गोट्या

सुमारे १५ वर्षांपूर्वी टीव्हीवर ‘गोट्या’ नावाची मालिका सुरू झाली आणि त्या काळातली लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन गेली. तो आठवणींचा हिंदोळा होता. खरं तर ती मालिका सुरू झाली, त्या काळातल्या लहान मुलांना, त्या मालिकेतलं विश्व हे पूर्णपणे अनोखं होतं. अगदी अस्सल मराठमोळं असूनही! त्याला कारणच वेगळं होतं. टीव्हीच्या असंख्य मालिका घराघरांत जाऊन पोहोचल्यानंतर त्या मुलांचं भावविश्व बदलून गेलं होतं आणि त्यामुळेच त्यांना १९४०-५०च्या दशकातल्या त्या मराठमोळ्या वातावरणात काहीच सुचेनासं झालं होतं. पण त्या मुलांच्या आई-वडलांनाच नव्हे तर आजी-आजोबांनाही मात्र ती मालिका पाहावीशी वाटत राहिली याचं प्रमुख कारण म्हणजे टीव्हीचा जन्म होण्यापूर्वीचं ते विश्व त्यांचं होतं आणि तितक्याच अस्सलपणे ते लेखनातून उतरलं होतं. ते यश १९४०च्या दशकातले प्रख्यात बालसाहित्यकार ना. धों. ताम्हनकर यांचं होतं.

त्या म्हणजे १९४०च्या दशकात टीव्ही सोडाच रेडिओही दुर्मिळ असतानाच्या काळात माणसं आपला वेळ हा वाचनातच घालवत असणार, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. तरुण-तरुणींसाठी आणि प्रौढांसाठीही त्या काळात विविध प्रकारचं वाङ्मय सहजतेनं उपलब्ध होत असतानाच्या त्या काळात लहान मुलांसाठी फारसं काही वाचायला उपलब्ध नसे. ती गरज भा. ल. तथा काका पालवणकर यांनी ‘खेळगडी’ नावाचं मासिक सुरू करून मोठ्या प्रमाणात भरून काढली.

प्रामुख्यानं शाळकरी मुलांसाठी असलेलं ते मासिक अल्पावधीतच लोकप्रिय होऊन गेलं आणि त्याच मासिकातून ‘गोट्या’ नियमितपणे वाचकांच्या भेटीला येऊ लागला. ताम्हनकरांनी गोट्याची व्यक्तिरेखा इतक्या अकृत्रिम शैलीत साकार केली होती की बघता बघता तो तुमच्या आमच्या घरातलाच एक होऊन गेला. खरं तर तो कोणाच्याच घरातला नसतो.

एकुलती एक मुलगी असलेल्या एका कुटुंबाला हा मुलगा अवमानित जिणं जगत असताना सापडतो आणि ते दादा-वहिनी गोट्याला घरी आणण्याचा निर्णय घेतात. सुमाला तर भाऊ मिळतोच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुलामुलींना आपल्या हक्काचा असा एक सवंगडी खेळायला मिळतो.

गोट्या हा चतूर तर असतोच, त्याचबरोबर विनयशीलही. नाना प्रकारचे खेळ आणि बौद्धिक करामती त्याला अवगत असतात. त्यामुळेच तो केवळ दादा-वहिनी आणि सुमा यांचं त्रिकोणी कुटुंब चौकोनी करून सोडतो, असं नाही तर तुमच्या आमच्या घरातही आनंदाचं निधान घेऊन येतो.

ताम्हनकरांचा या लेखनामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पुढे या मालिकेचे पुस्तक रूपानं तीन भागांत प्रकाशन झाले, तेव्हा दुसर्‍या भागाच्या प्रस्तावनेत त्यांनी तो उघड केला आहे. ‘बालजनांशी हसून खेळून त्यांच्या मनोविकासाला मदत करणारा एखादा सवंगडी त्यांना मिळवून द्यावा, ही मनातली इच्छा गोट्याच्या रूपाने मूर्त स्वरूपास गेली…’ असे त्यांनी लिहिले आहे. काय करतो हा गोट्या नेमकं? तो शाळेत एक हुषार विद्यार्थी म्हणून गणला तर जात असतोच पण त्याचवेळी तो गुरूजनांना अडचणीत आणणार्‍या, शिक्षकवर्गाला त्रास देणार्‍या विद्यार्थ्यांची खोडकी जिरवण्याचं कामही मोठ्या कौशल्यानं करत असतो. हे करताना तो लहानपणी शाळेत मुलं ज्या युक्त्या-प्रयुक्त्या, योजतात, त्याच योजत जातो. प्रसंगी तो दांगडधिंगाही घालतो पण ते सारं करतानाचा त्याचा हेतू स्पष्ट असतो. त्याचवेळी तो घरातल्या सुमावर मनापासून माया करत असतो.

सुमा आणि तिच्या मैत्रिणींची कोणी छेड काढत असेल, तर तो त्या मवाल्यांना चांगलाच इंगाही दाखवतो. दिवाळीत तो आकाशकंदिल तर करणारच पण त्याचवेळी सुट्टीत काही थोडंफार काम करून मिळणारा अल्पस्वल्प मोबदला हा गरीब विद्यार्थ्यांच्या कामी लावणार!’ मग असा हा सत्शील गोट्या तुमच्या आमच्या मनावर गारूड घालून न जाता तरच नवल…

आज गोट्या तुमच्या आमच्या भेटीला आला, त्यास जवळपास सात दशकं लोटली आहेत. तरीही गेल्या पिढीबरोबरच आजच्या सुजाण विद्यार्थीवर्गालाही तो हवाहवासा वाटतो, यापेक्षा ताम्हनकरांच्या लेखनाचं आणखी यश ते काय सांगायचं?

Leave a Reply

Your email address will not be published.