महिला बचत गटा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबी निर्मुलनासाठी, राज्यांनी विशेष पाऊले उचलण्याचे धोरण आखावे, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आदर्श गावांमध्ये महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पाऊल उचलले आहे. त्यांचा पहिला प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालदुगी ग्रामपंचायतीने यशस्वी करून दाखविला आहे. ग्रामपंचायतीतील महिला बचत गटांनी एकत्र येऊन, मालदुगी नॅचरल हनी प्रोसेसिंग युनिट स्थापन करून, गावातच उदरनिर्वाहाचे शाश्वत स्वरुपातील साधन शोधले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनमार्फत राज्यातील एक हजार गावे आदर्श गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. या आदर्श गावांमध्ये सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी महिला बचत गटांची स्थापना हा महिलांच्या सक्षमीकरणाच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे केवळ बचत करणे व कर्ज वाटणे, एवढ्यावर मर्यादित न राहता संघटित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारून स्वत:चाच नव्हे तर जिल्ह्यालासुध्दा नामलौकिक मिळवून दिला आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहूल जिल्ह्यातील मालदुगी गावातील महिला बचत गटांनी जंगलातील मध या गौण वन उपज संकलन प्रक्रिया आधारित व्यवसाय गावात उभारुन यशस्वी उद्योग सुरू केला आहे. मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट असलेल्या मालदुगी गावामध्ये जंगलातील कच्चा मध गोळा करून, त्यावर आधारित मालदुगी नॅचरल हनी प्रोसेसिंग युनिट उभारले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालदुगी हे एक हजार लोकवस्तीचे गाव. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात पहिल्या टप्प्यात आदर्श ग्राम म्हणून विकसित करण्यासाठी या गावाची निवड झाली. अभियानामार्फत श्याम वावरे यांची या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम परिवर्तक म्हणून निवड झाली. गाव आदर्श करताना, गावामध्ये मुलभुत सोई सुविधा निर्माण करण्यासोबत गावातील गरीब कुटुंबातील महिलांना बचत गटाशी जोडून त्यांना गावातच उदरनिर्वाहाचे शाश्वत स्वरूपातील साधने उपलब्ध करून देण्याविषयी ग्राम परिवर्तकाने चर्चा केली. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, गाव विकास आराखड्यात लोक सहभागातून विकास कामांचा समावेश केला. त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणण्यात आला.
सदर गाव विकास कृती आराखड्यात महिला बचत गटाला उदरनिर्वाहाचे साधने उपलब्ध करून देण्यासाठी दोन लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार,जंगलातील मध या गौण वन उपज संकलनावर आधारित प्रक्रिया उद्योग करण्यावर एकमत झाले आणि बचत गटातील महिलांची क्षमता बांधणी करण्यात आली. त्यासाठी उमेद अभियानातून महिलांना व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण देऊन त्यांचे संघटन करण्यात आले. त्यांचा अभ्यास दौरा काढण्यात आला. मध खरेदीसाठी कुरखेडा व कोरची तालुक्यातील गावांची पाहणी केली. या परिसरातील जंगलांमध्ये कच्च्या स्वरूपाचे मध मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतू त्यावर प्रक्रिया केल्यास उत्पादनाची किंमत वाढून चांगला नफा मिळू शकतो, ही बाब महिलांच्या लक्ष्यात आणूण देण्यात आली.
सद्यस्थितीत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत मालदुगी येथे १४ महिला बचत गट स्थापन झाले असून, त्यामध्ये १३६ महिला सहभागी आहेत. या महिलांनी परिसरातील गावातून एक हजार किलो कच्चे मध गोळा केले. उडान महिला संघाने कच्च्या मधाची खरेदी करून, त्यावर प्रक्रिया केली. त्याची पॅकेजिंग करून ते बाजारात विक्रीसाठी आणले. हे काम गटातील २० महिलांनी केले. त्यांना प्रती दिवस १५० रुपये याप्रमाणे महिन्याला ४ हजार ५०० रुपये मजूरी मिळत आहे. या व्यवसायात १ लाख ७१ हजार रूपयांची गुंतवणूक झाली असून, प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून २ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे उत्पादन तयार आहे. त्यातून खर्च वजा जाता निव्वळ १ लाख १५ हजार रुपये नफा मिळण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत नागपूर व इतर राज्यातील खासगी व्यावसायिकांना हा माल विक्री करण्याचे धोरण या गावाने आखले आहे.
ग्राम परिवर्तकाच्या पुढाकाराने महिला बचत गटाला मिळाला रोजगार
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील २९ गावातील ग्राम परिवर्तकांना महिला स्वयंसहाय्यता गटाच्या बांधणी व रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण दिले गेले. आदर्श ग्राम करताना, त्या गावातील गरीब कुटुंबांतील महिलांना बचत गटाशी जोडून त्यांना गावातच उदनिर्वाहाची साधने उपलब्ध करून देणे व त्यातून कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हे ध्येय ठेवण्यात आले. त्यानुसार मालदुगी ग्रामपंचायतीचे ग्राम परिवर्तक श्याम वावरे यांनी, गाव व परिसरातील उपलब्ध संसाधनांचा अभ्यास करून गावातील महिलांना गावातच शाश्वत स्वरुपाचा प्रक्रिया उद्योग सुरू करून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.