‘मन वढाय वढाय’ ही कविता लहानपणी शाळेत शिकवली गेली होती. बाल्यावस्थेतील मनाला त्यावेळी मन हे इतक्या प्रकारचे असू शकते हे माहीतच नव्हते त्यापेक्षा त्या मनाच्या इतक्या वाटांवर लक्ष द्यायला वेळच नव्हता त्या मनाची गंभीरता आणि खोल पणा जसजसे तारुण्य येऊ लागले तसे तसे उलगडत जाऊ लागले. भाबडे, निर्मळ मन लहानपण देगा देवा या उक्ती तून बाहेर येऊ पहात होते. चंचलता आणि अवखळपणा मनाच्या झोक्या बरोबर.उंच आकाशी जायला उत्सुक होते . कोणाच्या सांगण्यानुसार स्वतःला त्या साच्यात शिस्तबद्धपणे आखायचे ते दिवस. ते दिवस शाळा-कॉलेज पूर्ण होता होता कधी पक्वतेच्या दिशेने निघाले ते कळलच नाही. हिरव्यागार रानात, शेतात दूर दूर फक्त उघडे आकाश. आकाशातील दिवसा दिसणारे शुभ्र ढग आणि पसरलेले निळे आकाश, थंड पण न बोचणारी हवा, हळुवार डुलणारी फुले, पाने. ती झाडांच्या पानांची सळसळ ,पक्ष्यांचे किलबिलणे, फुलांचा मनमोहक सुगंध, शुभ्र आकाशी उंच उडणाऱ्या पक्ष्यांचे ते पंख न हलवता स्थिरतेने उडणे पहायचा मोह मला अजूनही आहे. ” मनरे तू तू काहे ना धीर धरे, तू निर्मोही मोह ना जाने किसका मोह करे……. ” हे गाणे किती सुंदर आहे. मनाला किती गोष्टींचा मोह होतो. आता ते केले तर कसे होईल? आता हे केले तर बरे झाले असते? आपण असे बोलायला हवे होते का? आपण असे करायला नको होते का? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आपल्या अंतरंगात चाललेला असतो. जेव्हा लहान असतो तेव्हा कधी मोठे होतो असे वाटायचे. आई वडिलांनी केलेल्या संसारा सारखे आपण पण वागायचे, मुलाबाळांना असे सांभाळायचे, जीवनात असे करायचे आणि तसे करायचे असे आपण आपल्या मनाला सांगत असतो ते आत मध्ये ठासुन बिंबवत असतो पण संसाराच्या गाडीला दोन चाके असतात हे विसरून चालत नाही. एक चाक व्यवस्थित चालेल पण दुसऱ्या चकाने सुद्धा तशीच साथ देणे गरजेचे असते. ती गाडी हाकणारा भले कितीही उत्कृष्ट सारथी असला तरी या चाकांवरच तर ती गाडी पुढे पुढे जाणार असते ना? मनाच्या ओझ्याखाली आणि दडपणाखाली दाबून ठेवलेली हळवी जागा या गाडीच्या चाकांच्या हळुवारपणा, सोशिकपणा ,प्रेमळपणा आपलेपणा, त्याग, आत्मीयता, समर्पण या सर्वांमुळे कधीकधी भरून येते आणि याउलट जर प्रेम मिळाले नाही, अपमानास्पद वागणूक आणि अवहेलने च्या खड्ड्यांमधून जर जात राहिले या संसार रुपी गाडीचे चाक तुटायला वेळ लागत नाही.
मन फार भावुक असते. आई-वडिलांच्या छत्राखालून बाहेर आल्यावर पतीच्या छत्राखाली विसावते पण त्या छत्राला जर अहंकाराची भोके असतील तर ते नाजूक मन करपून जाते. त्याचा बहर कधी होत नाही. जीवनात प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे वागायला पाहतो .प्रत्येकाचा तो हक्क आहे, मान्य आहे पण आपण गृहस्थाश्रमात केव्हा प्रवेश करतो तेव्हा तो संसार व्यवस्थित, नेटाने शेवटपर्यंत केला पाहिजे. एकमेकांची मने सांभाळून ,त्या मनात काय आहे हे समजण्याची कला ज्याला अवगत होते त्याला हे जग जिंकण्याची महती प्राप्त होते. मन क्षणात एकलकोंडे होऊ शकते जर त्याला ऐकून घेणारे कोणी नाही भेटले तर…. मग मन आतल्या आत स्वतः मध्येच तर्क वितर्क करत राहते. आपले कोणच नाही किंवा आपल्याला कोणी प्रेम, माया करत नाही असे तेव्हा मनात बसते तेव्हा त्या व्यक्तीची रूप रेषा डगमगायला लागते. अस्वस्थ, बेचैन, हळवी, रडवेली होते. या जगात म्हणायला सर्व आपले असतात पण आपले मन समजून अत्यंत प्रेमाने साथ देणारा हात जेव्हा खांद्यावर पडतो तो क्षण आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. जीवाला जीव देणारे खूप कमी असतात. मनाच्या तारा जुळलेल्या असतात असे म्हणतात ते बरोबरच आहे म्हणून तर इथे आपण आठवण काढली तर या व्यक्तीची आपण आठवण काढतो त्या व्यक्तीला बरोबर तिथे समजते. याचा अनुभव मला तरी खूप आला आहे…… बघा तुम्हाला पण येतो का? म्हणून तर पिक्चर मध्ये दाखवतात ना पलट पलट म्हटल्यावर हिरोईन कशी मागे वळते ते? यालाच मनाच्या तारा जुळणे म्हणतात. हवेत जशा ध्वनिलहरी असतात ना तशाच मनाच्या लहरी पण असतात. पहा प्रयत्न करुन………
भेटूया परत पुढच्या लेखात…. धन्यवाद
लेखिका—- साधना अणवेकर