” कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा कोणी येणार येणार गं”……. नवीन छोट्या पाहुण्याची चाहुल लागल्यावर त्याच्या स्वागतार्ह गायलेले हे ‘अशी ही बनवाबनवी’ मधील गाणे किती छान वाटले होते बघायला आणि ऐकायला. कुठल्याही नाविन्याची आपल्याला बातमी मिळते आणि मन फुलून जाते. असह्य उकड्या नंतर येणाऱ्या रिमझिम पावसाची चाहूल, नवीन छोट्या रोपाला नाजूकश्या येणाऱ्या फुलाची चाहूल, नारळातून सरसरत वर येणाऱ्या अंकुराची चाहूल खूप गोड असते. निसर्गाने किती आत्मीयतेने बनवलेले आहे हे जग. जगातील प्रत्येक छोटी गोष्ट आणि त्यातील आनंद, उत्कर्ष, सुंदरता, प्रेम, आत्मीयता ओतप्रोत भरून ठेवलेली आहे. आपण त्याकडे कशा नजरेने बघतो त्यावर त्याची सकारात्मकता आणि नकारात्मकता ठरते. आपले मन सुंदर, स्वच्छ, निर्मळ असेल तर समोरची गोष्ट सुखकारक वाटते.
जीवनात असंख्य दुखत घटनांची पण चाहूल लागते तेव्हा मनाला त्रास होतो, बिथरलेल्या सारखे वाटते. आपण आयुष्यभर धावत असतो एका मृगजळाच्या पाठी प्रत्यक्ष काही मिळेल अशा भावनेने पण जीवनात आपल्याला प्राप्त झालेले आहे तेच आनंदप्रत मानून जगलो तर क्लेश होत नाही. आपण जे शिकतो ,जे वाचतो, जसे कर्म करतो त्याप्रमाणे आयुष्यात काय मिळणार त्याची चाहूल आपल्याला लागलेली असते पण काही वेळा तिथे दुर्लक्ष करू पळत्या मागे लागतो. देवाने आयुष्याची विभागणी कशी बरोबर केलेली आहे. जन्माची चाहूल लागली की आप्तेष्ट खुश होतात. आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो पण वृद्धापकाळाची चाहूल लागते तेव्हा आपले मन तसे अचानक गहिऱ्या भावभावनांमध्ये बुडून जाते. संत महात्मा लोकांना त्यांच्या निर्वाणाची चाहूल लागते तेव्हा ते एका उच्च पराकोटीच्या साधनेत मग्न होतात. त्यांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येची तेज आणि बळ त्यांच्यात आणि आजूबाजूच्या जागेत एक अतुल्य ऊर्जा निर्माण करतात. अशा थोर महात्म्यांचे पदस्पर्श सुद्धा आपल्या अंगात एक चैतन्य आणते. याचा अनुभव खूप जणांना आले असतीलही. शिर्डीचे श्री साईबाबा त्यांच्या नुसत्या दर्शनाने आणि पदस्पर्शाने बघा कसे आपले दुःख, नैराश्य निघून जाते. विश्वास असला पाहिजे. त्यांच्या कृपेची चाहूल आपल्याला मिळतेच.
निसर्गाच्या चढ-उताराची सुद्धा चाहूल आपल्याला मिळते. पुढे येणाऱ्या संकटाची ती घंटा असते आपण कधी कधी दुर्लक्ष केल्यामुळे किंवा निसर्गावर अतिक्रमण केल्यामुळे , अतिरेक झाल्यामुळे भयंकर विनाशाला तोंड द्यावे लागते. मुलांमध्ये वाढणारे नैराश्य , बेरोजगारी यामुळे आपल्याला भावी पिढीच्या नुकसानीची चाहूल लागते. त्यांना वेळीच योग्य व्यवसाय प्रशिक्षण देणे, स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे खूप गरजेचे आहे. चीनने त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी जे उपाय योजले आहेत ते आपण वाचले. पण ते कशासाठी ? तर त्यांच्याकडे युवापिढी कमी झाली म्हणून. त्यांच्या देशाचा अर्थव्यवस्थेच्या असंतुलनाची चाहूल त्यांना लागली म्हणून लोकसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. या सृष्टीत एका नवीन जीवाची जशी निर्मिती होते तसेच एका जिवाचा अंतिम क्षण सुद्धा ठरलेला असतो. त्याची चाहूल शरीर आपल्याला देत असते. तो क्षण संसारातील सर्व मोहमाया विसरून कसा स्वीकारायचा हेच आपण ठरवायचे असते. तुम्हाला काय वाटते?……. सांगा हां
भेटूया पुढच्या लेखात………
धन्यवाद