स्त्री-स्वातंत्र्य

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आपला भारत यशाच्या पायऱ्या चढत चढत राहिला पण फाळणीची रक्तबंबाळ जखम भरून यायला मागत नाही. स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम. महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून अहिंसेचा मार्ग अवलंबून कार्यरत असणाऱ्या कस्तुरबा गांधीं बरोबर हजारो स्त्रियांनी आपले तन मन ओतले होते. झाशीच्या राणीने आपल्याला झाशी ला वाचवायला जेव्हा प्राणांची पण पर्वा केली नव्हती त्यावेळी सुद्धा सर्व स्त्री योद्धा कशा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. स्त्रिया सर्व स्तरावर उत्तम काम करतात. त्यांच्या अंगात जन्मतः देवाने जे सामर्थ्य भरवून ठेवले आहे त्याला तोड नाही. नवऱ्याच्या मागे सती जाण्याच्या प्रथांना बंदी घातल्यानंतर आनंद झाला होता आणि त्यांचे जीवन बदलून गेले होते. त्याचप्रमाणे आताच्या तीन तलाक बंदीमुळे सुद्धा स्त्रियांना आत्मनिर्भरतेने जगण्याची दिशा मिळाली. हे स्वातंत्र्य किती मौल्यवान असते. या जगात जन्म घेण्याची सुद्धा जिथे परवानगी लागते त्या जगात स्त्रीला जन्मानंतर किती कष्टदायी जीवनाला सामोरे जावे लागते. प्रत्येक गोष्टी साठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्यासारखे दुसरे अपमानास्पद जीणे दुसरे नाही. आज स्त्रिया शिकून अर्थार्जन करतात पण त्यातही दुजाभाव केला जातोच ना? आपल्यापेक्षा एक स्त्री कर्तुत्ववान निघाली आणि तिची वाहवा होत असेल तर कौटुंबिक कलह सुद्धा होतात आणि त्याचे सर्व त्रास घरातल्या गृहिणीला सोसावे लागतात.

स्त्री ची शरीर रचना जरी नाजूक असली तरी ती मनाने अतिशय खंबीर आणि धीट असते. अनेक संकटांना तोंड देत ती मुलांना योग्य वळण लावते त्यांना स्वतःच्या पायावर उभे करते. त्या स्त्रीला, त्या मातेला अदृश्य झालेली स्वप्ने पूर्ण करायला ,तिच्या आशा-आकांक्षा पूर्ण करायला आणि तिला स्वतःचा असा एक छोटासा मनाजोगता कोपरा मिळवून दिला तर या सारखे पुण्याचे काम आणखी कोणतेच नसेल. स्त्रीचा आदर करा, तिला सन्मानाने वागवा , ती नवीन पिढी घडवत असते, तिची काळजी घ्यायला हवी असे मला वाटते .

तुम्हाला काय वाटते?…..सांगा हा …….

भेटूया पुढच्या लेखात

धन्यवाद

One thought on “स्त्री-स्वातंत्र्य”

Leave a Reply

Your email address will not be published.