नुकतीच झटपट घटस्फोट विधेयकावर वादळी चर्चा होऊन काही काळापुरते तरी ते बाजूला पडल्याचे दिसते. परंतु या निमित्ताने विवाह संस्था, व्यक्तिसंबंध आणि समुपदेशनाचे महत्त्व या विषयांवर गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे, हे निश्चित.
विवाह आणि वैवाहिक जीवन ही एक गुंतागुंतीची सामाजिक व्यवस्था आहे, हे निश्चित. “नसून खोळंबा आणि असून अडचण’ अशी काही विवाहितांची अवस्था होत असते. यातूनच काही जण घटस्फोटासारखा स्फोटक विचार करत असतात. काही जण तो अमलातही आणतात. या व्यक्तींना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग वाटत असतो. त्यांचं मन त्यांच्या वैवाहिक जीवनातील अनुभवांनी वैफल्यग्रस्त होऊन क्षुब्ध झालेलं असतं; परंतु समाजधुरीणांनी अशा गोष्टींचा गांभीर्यानं विचार करून त्या दाम्पत्यांना समुपदेशन करणे आवश्यक आहे. दाम्पत्याच्या पसंतीतून घडलेलं लग्न वाचवणं, हे एक मोठं सामाजिक कार्य मानलं पाहिजे. लग्नविघातक पुष्कळशी कारणं, ही दूर करता येण्यासारखी असतात; पण संबंधितांना त्यांच्या कुटुंबीयांनी याविषयी उद्युक्त करणं आवश्यक असतं. आणि नेमकी हीच जागरुकता आपल्याकडे कमी पडते.
सततची शारीरिक मारहाण, सततचा मानसिक छळ, घातक व्यसनं या गोष्टी जर जोडीदाराच्या व शुभचिंतकांच्या, तसंच व्यावसायिक समुपदेशकांच्या सततच्या सल्ल्यांनंतरही चालू राहात असल्या तर विवाहविच्छेद हा उपाय असू शकेल.अन्यथा विवाह वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घटस्फोटाच्या किंवा अन्य वैवाहिक समस्यांचा विचार करताना लैंगिक कारणांची चर्चा होत नाही. परंतु ती टाळणे हे अंतिमतः धोक्याचे ठरते. लैंगिकतेविषयीची कारणेही विचारात घेणं आवश्यक आहे. त्यापैकी प्रमुख म्हणजे वैवाहिक अपूर्णता. त्याचा अर्थ दाम्पत्यामध्ये लैंगिक संबंध न घडणं (“अन्कन्झमेशन’ ऑफ मॅरेज.) दोघांचं सहकार्य असेल तर उपचार व समुपदेशनाने ही समस्या दूर होऊ शकते. “अन्कन्झमेशन’ ही लैंगिक समस्या असून, योग्य मार्गदर्शनानं दूर होऊ शकते, याविषयीच अज्ञान असल्यानं काळाच्या ओघात अशा दाम्पत्यांमध्ये इतर कारणांनी मानसिक व भावनिक संघर्ष विकोपाला जाऊन कौटुंबिक कलहही पराकोटीला जातो. अशा वेळी मूळ समस्या सुटण्यासारखी असली तरी पती-पत्नी एकमेकांच्या नजरेतून उतरल्यामुळे कोर्टाकडे धाव घेतात.
लव्ह मॅरेज असो वा ऍरेंज्ड मॅरेज, प्रत्येक दाम्पत्यानं हे स्वपसंतीनं निवडलेलं नातं निभवायची क्षमता त्यांच्यामध्ये आणणे आवश्यक असतं. यासाठी “आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणजेच “घनिष्ठतेची कला’ शिकणं नितांत आवश्यक असतं. “आमच्यामध्ये काही क्लिक होत नाही’, “आम्ही एकमेकांपासून मानसिक व भावनिक दृष्टीनं मॅच होत नाही’, “आम्ही अनुरूपच नसल्यानं एकत्र राहण्यात काय फायदा’, “आयुष्य एकदाच येतं, पुढचं तरी नीट घालवू’ या अशा विचारांनी दाम्पत्य किंवा त्यातील कोणीतरी एक जण घटस्फोटाचा विचार प्रबळपणे करतो. काहींना आश्चर्य वाटतं, की इतक्या व्यक्ती बघूनसुद्धा आपण नेमकी चुकीचीच व्यक्ती कशी काय जोडीदार म्हणून निवडली? तर काहींना स्वतःचं लग्न म्हणजे एका व्यक्तीच्या सततच्या टीकेसाठी कित्येकांच्या कौतुकाचा केलेला त्याग वाटतो. जगात कुठलंच दाम्पत्य मुळात अनुरूप नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. दिसण्यात एकवेळ अनुरूपता असू शकते; पण मानसिक व भावनिक भिन्नता ही असतेच. कारण लग्न मुळातच दोन भिन्न व्यक्तींचं असतं. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या, वेगवेगळ्या विचारांनी मनाची घडण घडलेल्या त्या व्यक्ती असल्यामुळे लग्न केवळ दोन व्यक्तींचं नसून, दोन व्यक्तिमत्त्वांचं असतं.
वैवाहिक व्यवस्था “व्यक्तिकेंद्रित’ न ठेवता “दाम्पत्यकेंद्रित’ असली पाहिजे. वैवाहिक नात्याचा विचार हा गांभीर्यानं केला नाही, तर कोर्टाकडे धाव घेणं चालूच राहील. आणि सरकारनं घटस्फोट कायद्यातील नवीन केलेल्या सुधारणांनी कदाचित लग्न ही गाजराची पुंगी बनून “वाजली तरी वाजली नाहीतर मोडून खाल्ली’ या पद्धतीची थिल्लर व्यवस्था बनून जाईल
डॉ. शशांक सामक