माणसाचे मन एकच असते पण त्याच्या भोवती खूप वलय असतात. त्यात मनाच्या असंख्य छटा दडलेल्या असतात.  आपण म्हणतो मन फार कोमल आहे, मन निष्ठुर आहे, मनाला काही यातना होत नाही का?, असे कसे हे तुझे मन?, त्याचे मन फार चंचल आहे, मन अधीर आहे , मनात कर्तव्याची भावना असायला हवी, मन व्याकुळ झाले, मन वेडे आहे, मन फार जिद्दी आहे. अशा अनेक उपमांनी मनाला आपल्यासमोर सादर केले जाते. यात मन  जिद्दी असते त्याची बात काही औरच असते. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची ,त्यात हयगय नाही आणि नकारात्मकता ही नाही. एखाद्याने काही करण्याचे मनात ठाम केले आणि ती व्यक्ती जिद्दीला उतरली कि समोरचे भलेभले मोठे पहाड सुद्धा तुटून जातात.

आपण अनेकदा पाहतो की गावात राहणारा मुलगा किंवा मुलगी MPSC परीक्षा पास होऊन कलेक्टर बनवून त्या गावाला आपल्या आई-वडिलांना भेटतात तेव्हा ते काय असते? ती पराकाष्टा असते प्रयत्नांची, एक जिद्द असते आकाशात उंच उडण्याची. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केलेले असतात. अभ्यास केलेला असतो. त्या मुलां बरोबरच त्यांच्या आईवडिलांची मेहनत पण तेवढीच महत्त्वाचे असते. हलाखीच्या परिस्थितीतून उच्चस्तरावर येणाऱ्यांची जिद्द म्हणूनच वाखाणण्याजोगी असते. मेरी कोम च्या बाबतीत पण तसेच आहे. मुलांची आई असूनही बॉक्सिंग मध्ये अव्वल दर्जा कायम ठेवण्याची तिची जिद्द वाखानण्याजोगी आहे पण तिचे खच्चीकरण करण्यात आले ह्यावेळेच्या ऑलम्पिक स्पर्धेत जे आपण सर्वांनीच पाहिले. त्यावर सर्वांच्या भरपूर प्रतिक्रीया सुद्धा आपल्या वाचनात आल्या होत्या.

माणूस जर जिद्दीने कामाला लागला तर त्याचे यश ठरलेलेच असते. अशावेळी तहान भूक विसरून त्या कार्यात झोकून दिलेले असते आणि डोळ्यासमोर फक्त लक्ष्य असते. व्यवसायात सुद्धा असेच आहे. कोणताही व्यवसाय हा एका दिवसात मोठा होत नसतो. असंख्य अडचणींवर मात करून आणि रात्रीचा दिवस करून जिद्दीने तो उभारावा लागतो. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर असे उद्योगपती कसे नावारूपाला आले तर त्यांच्यातील एक आग, एक तपश्चर्या, एक निश्चय आणि तो तडीस नेण्याची जिद्द.

आयुष्याला जर चांगले वळण लागायला हवे तर आपली स्वप्ने पुर्ण करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे . जगण्याची जिद्द असेल तर व्हेंटिलेटर  वरची व्यक्तीसुद्धा नॉर्मल होऊ शकते . मृत्यूला शह देण्याची जिद्द होती म्हणून तर सावित्रीने सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडवून आणले. अरुनिमा सिन्हा पाय नसताना सुद्धा कृत्रिम पायांनी एव्हरेस्ट चढून भारताचा झेंडा फडकवला. भारताचे नाव जगभरात मोठ्या अभिमानाने घेण्यासाठी त्याचप्रमाणे योगदान देण्याची जिद्द प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. तुम्हाला काय वाटते?…… सांगा हा.

             भेटूया पुढच्या लेखात…….. धन्यवाद

लेखिका:-साधना अणवेकर

Leave a Reply

Your email address will not be published.