकाच्या नशिबात नसते. दयाळू  देवाच्या कृपेचा  हा प्रसाद आपण प्रेमाने वाढवतो पण जगात किती किडेमकोडे ,दुष्ट वृत्ती  मोकाट फिरत असतात. वासनेने भरलेले निर्लज्ज आणि अमानुष असे तोंडाने भोळे दिसणारे पण पाषाण हृदयाची माणसे आपल्या आजूबाजूला असतात. आपण त्यांची पारख करण्यात कमी पडतो किंवा त्यांना ओळखताच येत नाही.

पूर्वीचा काळ खूप आनंदाचा, भरवशाचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा होता असे आता वाटू लागले आहे. एकत्र कुटुंबात वडीलधारी माणसे कमावण्यासाठी कष्ट करायची. सर्व स्त्रिया घरदार, मुलं-बाळं, नोकरचाकर, पाहुण्यांची ऊठबस आणि घराचे गृह कौशल्य व्यवस्थित सांभाळण्याच्या. काळ बदलत गेला. आठ आणे आणि एक रुपया ची मान आणि शान गेली. महाभयंकर बेरोजगारी आणि महागाईने तोंड वर केले. स्त्रिला घराची चौकट ओलांडून पै पैशासाठी झगडावे लागले. मुलाबाळांची तगमग तिला डोळ्याने दिसते पण अर्थांजनासाठी काम करणे महत्त्वाचे ठरले. रात्री-अपरात्री सुद्धा जरा बाहेर जावे लागू लागले. एक स्त्री म्हणून तिचा अनमोल खजिना म्हणजे तीचे स्त्रीत्व. प्राणापलिकडे जपलेला हा ठेवा या जगात वावरताना असंख्य गिधाडांपासून वाचवावा लागतो. जपून ठेवावा लागतो. आपल्या सोबत असणाऱ्या नेहमीच्या लोकांपासून सुद्धा सांभाळावे लागते. स्त्रियांना लहानपणापासूनच स्वरक्षणाचे धडे देणे हे अत्यंत गरजेचे आहे. शाळेत जशी रोज प्रार्थना म्हटली जाते तसेच हे स्वरक्षणाचे  धडे त्यांना मिळाले पाहिजे असे मला वाटते. नृत्य, गायन, शिवणकामात रंगलेली मुलगी जेव्हा झाशीवाली लक्ष्मीबाई होईल तेव्हाच स्त्रीजातीला एक नवीन झळाळी येईल. मातृभाषे बरोबर मुलींना स्वावलंबन, स्वयं रोजगार आणि स्वरक्षण या तीन मूलभूत अति आवश्यक  शिक्षणाची गरज आहे. ही काळाची गरज आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते ? सांगा हां…..

भेटूया पुढच्या लेखात…….. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.