आज नेट फ्लिक्सवर ‘डोन्ट लुकअप’ हा चित्रपट बघितला, आणि मन अंतर्बाह्य हादरून गेले चित्रपटाची सुरुवात होते तीच मुळी एका चमचमत्या अंधारलेल्या आकाशातून येथे मिशिगन स्टेट ची एक विद्यार्थिनी जिचे नाव केट आहे ती आपल्या पीएचडीच्या प्रबंधासाठी अवकाशाचे निरीक्षण करत असते आणि बघता बघता अचानक तिला आनंद होतो तिला पृथ्वीकडे अग्रेसर असणारा एक नवीन कॉमेट म्हणजे धूमकेतू दिसतो. स्वतःच्या शोधा वर ती बेहद्द खूष होते व स्वतःच्या सहकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करते. तेव्हा तेथील प्रमुख तेथील मार्गदर्शक डॉक्टर मिंडी हे गणिती आडाखे बांधतात आणि बघता बघता डॉक्टर मिंडी व केटच्या चेहऱ्यावर भीतीचे काळे सावट दाटून येते ते अवकाश यंत्रणांच्या प्रमुखांना फोन करतात आणि सांगतात की एक कॉमेट आहे जो नऊ ते दहा किलोमीटर इतका मोठा असून जवळजवळ सहा महिन्यांनी पृथ्वीवर आदळणार आहे आणि पृथ्वीचा विनाश होणार आहे. हे ऐकल्यानंतर प्रेक्षक म्हणून आपलीपण चुळबूळ सुरू होते आता काय होणार याचे आडाखे आपण बांधायला सुरुवात करतो. डॉक्टर मिंडी, केट, अजून एक डॉक्टर टेडी हे व्हाईट हाऊस मध्ये जातात त्यांना त्यांच्या . प्रेसिडेंट च्या कानावर ही गोष्ट घालायची असते आपण अशी अपेक्षा करतो की प्रेसिडेंट आपली सगळी कामे बाजूला सारून आता धावत पळत येईल आणि या शास्त्रज्ञांचे म्हणणे ऐकेल पण आपला पुरता भ्रमनिरास होतो तिथे क्षुल्लक शी वाढदिवसाची पार्टी सुरू असते आणि प्रेसिडेंट यामध्ये व्यस्त असते. आपले शास्त्रज्ञ त्याठिकाणी अक्षरक्ष: ताटकळत थांबलेले असतात तेव्हा प्रेसिडेंट चा मुलगा येऊन म्हणतो की आज अध्यक्ष तुम्हाला भेटू शकणार नाहीत पण जेव्हा शास्त्रज्ञ भेटण्यासाठी खूप आग्रह करतात विनंती करतात तेव्हा प्रेसिडेंट त्यांना बोलण्यासाठी दहा मिनिट देते इथे आपल्याला असे वाटते की आता डॉक्टर मिंडी प्रेसिडेंट ला खरे काय ते सांगणार आणि अध्यक्ष तात्काळ कार्यवाही सुरू करणार पण हाय रे कर्म! अध्यक्ष पहिल्यांदा या गोष्टी हसण्यावारी नेते पण जेव्हा केटचा संयम सुटतो व ती जीव तोडून सांगते की पृथ्वी नष्ट होणार आहे तेव्हा त्या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जातो व त्या शास्त्रज्ञां सोबत आपणही अवाक होतो आता पुढे काय हा विचार आपल्याला पण सतावतो .
मग डॉक्टर मिंडी पुढे पुढचा पर्याय उरतो तो म्हणजे मीडियाकडे जाणे ते एका न्यूज चैनल वर ही बातमी सांगण्यासाठी जातात तेव्हा तिथे आधीच एका नटीच्या घटस्फोटाच्या विषयावर खूप गहन चर्चा सुरू असते या विषयावर बोलणे झाल्यानंतर डॉक्टर मिंडी व केटला बोलण्याची संधी दिली जाते दोघेही अतिशय संयत शब्दात लोकांमध्ये घबराट पसरणार नाही अशा रीतीने पृथ्वीवर एक कॉमेट आदळणार असल्याचे सांगतात तेव्हा ते वार्ताहर या गोष्टींमध्ये हलकेफुलके नर्मविनोद करतात जीवन-मरणाच्या प्रश्नावर समोरच्या माणसाने चालवलेला बाष्कळपणा असह्य होऊन केट ओरडते आपण सर्व मरणार आहोत समजते का तुम्हाला थोडावेळ शांतता पसरते आपल्याला वाटत चला आता तरी हे गंभीर होतील परंतु पुढच्या क्षणाला तो वार्ताहर या विषयावर विनोद करतो आणि इकडे समाज माध्यमांवर केटवर मिम्सचा वर्षाव होतो त्यांच्यावर सगळीकडून विनोद होतात ते लोकांच्या रोषाला सामोरे जातात आणि हे बघून आपल्याला वाटते हे तर पृथ्वीवर येणाऱ्या संकटा विषयी सांगत आहेत पण लोक असे कसे वागतात अशा संभ्रमित अवस्थेत चित्रपट पुढे सरकतो.
अचानक अमेरिकेच्या प्रेसिडेंट ला आपल्या चुकीची जाणीव होते व डॉक्टर मिंडी,केट ला बोलावून घेतले जाते आणि या कॉमेट चे काय करायचे यावर चर्चा करते आपला जीव भांड्यात पडतो चला आता तरी यांना समजले मग प्रेसिडेंट फारच खेळीमेळीच्या वातावरणात ही घोषणा करते की एक कॉमेट पृथ्वीवर आदळणार आहे पण आपण त्याचा मुकाबला करायला सक्षम आहोत त्यावर आपण आपल्या रॉकेटने आक्रमण करून त्याची दिशा बदलून टाकणार आहोत आणि मग होतेही तसेच खूप सारे रॉकेट लॉन्च होते आणि हे रॉकेट धुमकेतूवर आक्रमण करायला झेपावतात आपल्याला वाटते की चला टळले संकट येथे प्रवेश होतो एका नव्या पत्राचा एका मोबाईल कंपनीचा मालक पीटर जगातला तिसरा श्रीमंत व्यक्ती असतो तो प्रेसिडेंटच्या कानात काहीतरी बोलतो आणि अचानक झेपावलेली रॉकेट परत पृथ्वीकडे वळतात शास्त्रज्ञांच्या लक्षात येत नाही की हे काय सुरु आहे तेव्हा पीटर सर्वांना सांगतो की या कॉमेटवर सोने आणि हिरे, माणके यांचा प्रचंड साठा आहे तसेच मोबाईल साठी आवश्यक असणारी मिनरल्स यात प्रचंड प्रमाणात आहेत त्या कॉमेटला पृथ्वी जवळ येऊ द्यायचे आणि मग आपण आपल्या रॉकेटने त्याच्यावर हल्ला करून त्याचे तुकडे करायचे व त्याच्यावरील सर्व साधनसंपत्तीचा उपयोग करायचा त्याचे हे बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये आनंदाची लहर निर्माण होते .पण डॉक्टर मिंडि,केट यांना हा उपाय पटत नाही त्यामुळे त्यांना परत बाहेरचा रस्ता दाखवला जातो व ते काहीच करू शकत नाहीत.
जगातल्या सर्व देशांमध्ये त्या कॉमेटच्या मिनरल वरील राईट साठी भांडण सुरू होते. लोकांचे काही गट म्हणतात की हा कॉमेट नाहीच आहे ,काही लोक शास्त्रज्ञांची वैयक्तिक माहिती पुरवून त्यांच्यावर चिखलफेक करू लागतात, काही लोक प्रचंड घाबरलेले असतात काही देवाच्या प्रार्थनेमध्ये लागतात ,आणि न्यूज चॅनलच्या बातम्या सुरूच असतात जगाचे व्यवहार सुरू असतात येणाऱ्या कॉमेट विषयी अध्यक्ष वेळोवेळी संमेलने भरवून लोकांचे मनोरंजन करून माहिती देत असते. आणि एक दिवशी अचानक डॉक्टर मिंडी आणि केटला आकाशात कॉमेंट धूमकेतू स्पष्ट दिसतो त्यावेळी ते लोकांना कळकळीची विनंती करतात look up बघा आता तरी डोळे उघडा किती जवळ आला आहे हा कॉमेट तेव्हा तिकडून प्रेसिडेंट कडून सांगितले जाते की तुम्हाला वर पाहायला सांगत आहेत कारण त्यांना वाटत आहे की तुम्ही आडाणी आहात ,अविचारी आहात त्यामुळे ते Don’t look up हे कॅम्पेन चालवतात लोकांना कशाबद्दलही काहीच वाटेनासे झाले आहे त्याचे प्रतिनिधित्व हा चित्रपट करतो. हतबल शास्त्रज्ञ सुनसान रोडवरून जात असतात ते पूर्णपणे निराश झालेले असतात .सगळे जण रॉकेट लॉन्च येथे जमलेले असतात तेथेही सगळ्यांचे हास्यविनोद सुरू असतात. लोकांचे दैनंदिन व्यवहार सुरू असतात ,लोक घाबरलेले असतात डॉक्टर मिंडी आपल्या दुरावलेल्या कुटुंबाकडे परततो आणि ते सगळेजण मिळून जेवण करतात. तिकडे कॉमेट वर हल्ला करणारे पहिले रॉकेट लॉन्च होते आणि आपल्या काळजाचा ठोका चुकतो पहिले रॉकेट लॉन्च फसते सगळे घाबरतात मोबाईल कंपनीचा मालक हसतो म्हणतो, काळजी करू नका आपन एवढा गॅप ठेवला आहे आणि हे रॉकेट कॉमेटवर उतरतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही तो कॉमेट भरपूर गतीने पृथ्वीकडे झेपावत असतो आणि या घटनेचे लाईव्ह न्युज चॅनलवर सुरू असते. जसे जसे कॉमेट जवळ येऊ लागतो तसातसा लोकांचा धीर खचला जातो मोबाईल कंपनीचा मालक व प्रेसिडेंट दोघेही तिथून पळ काढतात त्यांनी आधीच पृथ्वीसदृश दुसऱ्या ग्रहावर स्वतःसाठी जागा ठेवलेली असते. या सर्व गडबडीत प्रेसिडेंट स्वतःच्या मुलाला ही सोबत घेत नाही इथे आपल्याला बुडत असताना स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या पिल्लाला पायाखाली घेणाऱ्या माकडिणीची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
कॉमेट पृथ्वीवर आदळतो तेव्हा येथे काय सुरू असते तर ब्रेकिंग न्यूज ,पार्टी ,आक्रोश ,कुणाचे लग्न सुरू असते आणि कोणी मध्ये धुंद झालेले असते आणि कॉमेट पृथ्वीवर आदळतो आणि दुसर्या क्षणी आपल्या डोळ्यासमोर पाण्यात आंघोळ करणारे बाळ येते, मागोमाग पृथ्वीवरील प्राणी दिसतात बुध्दाची मोठी मुर्ती दिसते .जेवताना डॉक्टर मिंडीच्या घरचे डायनिंग टेबल हलायला लागते सगळीकडे हाहाकार माजतो या सगळ्यापासून अनभिज्ञ प्राणी सैरावैरा पळत असतात आणि अचानक जेवता जेवता सगळे स्तब्ध होतात आपल्या डोळ्यासमोरील पडद्यावर सुरू असते मृत्यूचे तांडव हवेत उडणाऱ्या गाड्या, मोबाईल, शेअर मार्केटचा बूल, रॉकेट व मुळासकट उखडलेले झाड एकदाच आकाशात भिरकावले जाते आणि आपल्या मेंदूला आलेली बधिरता आपल्याला चित्रपट संपला याची जाणीव उत्पन्न होऊ देत नाही .डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट सध्याच्या वस्तुस्थितीचे क्रूर वास्तव मांडून जातो…….
कल्पना उबाळे