नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नव वर्ष सुखाचे, समाधानाचे, प्रेमाचे, कौतुकाचे, संपत्ती संपदा चे, चांगल्या आरोग्याचे कीर्तीचे लाभो. सर्वजण एकमेकांना अशा संदेशाने आपल्या शुभेच्छा देतात. वर्षभर केलेली मेहनत, धावपळ, कामाचा लेखाजोखा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आठवतो. वर्षाचे दिवस कसे भराभर निघून जातात आणि आयुष्याचे दिवस पण….. जन्मल्यापासून आपण वाढदिवस साजरा करतो आणि वयाच्या वाढलेल्या वर्षांचे स्वागत करतो. वाढत्या वयाबरोबर आपल्यामध्ये प्रगल्भता, समजूतदारपणा, व्यवहार दृष्टी, कर्तव्यनिष्ठा वाढू लागते. घरात जन्मलेल्या नवीन बाळाचे स्वागत हे त्या घरासाठी आयुष्यभराचा ठेवा असतो. प्रत्येक चांगल्या चालीरीती चा आपण आयुष्यात उपयोग करून घेतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या कार्यामुळे आज देशात स्त्रीया ताठ मानेने जगत आहेत, शिकत आहेत. नवीन नवीन भराऱ्या घेत आहेत. कॉम्प्युटरच्या ज्ञानामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील शैक्षणिक, सामाजिक स्तरावर यश प्राप्त होत आहे. अशा चांगल्या गोष्टींचे स्वागतच केले पाहिजे.
लग्नसमारंभातील वरदेवाचे स्वागत किती जंगी केले जाते. ती वधू-वरांच्या नवीन आयुष्याची सुरुवात असते ना? दिव्यांची रोषणाई, फुलांची सजावट, उत्तम खाण्याचे पदार्थ, आकर्षक भेटवस्तू यांनी मन कसे प्रफुल्लीत होते. अत्तर शिंपडून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत होते. ह्या ‘स्वागत ‘शब्दांमध्येच एक किमया आहे.“आईये आपका स्वागत है|” असे म्हटल्यावर किंवा कुणाच्या घरी गेल्यावर “या आमच्या घरात तुझे स्वागत आहे” असे प्रेमाने म्हटलेले शब्द जेव्हा कानात जातात तेव्हा आपले मन प्रसन्न होते. अंतरात्मा मधून एक शांतीपूर्ण दुवा येतो. आपल्याकडे कोणतेही चांगले कार्य करून आल्यावर ओवाळणी करून स्वागत केले जाते. त्या निरांजनातील पाच वातींचा प्रकाश आजूबाजूच्या दृष्ट प्रवृत्तींना दूर करतो. मुस्लीम धर्मातील तीन तलाक चा कायदा रद्द झाला ते खूपच स्वागतार्थ आहे. पुरुषांच्या जेव्हा मनात येईल तेव्हा स्त्रीला हे तलाक नावाचे विष पाजले जायचे पण हा कायदा रद्द झाल्या मुळे मुस्लिम स्त्रिया खूप आनंदित झाल्या आहेत.
कोणत्याही चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी वेळ काळ पहायची गरज नसते. मनाच्या गाभाऱ्यात निर्माण होणाऱ्या भावभावनांचे, विचारांचे स्वागत करून त्याला उच्च पातळीवर नेऊन ठेवायला हवे. निसर्गचक्र जसे गोल फिरत आहे म्हणजे अंधारा नंतर प्रकाश परत रात्र आणि परत सूर्याचा उदय असे चक्र चालूच असते ना? ऋतू बदलतात पण प्रत्येक ऋतूचे स्वागत हे त्या त्या अनुषंगाने केले जातेच. प्रत्येक सण हा एक नवीन आशा, नवीन विचार घेऊन येतो. बैशाखी मध्ये नवीन धान्यांचे स्वागत, भाद्रपदात श्रीगणेशाचे स्वागत, नवरात्रात श्री दुर्गा देवी चे स्वागत आपण करतो. ही परंपरा अखंड चालत रहायला हवी. नवीन पिढीला सर्व चांगल्या रीतीरिवाज , संस्काराची, ज्ञानाची खूप गरज आहे. गर्भसंस्काराची पाळेमुळे त्यासाठीच रुजवली गेली आहे. त्याचे स्वागतच झाले पाहिजे कारण त्यामुळे गर्भातच ज्ञानाचे अमृत मिळाल्या मुळे जन्मल्यावर मुलं ती हुशार होतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशातील अरुणोदय ह्या मुलाच्या बोलण्याने आणि वागण्याने सर्वांना अचंबित केले आहे. त्या बालकाचे स्वागत कसे होत आहे हे तुम्ही पाहिलेच असेल? आपल्यातील चांगल्या वृत्तींचे स्वागत करा, वाईट वृत्ती आपोआपच नाहीशा होतील. तुम्हीपण प्रयत्न करा. मग काय करणार ना तुम्ही पण प्रयत्न?… सांगा हां .
भेटूया पुढील लेखात……… धन्यवाद
लेखिका- साधना अणवेकर