भारूड म्हटलं की आपल्याला आठवण होते ती संत एकनाथांच्या रुपकाश्रयी अभंग रचनांची. भारूड म्हणजे ‘बहु रुढ’ असा वाङमय प्रकार, ‘काय भारूड लावलंय’ असं आपण म्हणतो त्यावेळी आपणास रटाळ, कंटाळवाणा प्रकार अशा आशयाचे संवाद अभिप्रेत असतात. प्रत्यक्षात संतांची भारूडे मात्र रटाळ कंटाळवाणी नसतात. ही भारूडे म्हणजे अध्यात्मबोधाचं अंजन घालणारी लोकशैलीतील अभंगरचना होय. भागवत संप्रदायी संतांच्या भारूडाचे गारूड म्हणजेच मोहिनी आजही मराठी लोकमानसावर कायम आहे. बाराव्या – तेराव्या शतकात भागवत संप्रदायी संतांनी ‘हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वबंधुत्वाची जाणीव वृद्धिंगत करणार्या भागवत मंदिराची उभारणी केली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेदाला तिलांजली देत भूती भगवतभाव हे ब्रीद वागविणार्या संतांच्या या भागवत मंदिराचे सार्थ वर्णन संत बहिणाबाईने केले आहे ते असे –
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।।
नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।।
जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश ।।
असे हे संतांचे भागवत मंदिर, या संतांच्या मांदियाळीने अध्यात्मबोधासाठी, लोकजीवन, लोकसंस्कृतीतील अनेक प्रतिमांचा, नाना विधांचा चपखल वापर करीत रुपके रचली. ही रूपके पशु, पक्षी, पुरोहित, लोकसंस्कृतीतील वाघ्ये, मुरळी, भुत्ये, कोल्हाटी, जोशी, भालदार, चोपदार, छडीदार, आदींची होती. ही रूपके ज्या अभंग रचनांमधून साकार झाली तीच भारूडे होत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा सर्वच संतांनी भारूडे रचली. त्यातल्या त्यात संत एकनाथांच्या भारूडांची मोहिनी लोकमानसावर विशेष आहे.
आळंदी पासून पंढरपूर पर्यंत जो पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघतो त्या पालखी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी हमखास भारूडे सादर होतात. भारूडाचे सोंगी भारूड आणि भजनी भारूड असे दोन स्थूल प्रकार आहेत. भजनी भारूडात भारूडे केवळ गायिली जातात तर सोंगी भारूडात प्रत्येक भारूडाद्वारे स्वतंत्र सोंग वठविण्यास येते. नवविधा भक्तीत कीर्तन भक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची’ अशी संतांची धारणा आहे. ‘न लगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण.’ नाम संकीर्तन केले की नारायण सुखे घरा येतो अशी संतांची निष्ठा आहे. याच निष्ठेचे व अध्यात्मबोधाचे दर्शन भारूडातून होते. भारूडात सोंगे वठविली जातात. सोंग हा शब्द सु+अंग शब्दापासून तयार झाला. परमेश्वराच्या सु+अंगाचे संकीर्तन भारूडाद्वारे होते. कारण नारायण बहुरुपी आहे. त्याने सोंगे घेतली तर त्याचे स्मरण करताना आपणही सोंगे का घेऊ नयेत? असा विचार भगवद्भक्तांनी केला. बहुरुपी रुपे नटला नारायण। सोंग संपादून जैसा तैसा या सोंगांचे दर्शन भारूडातून होते. अगं गं गं गं विंचू चावला, भूत जबर मोठं गं बाई झाली झडपण करू गत काही , एडका मदन केवळ पंचानन, सत्वर पाव गं मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, ही व अशी अनेक भारूडे आळंदी, पंढरीच्या वाटेवर वारकरी सादर करतात. भारूडाद्वारे रंजनाबरोबरच लोकप्रबोधनाचे मोठे कार्य घडते. त्यामुळेच भारूडांना परमार्थीकृत लोकसाहित्य म्हटले गेले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात सोंगी भारूडांची, भजनी भारूडांची समर्थ परंपरा आहे. संत एकनाथांच्या पैठणमध्ये प्रभाकर देशमुख हे सोंगी भारूडकार प्रसिद्ध आहेत तर औरंगाबाद जवळील रहिमाबाद येथील निरंजन भाकरे ही भारूडातून लोकशिक्षण, लोकरंजन घडवितात. पंढरपूरच्या महिला भारूडकार चंदाबाई तिवाडी व औरंगाबादच्या मीराबाई उमप यांचेही नाव अग्रक्रमाने भारूड सादर करताना घेतले जाते. बुरगंडा हे संत एकनाथांचे भारूड निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप यांनी विशेष लोकप्रिय केले. मीराबाई उमप दिमडीवर भारूड सादर करतात. सांगली जिल्ह्यात खुजगावचे सोंगी भजन प्रसिद्ध आहे तर पुणे जिल्ह्यातील मावळ प्रातांत भारूडे सादर करणारे स्वतंत्र संच आहेत. महाराष्ट्र शाहीर साबळे, लोकशाहीर विठ्ठल उमप अशा शाहीरांनीही भारूडे लोकप्रिय केली. भारूडाचे गारूड आजही मराठी लोकमानसावर आहे हेच खरे !