महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कसा असावा, हा आदर्श कै. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला. केवळ काँग्रेस नव्हे, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही ते सन्मानाची वागणूक देत असत. ते राज्याचे दिलदार राजाच होते, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी आठवणींना दिलेला उजाळा.
१९५७ च्या मुंबई विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली. ती ओळख त्यांनी मोठ्या पदावर जाऊनही कायम ठेवली. आमदार झालो तेव्हा मतदारसंघात मनार नदीवर धरण उभारण्याच्या संदर्भात आम्ही सत्याग्रह सुरू केला होता. या धरणाच्या निमित्ताने माझी आणि त्यांची चर्चा झाली होती. तत्कालीन मुख्य अभियंता श्रीधरराव जोशी यांच्या मदतीमुळे मी या धरणाचा चांगला अभ्यास केला होता. हे धरण वरच्या बाजूला शिवाजी धरण या नावाने आणि खालच्या बाजूला संभाजी धरण या नावाने अशी दोन धरणे करावीत, अशी आमची मागणी होती. परंतु, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेंच मार्क वेगळ्या होत्या.
तेव्हा नदी बदलण्याची ताकद कोणात नाही, असे आम्ही विधानसभेत सुनावले होते परंतु, आमची सूचना मान्य झाली नाही आणि अट्टहासाने मनार धरणाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण आले होते. परंतु, आम्ही विरोधात आंदोलन करू, अशी भीती वाटल्याने माझ्यासह भाई गुरुनाथराव कुरुडे, माणिकराव कळवे, संभाजी पेटकर, गणेशराव पाटील लुंगारे आदी कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत असताना त्यांनी कधीही कटुता आणली नाही. तो जनतेचा, समाजाचा प्रश्न आहे या उदात्त हेतूने त्यांनी हा प्रश्न हाताळला होता. मनार धरण झाले परंतु, आम्ही केलेली सूचना मान्य झाली नाही.
२८ ऑक्टोबर १९५८ रोजी कंधार तालुक्यात श्री शिवाजी मोफत विद्यालय सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि या शाळेच्या उद्घाटनासाठी यशवंतरावांनी यावे यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. मी विरोधी पक्षाचा सदस्य असताना त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता येण्याचे मान्य केले. धोंडगे यांच्या शाळेच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण येणार असल्याने काँग्रेस नेत्यांच्या पोटात गोळा उठला. काही जणांनी तर वातावरण बरे नसल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ नये असा त्यांना सल्ला दिला होता. यशवंतराव कार्यक्रमाला येऊ नयेत, असे बरेच प्रयत्न झाले परंतु, ते कोणालाही न जुमानता कार्यक्रमाला आले. ही आमची ऐतिहासिक भेट राजकारणाच्या इतिहासाच्या पानात आठवणीने कायमची कोरली गेली आहे. त्यांचा हा उदारपणा यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला. याच भेटीत मी गोरगरीब आणि वाडी-तांड्यावरच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शिवाजी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आधी लग्न करेन ते शिवाजी महाविद्यालयाचे अन् नंतर माझे. ही प्रतिज्ञा त्यांच्यासमक्ष केली. तेव्हा हे ऐकून यशवंतराव स्तब्ध झाले. त्यावेळी ते म्हणाले, “केशवराव तुमच्या महाविद्यालयासाठी मी पण हातात झोळी घेऊन फिरेन.’ मनाची एवढी उदारता त्यांनी दाखविली.
याच काळात सीमा भागात आंदोलन चालू होते. १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जात होता. त्यादरम्यान, यशवंतराव नांदेड येथे आले आणि त्यांनी, `केशवराव तुम्ही नांदेडला या.’ असा निरोप धाडला. तेव्हा नांदेडच्या विश्रामगृहावर गेलो. तत्कालीन जिल्हाधिकारी एम.एन. देसाई, पोलिस अधीक्षक कासार यांच्यासमक्ष माझ्यात आणि त्यांच्यात चर्चा झाली. तेव्हा ते म्हणाले, “केशवरावांच्या कॉलेजचे लग्न करायचे आहे.’ केवळ ते असे म्हणाले नाहीत, तर तो शब्द पूर्ण करून दाखविला. राजकारणात दिलेला शब्द पाळावा लागतो. त्यांनी दिलेल्या शब्दानंतर कॉलेजला मंजुरी मिळाली आणि दि. १६ जून १९५९ रोजी शिवाजी कॉलेज सुरू केले व १५ ऑगस्ट १९६३ रोजी मी लग्न केले. हा दिवस अजूनही माझ्या स्मरणात आहे. गरीब मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली. माझी माय मुक्ताईने घरातच मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. ती स्वत: भाकरी करून मुलांना जेवू घालत असे. तिला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची नावेही माहीत नव्हती परंतु, गरिबांबद्दल कणव होती. काही वर्षांत आमची माय मुक्ताईचे निधन झाले. काही दिवसांत यशवंतराव माझे सांत्वन करण्यासाठी रात्री १ वाजता कंधार येथे आले. त्यांनी मनाचा दिलदारपणा दाखविला.
महाराष्ट्राचा दिलदार राजा कसा असावा हे मला तर कळालेच पण, महाराष्ट्रालाही कळाले. ते उदारमतवादी, पुरोगामी विचारवंत होते. विरोधक म्हणून त्यांच्याकडे सूडबुद्धीची वागणूक नव्हती. पुढे ते देशाचे संरक्षणमंत्री झाले, तेव्हा कोयना प्रकल्पाच्या जलाशयाला शिवसागर हे नाव त्यांनी कंधारच्या धरणावरून दिले. संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांचा महाराष्ट्र विधानसभेत सत्कार करण्यात आला. तेव्हा यशवंतरावांनी चौकशी करून केशवराव ठीक आहे ना, अलीकडे या, पुढच्या रांगेत बसा अशी सन्मानाची वागणूक दिली. शेषराव वानखेडे तेव्हा सभापती होते. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. तेव्हा वानखेडे यांनी केशवराव काय विचारायचे ते विचारा असे म्हटल्यानंतर पाकिस्तानने भारताचा काही भाग गिळंकृत केला आहे तो परत आणा, अशी सूचना मी केली. हा प्रश्न त्यांच्यासाठी अडचणीचा होता. तरीही त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. प्रत्येकाची ओळख ठेवण्याची ताकद, वर्क्तृत्वाची जादूगिरी, निष्कलंक चारित्र्य ही त्यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये होती. आज राजकारणात औषधालाही अशी माणसे सापडत नाहीत.
१९७८ मध्ये मी लोकसभेत गेलो. तेव्हा शपथ घेतल्यानंतर हस्तांदोलन केले जाते. मी जयक्रांती म्हटलो. तेव्हा पंतप्रधान मोरारजीभाई देसाई आणि काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती. याच दरम्यान यशवंतराव भारताचे उपपंतप्रधान झाले, परंतु ते मला कधीही विसरलेले नाहीत. मोठ्या पदावर गेल्यानंतर माणसाला विसर पडतो, परंतु त्यांचा माणसे जोडण्याचा स्वभाव होता. लोकसभेत त्यांनी माझी चौकशी केली. विठामाईचा यशवंत सह्याद्रीच्या नव्हे, तर मनाचा मोठेपणा दाखवून बालाघाटचा आणि मन्याडचा ताईत बनला. या थोर नेत्याला माझी मानाची जयक्रांती!
– कमलाकर जोशी