बाबा आमटे आणि त्यांचं ‘आनंदवन’ जगाच्या नकाशावर जाऊन जवळपास दोन दशकं उलटली, तरी त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि स्नुषा मंदाकिनी त्याच परिसरातल्या ‘भामरागड’ परिसरातल्या निबीड अरण्यात नेमकं काय करत आहेत, याचा फारसा कुणाला पत्ता नव्हता. बाबाचं आनंदवनातलं काम मोठं आहेच पण आनंदवन हे विदर्भातील एका प्रमुख रस्त्यावरचं गाव होतं. बिजली, सडक, पानी अशा पायाभूत सुविधा तिथं सहजासहजी उपलब्ध होत्या. साहजिकच येणार्‍या जाणार्‍यांची तिथं वर्दळ असे आणि त्यामुळेच समाजातील एका अत्यंत उपेक्षित घटकासाठी आपलं आयुष्य उधळून देणार्‍या बाबांच्या वाटेनं प्रसिद्धीचा झोतही तितक्याच सहजतेनं आला.

यापैकी कोणतीच गोष्ट या भामरागडच्या जंगलात उपलब्ध नव्हती. मुळात तिथं जाऊन पोहोचणं, हाच शहरवासीयांसाठी एक अनुभव ठरे. मग तिथं राहणं, तर मनातही येणं अशक्य. निबीड अरण्य, आपली स्वत:ची अनवट भाषा बोलणारे माडिया गोंड जातीचे आदिवासी आणि सोबतीला असंख्य वन्य प्राणी. किर्र जंगलामुळे संध्याकाळी चार-साडेचारपासूनच अंधारून येई आणि सहा वाजले की काळोखाचं साम्राज्य सुरू होई. वीज-टेलिफोन वगैरे गोष्टी केवळ कल्पनेतल्या. पण १९७३ मध्ये बाबांनी तिथं लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला आणि २५ वर्षांच्या प्रकाशनं तिथं जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

अनवट वाटेनं जाऊन कुष्टरोग्यांसाठी आपलं आयुष्य पणास लावण्यापेक्षाही ही कसोटी मोठी होती कारण इथं थेट जिवाशीच गाठ होती. हेमलकसा -जिथं मुक्काम ठोकण्याचा निर्णय प्रकाशनं घेतला होता, त्या परिसरातल्या आदिवासींसाठी प्रकाश आणि त्याचे काही मोजकेच सहकारी हे उपग्रहावरचेच पाहुणे होते. शिवाय, कोणत्याही क्षणी आजूबाजूच्या परिसरातनं कोणतं जनावर अंगावर चाल करून येईल, ते सांगता येणं कठीण होतं. बरं यापैकी सुदैवानं काहीच घडलं नाही, तरी पायाखालचे साप वा आजूबाजचे मलेरियापासून कोणत्याही रोगाचा दंश करावयास उत्सुक असलेले डास…

तरीही प्रकाशनं तिथं जाऊन राहायचा निर्णय घेतला. सुदैवानं त्याच्या डॉक्टर पत्नी मंदाकिनी याही त्याच्याबरोबर होत्या. तिथपासून सुरू होऊन गतवर्षी मिळालेल्या ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारांपर्यंतच्या प्रवासाची कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’. या दाम्पत्यानं हेमलकसा आणि भामरागड परिसरातल्या लोकांनाच आपलसं करून घेतलं असं नाही, तर त्या परिसरातल्या प्राणीमात्रांशीही आगळाच ऋणानुबंध साधला… हे सारं करताना सामोरं येत गेली ती सरकारी अनास्था आणि प्रशासनातील कोरडेपणा. पण या दाम्पत्यानं त्या सर्व प्रसंगांशी केलेला सामना हा छोट्या छोट्या प्रसंगातून पुढे येत जातो आणि आमटे कुटुंबियांचं मोठेपण हे अधोरेखित होत जातं.

पण त्याचवेळी ही कहाणी आमटे कुटुंब कशा पद्धतीनं जीवन जगत होतं, तेही आपल्यापुढे उभं राहत जातं. बाबा हे महामानव होते पण त्यामुळेच त्यांच्या घरच्यांनाही एका वेगळ्या जीवनशैलीला सामोरं जावं लागतं. त्याची अनेक उदाहरणं या पुस्तकात आहेत. प्रकाश आणि त्याचा मोठा भाऊ नागपूरला वैद्यकीय शिक्षण घेत असताना हॉटेलात डोसा खायला गेले. खरं तर यात गैर काय? पण हे कळल्यावर बाबा काहीच बोलले नाहीत. पण साधनाताईंनी मात्र ‘बाबांच्या नावाला बट्टा लावू नका!’ एवढेच उद्गार काढले. या दोहो बंधूंना नेमक्या कोणत्या ताणतणावांतून जावं लागलं असेल, त्याची कल्पना येण्यास एवढं एक उदाहरण पुरेसं आहे. प्रकाशच्या लेखनातून उभी राहणारी विकासची व्यक्तिरेखा तर बरंच काही म्हणजे पुस्तकात नसलेल्या गोष्टीही सांगून जाते. विकासला इंजिनिअर व्हायचं होतं. त्याला नीटनेटकेपणाची, इस्त्रीच्या कपड्यांची आवड कशी होती आणि ते सारं या महामानवाच्या घरात कसं शक्य झालं नाही. पण प्रकाश लगेचच सांगून जातात की आमच्या दोघांचीही उद्दिष्टे स्वभावात फरक असला, तरी बाबांच्या प्रभावामुळे सारखीच राहिली. इथे वाचकाला महात्मा गांधींच्या घरातील ताणतणावांची आठवण येत राहते.

अर्थात, त्यामुळे आमटे कुटुंबियांच्या मोठेपणाला बाधा येत नाही. या कुटुंबानं समाजासाठी आपलं आयुष्य उधळून दिलं हे तर खरंच आहे आणि त्यांच्या त्यागातूनच आनंदवन, हेमलकसा, भामरागड परिसरात प्रकाशाच्या वाटा निर्माण झाल्या. या वाटेवरून चालण्यासाठी मग अवघ्या महाराष्ट्रातून तरुण तेथे गेले. त्यातूनच उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प आज आपल्यापुढे आदर्श म्हणून उभा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.