या शब्दाची काही नव्याने ओळख करून देण्याची गरजच नाही. आपल्यातील अनेकजण बहुतेक दररोज हा शब्द वापरत असतो. ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘चला रे फालतू गप्पा मारू नका’, वगैरेसारख्या अनेक वाक्यांतून तो नेहमी आपल्या कानी पडत असतो. या शब्दाचे वाईट, बेकार, निर्थक, वाह्यातपणा, चिल्लर, क्षुद्र, हलक्या प्रतीचे असे अनेक अर्थ होतात.
पण हा शब्द मात्र फालतू नाही हं. चांगल्या उच्च कुळातील आहे बरं का! गमतीचा भाग सोडून द्या, पण हा शब्द आला आहे संस्कृत भाषेतून. ऐकून आश्चर्य वाटलं ना! खरं म्हणजे मूळ फल्गु या संस्कृत शब्दापासून फालतू या शब्दाची निर्मिती झाली आहे. फल्गु या शब्दाचे नि:सत्त्व, असार, क्षुल्लक, कुचकामी स्वल्प, दुर्बल, असत्य, निर्थक असे अर्थ ज.वि. ओक यांच्या लघुगीर्वाण कोशात दिले आहेत.
ज्या सणाला आचरटपणा, टवाळकी म्हणजेच फालतूपणा करण्याची मोकळीक असते असा सण म्हणजे होळी किंवा शिमगा. हा सण ज्या महिन्यात येतो तो महिना म्हणजे फाल्गुन मास. फल्गु या शब्दावरूनच फाल्गुन हा शब्दही तयार झाला आहे. फाल्गुन शब्दाचे मूळ हे असे आहे.
एखाद्या आचरट माणसाला त्याच्या आचरटपणाला पोषक असे वातावरण मिळाले आणि त्याने नसते धंदे केले तर त्या वेळी ‘आधीच उल्हास, त्यातून फाल्गुनमास’ ही म्हण वापरली जाते.
पण खरं म्हणजे फाल्गुन हा आपल्या कालगणनेतील वर्षांचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात निसर्गात पानगळ सुरू होते. वृक्ष आपली जुनी जीर्ण पानं ढाळतात. त्यामुळे नंतर येणाऱ्या वसंत ऋतूत त्यांना नवीन पालवी फुटते. त्याचप्रमाणे आपणही वर्षभरात केलेल्या चुका, आपल्यातील दोष फाल्गुन महिन्यात अर्थात वर्षांच्या शेवटी टाकून द्यायचे असतात. त्यांची होळी करायची असते. होळीचा हा सण साजरा करण्यामागची मूळ कल्पना ही आहे. तसे केले तर चैत्रापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत नवे संकल्प, नव्या कल्पना, आशा यांची पालवी मनाला फुटते. खरंतर ‘फालतू’ हा शब्द आपल्याला फाल्गुन महिन्यातील या कर्तव्याची आठवण करून देणारा आहे. म्हणून फालतू शब्दाकडे ‘फालतू’ म्हणून पाहू नका.
डॉ. उमेश करंबेळकर
Source : Loksatta (Link)