सर्व निसर्गप्रेमी व्यक्तींना आपल्या दिमाखदार शुभ्रधवल अस्तित्वाने आकर्षित करणारा हिमालय…. “गिर्यारोहणाच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट शिखर सर करणे हा अंतिम मानबिंदू, त्या ठिकाणी पोहोचण्याचा क्षण हा अद्भुत, रोमांचक आणि जगणं सार्थ करण्याची अनुभुती देणारा आहे” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या त्या नुकत्याच एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या मनिषा वाघमारे यांनी.
शब्दांच्या खूप पलिकडे अंतर्मनाला खोलवर आत्मिक समाधानाचा, प्रयत्नपूर्तीचा सुखद अनुभव देणारा हा प्रवास मनिषा वाघमारे यांनी दि.21 मे 2018 रोजी 27 तासांमध्ये पूर्ण केला. हे 27 तास म्हणजे नैसर्गिक आव्हानांना आपल्या शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक क्षमतांच्या साथीने खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला भाग पाडणारे असतात. जन्म-मृत्युच्या हेलकाव्यांना शब्दशः प्रत्यक्ष अनुभवत असतानाही प्रचंड जिद्दीने, हिमतीने एव्हरेस्ट शिखरावर जाऊन सहिसलामत खाली येण्याचे ध्येय आपल्याला प्रचंड वेगाने बदलत जाणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात यशस्वी करायचे असते. या प्रवासात दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक तुमचा दुर्दम्य निर्धार आणि त्याला तेवढीच भक्कम अनुभवी साथ देणारे शेर्पा…..
साहसी क्रीडा प्रकारांकडे अपघातानेच वळलेल्या मनिषा वाघमारे या मूळात व्हॉलीबॉल खेळाडू असून शालेय जीवनापासूनच त्यांना खेळामध्ये विशेष आवड आणि प्राविण्य होते. बारावीमध्ये असताना अचानक उद्भवलेल्या अपेंडिक्सच्या आजारामुळे त्यांना डॉक्टरांनी यापुढे व्हॉलीबॉल, लॉगजम्प यासारखे शाररीक श्रमाचे खेळ शक्यतो खेळू नये असा सल्ला दिला. त्यावेळी आपल्याला मूळात खेळामध्येच करिअर करण्याची इच्छा असल्याने दुसरा पर्याय काय असू शकतो यादृष्टीने विचार केल्यावर साहसी क्रीडा प्रकारात गिर्यारोहण ही गोष्ट आव्हानात्मक आणि आवडणारी होती. त्यामुळे मग या क्षेत्रात रितसर प्रशिक्षण घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे मनिषा यांनी सांगितले. शारिरीक शिक्षण अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेतल्या नंतर मनिषा यांनी या विषयात नेट परिक्षा उत्तीर्ण केली. 2012 पासून त्या महिला महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा प्रशिक्षण, गिर्यारोहण प्रशिक्षणाचे उपक्रम राबवले जात असून विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थीनी जात आहेत.
एव्हरेस्टवर जाण्याची आपली महत्वाकांक्षा मूर्त रुपात येण्यासाठी आपण मनाली येथे रितसर प्रशिक्षण घेऊन त्या चढाईची तयारी केली. त्यानंतर आपल्या स्थानिक मार्गदर्शकांच्या सोबतीने औरंगाबादमधील डोंगराची चढाई करायला सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी काठमांडू येथे प्रयाण केले. पहिल्या प्रयत्नात आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मनिषा यांनी हिलरी स्टेप इथपर्यंत यशस्वीरित्या मजल मारली. हिलरी स्टेप हे एव्हरेस्ट शिखराकडे नेणारे सगळ्यात शेवटचे महत्वाचे स्थान आहे, त्या ठिकाणाहून पुढे शिखर काही अंतरावर असते पण निसर्गाची साथ या प्रवासात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती केव्हा तुम्हाला हुलकावणी देईल हे सांगणे तसे कठीणच असते. त्यावर्षी नेमकं निसर्गाने शिखराच्या इतक्या जवळ जाऊनही खराब हवामानामुळे मनिषा यांना पुढील चढाई करण्यासाठी पाहिजे ती साथ न दिल्याने आपल्या खडतर अशा वीस तासांच्या चढाईनंतर त्यांना माघारी फिरावे लागले होते. पण पुन्हा पुढच्या वर्षी आपण शिखर सर करायचेच, हा निर्धार अधिक पक्का करुनच मनिषा वाघमारेंनी परतीचा केलेला प्रवास या वर्षी दि.21 मे 2018 रोजी खऱा ठरला.
ज्या क्षणाची त्या आतुरतेने काही वर्षांपासून वाट पहात होत्या, ज्या अद्भुत रोमांचक क्षणाचा प्रत्यक्ष थरारक अनुभव घेण्यासाठी त्यांनी दोन वर्ष सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती तो क्षण त्यांनी या वर्षीच्या 27 तासांच्या अथक चढाईनंतर यशस्वीरित्या अनुभवला.
एव्हरेस्ट शिखराच्या प्रत्यक्षातील चढाई मोहीमेसाठी 65 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामध्ये आपल्याला त्या वातावरणाशी जुळवुन घेण्यासाठी किमान 40 दिवसांचा कालावधी लागतो. त्यात बेसकॅंपच्या आसपासची शिखरे पादाक्रांत करावयाची असतात. अशा 14 शिखरांवर मनिषा यांनी पूर्वतयारीचा भाग म्हणून चढाई केली. कालापत्थर, माऊंट लोबोवर, माऊंट पुमोरी या शिखरावर चढाई केलेल्या मनिषा यांनी सांगितले की, माऊंट पुमोरीवर केलेली चढाई माझ्या कायम लक्षात राहील, कारण ही माझी पहिलीच सोलो चढाई होती. त्यासाठी रात्री बारा ते दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या आठ वाजेपर्यंत मी चढाई केली होती, हा अनुभव खूप रोमांचक होता, असे मनिषा यांनी सांगितले. चढाईच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कॅंप एक वरुन कॅंप दोनकडे जात असताना त्या खोल दरीत पडल्या होत्या. हा थरारक अनुभव सांगताना मनिषा म्हणाल्या की, जवळजवळ 20 मिनिटे मी दरीत लोंबकळत होते. वेळीच शेर्पाने प्रसंगावधान राखून तत्परतेने मला सहाय्य केल्याने माझा जीव वाचू शकला.खुंबु ग्लेशियरचे वातावरण सतत बदलत असते. त्यामुळे तेथील रुटदेखील वारंवार बदलत जातात. त्यामुळे या सततच्या बदलत्या रुटवरुन पुढे चढाई करणे हे जास्त आव्हानात्मक असते. या ठिकाणी सराव करताना कॅंप वनवरुन कॅंप टुकडे जाताना मी खोल दरीत पडले. खाली पाहिल्यावर त्याठिकाणी काही गिर्यारोहकांची प्रेते पडलेली होती. माझ्या सुदैवाने मी लॅडरला सेप्टी बेल्ट अडकवलेला असल्याने मी खोल दरीतही लटकलेल्या अवस्थेत खाली डोके वर पाय अशा स्थितीत होते. त्यामुळे मला लगेच उलटी झाली त्या स्थितीतही मी शिट्टी वाजवून शेर्पाला बोलावण्याचा प्रयत्न केला. शेर्पा तत्काळ माझ्या मदतीस धावून आला. शेर्पाने तत्परतेने 20 मिनिटे प्रयत्न केल्यानंतर मला बाहेर काढण्यात शेर्पाला यश आले. हा अनुभव खरोखर जीवाची बाजी लावणारा होता. कारण 20 मिनीटे दरीत राहिल्यामुळे माझा आवाज एकदम बंद झाला.त्यावर योग्य तो औषधोपचार घेऊन लगेच पुढच्या रोटेशनसाठी शारिरिकदृष्ट्या व्यवस्थित होणे मला खूप गरजेचे होते. त्यामुळे मी तातडीने उपचार घेतले. एव्हरेस्टच्या बेसकॅंपवर सगळ्या आवश्यक सुविधा आहेत मात्र त्याठिकाणी ऑक्सीजन नाही. त्यामुळे नामची बझार याठिकाणी विश्रांतीसाठी गेले. आपल्या थरारक प्रवासातील या प्रसंगाबाबत बोलताना मनिषा म्हणाल्या की, एव्हरेस्ट शिखर सर करताना आयुष्य पणाला लागेल होते. गेल्या वर्षी एव्हरेस्ट शिखराच्या खूप जवळ जाऊन मला खराब हवामानामुळे परत यावे लागले होते, तो सगळा त्रास आणि हुरहुर यातून मागच्या वेळीचा अनुभव आणि ज्या उणिवा जाणवल्या त्यातून नव्याने मी यावर्षी चढाई यशस्वी करण्यासाठीची मोहीम आखली होती, असे मनिषा यांनी सांगितले.
एव्हरेस्ट शिखरावर चढाई सुरु केल्यानंतर या ठिकाणी कॅंप टु पर्यंतच जेवण मिळते. तसेच कॅप टु नंतर ऑक्सीजन सिलेंडरचा वापर करणे अनिवार्य ठरते. कॅंप थ्री ते कॅंप फोर हा जवळपास 13 तासांचा प्रवास आहे. यात कॅंप फोर म्हणजेच डेथ झोन आहे. मनिषा यांनी सांगितले की, या ठिकाणी पोहचताच सात आठ गिर्यारोहकांचे मृतदेह पाहण्यात आले. डेथ झोनमध्ये सर्व गिर्यारोहकांना 12 तास काढावेच लागतात. मनिषा या ठिकाणी थांबलेल्या असताना हिमवर्षाव खूप मोठ्या प्रमाणावर होत होता. त्या परिस्थितीतही मनिषा यांनी चढाई प्रवासातील बाल्कनी या टप्प्यावर प्रवेश केला. या
ठिकाणी एकाचवेळी चार पाच गिर्यारोहक थांबू शकतात. तसेच याच ठिकाणी आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर बदलता येतात. मनिषा म्हणाल्या की, शेर्पाकडे तीन तर माझ्या खांद्यावर दोन सिलेंडर होते. हिलरी स्टेपकडे जाताना जी शिखराकडे नेणारी जवळची स्टेप आहे, त्या ठिकाणी मनिषा यांच्या मागच्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या कारण मागच्या वर्षी त्यांना याच ठिकाणाहून खराब हवामानामुळे नाईलाजास्तव परत यावे लागले होते.
यावर्षी आपल्या चढाईच्या त्याच रोमांचक टप्प्याच्या चढाईचा थरारक अनुभव सांगताना मनिषा म्हणाल्या की, यावेळेस ही मला याच ठिकाणी अडचणीला सामोरे जावे लागले.माझ्या सिलेंडरचे रेग्युलेटर खराब झाले पण रेग्युलेटर बदलुन घेणे शक्य नव्हते त्यामुळे शेर्पाच्या सिलेंडरमधील ऑक्सिजन शेअर करत माझी चढाई चालूच ठेवली आणि शेवटी तो स्वप्नपूर्तीचा क्षण आलाच की मी एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले. शब्दांच्या पलिकडे आतपर्यंत सुखावणारा तो क्षण खरोखर अविस्मरणीय, जगणं, आपल्या सगळ्या कष्टांना सार्थ करणारा होता……. पण हा आनंद मनिषा फार वेळ घेऊ शकत नव्हत्या कारण ऑक्सिजन सिलेंडर शेअरिंगमुळे माझ्याकडे फार कमी वेळ होता. दहा मिनिटे एव्हरेस्टवर थांबून माझा परतीचा प्रवास सुरु झाला. मात्र एव्हरेस्टच्या चढाईपेक्षा जास्त खडतर ठरतो तो परतीचा प्रवास कारण यावेळी शाररिक श्रमामुळे प्रचंड प्रमाणात आलेल्या थकव्यासोबत तुम्हाला निसर्गाच्या बदलत्या प्रचंड शक्तिशाली रुपाला, गुरुत्वाकर्षणाला यशस्वीरित्या सामोरे जात तोल जाऊ न देता अत्यंत संयमाने, साहसाने, शहाणपणाने पायथ्याशी यायचे आव्हान पेलुन दाखवायचे असते. ते तुम्ही यशस्वीरित्या पेलून दाखवले तर खऱ्या अर्थाने एव्हरेस्ट शिखरावर जाऊन परत आल्याचा आनंद काय असतो ते अनुभवता येते. या सगळ्या प्रवासात महत्वाची असते त्या शेर्पाची साथ. देवदुतांसारखे शेर्पा तुमच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तुमच्यासोबत तुमच्यापेक्षा जास्त काळजीने, खबरदारीने चढाई करत असतात त्यामुळेच आपली महत्वाकांक्षा कोणताही गिर्यारोहक पूर्ण करु शकतो, अशा शब्दांत मनिषा वाघमारे यांनी आपल्या शेर्पाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
एव्हरेस्ट शिखऱ सर करुन आलेल्या मनिषा वाघमारे यांच्या सोबत हा रोमांचक थरारक अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याकडुन ऐकताना मनामध्ये भीती, हुरहुर, साहस, जिद्द, लढण्याची प्रेरणा यासगळ्या भावनांची ये जा सुरु होती. अंगावर शहारे आणणारी त्यांची ही भेट रोजच्या दैनंदिन जगण्यातली छोट्या अडचणींना हसत स्वीकारत प्रसन्नेतेने आपली ध्येये आपण पूर्ण केलीच पाहिजेत, ही कृतीशील सकारात्मकता देणारी आहे. अनिश्चितता जिथे निश्चित आहे त्याठिकाणी पुन्हा पुन्हा जाण्याचं मनिषा यांचं भविष्यातील ध्येय असून सात खंडातील पर्वत चढाईच्या उत्तुंग यशासाठी मनिषा वाघमारे यांना मनभरुन शुभेच्छा कायम राहतील, हे निश्चित……..
वंदना आर.थोरात,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद