भालचंद्र मुणगेकर हे नाव गेल्या काही वर्षांत केवळ मराठी वर्तुळापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. मुणगेकर हे ३५ वर्षांपासून समाजकारणात आहेत आणि आंबेडकरी विचारांवर अतूट निष्ठा ठेवून ते विविध सामाजिक, राजकीय आणि आर्थिक चळवळींमध्ये हिरिरीनं भाग घेत आले आहेत. या ३५ वर्षांच्या काळातील मुणगेकरांचा प्रवास हा थक्क करून सोडणारा आहे. मुणगेकर रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते. ती नोकरी सोडून ते पुढे मुंबई विद्यापीठात प्राध्यापक झाले. पुढे त्याच विद्यापीठाचे कुलगुरू झाले आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती देशाची सूत्रं आल्यावर त्यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या पायरीवर असलेल्या माणसाशी बांधिलकी असलेल्या मुणगेकरांना संपूर्ण देशाच्या नियोजन आयोगाचं सदस्यत्व बहाल केलं. आता मुणगेकर हे समाजातील एक महनीय व्यक्तिमत्त्व बनलं आहे आणि ते काही त्यांच्या या राजकीय धर्तीच्या निवड-नेमणुकांमुळे बिलकूलच नाही. तर एका पाठोपाठ एक अशी महत्त्वाची पदं चालत आल्यानंतर त्यांचा वापर मुणगेकरांनी हा समाजातील दुर्बल-वंचित आणि शोषित घटकांना काही ना काही मिळवून देण्यासाठीच केला म्हणून मुणगेकर हे नाव आज महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात अग्रभागी राहिलं आहे.
पण त्यामुळेच मुणगेकरांची जडण-घडण नेमकी कशी झाली आणि नेमक्या कोणत्या मुशीतून हे व्यक्तिमत्त्व जन्मास आलं, याबद्दलही अनेकांच्या मनात कमालीचं कुतुहल निर्माण होणं, हे स्वाभाविकच म्हणायला हवं. ‘मी असा घडलो’ या आत्मचरित्रातून मुणगेकरांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न केला आहे, असं म्हणण्याचं कारण एवढंच की मुणगेकरांनी हे आत्मचरित्र त्यांचं शालेय जीवन संपतं, त्या टप्प्यावर आणून सोडून दिलं आहे! शाळेची पायरी ओलांडून बाहेर पडल्यावरच मुणगेकर चळवळीत उतरले आणि त्यांच्या जीवनाला एक नवेच वळण लागलं.
त्यामुळे त्यानंतरच्या पुढच्या ३५ वर्षांची त्यांची जीवनकहाणी ही कदाचित अधिक रंगतदार, उत्कंठावर्धक आणि त्यामुळेच अधिक वाचनीय होऊ शकली असती. पण मुणगेकरांनी तो मोह टाळून आपलं कोकणातलं बालपण आणि पुढे मुंबईतलं शालेय जीवन एवढ्यापुरतीच ही कहाणी मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्यामुळेच नेमक्या कोणत्या संस्कारातून हे मुणगेकर नावाचं रसायन जन्माला आलं, त्याची अत्यंत रसाळ आणि मनोवेधक कहाणी आपल्यापुढे साकार झाली आहे.
अर्थात, मुणगेकरांसाठी हा ‘बालपणीचा काळ सुखाचा’ बिलकूलच नव्हता. उलट कोकणातलं अठराविश्वे दारिद्र्य आणि मुंबईत आल्यावर नातेवाईकाच्या वळचणीला राहून काढावे लागलेले दिवस, यातून मुणगेकरांची जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच सामोरी येत जाते आणि थक्क व्हायला होतं. मुणगेकर सांगतात : कोकणातल्या त्या खडतर काळात लाभलेला खराखुरा मित्र आणि गुरू होता आबा. आबाचे व्यक्तिगत जीवन हे माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. त्याने आम्हा भावंडांसाठी केलेले अपार कष्ट, ते करताना त्यातील आम्हाला जाणवणारदेखील नाही इतका सहजपणा, आमच्या मोठ्या कुटुंबासाठी त्याचा सतत वाटणारा आधार… त्यांच्याविषयीची त्यांच्या मनातील अपार करुणा, या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंकडे पाहिलं की त्याला हे कसं अवगत झाले, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे.
आबा म्हणजे अर्थातच मुणगेकरांचे वडील. कोकणात मुणगेकरांनी अवघी ८-१० वर्षं काढली. पण त्या काळात हा आबाच त्यांच्या जीवनाचं सर्वस्व होता. त्यांच्याविषयीची अपरंपार कृतज्ञता अत्यंत प्रांजळपणानं व्यक्त करतानाच, मुणगेकरांनी आपली आई, आजी आणि विशेषत: चार वर्षांनी लहान असलेली बहीण यांचीही व्यक्तिमत्त्वे अत्यंत रसरशीतपणे उभी केली आहेत. त्या सर्वांच्या वागण्याबोलण्यातून मिळालेलं संचित घेऊनच मुणगेकर मुंबईत आले आणि परळच्या नवभारत विद्यालयात दाखल झाले. तेव्हापासून त्यांच्या जीवनाला एक वेगळंच वळण लागलं. हे घडलं ते तेथील शिक्षकांमुळे. शरद चित्रे, बा. बा. ठाकूर आणि श्रीमती लीला ठाकूर या तीन शिक्षकांचा यासंदर्भात मुणगेकरांनी खास उल्लेख केला आहे.
मुणगेकरांचं मुंबईत येणं, मिळेल त्या परिस्थितीशी जुळवून या महानगरीत पाय रोवणं आणि पुढे भेटलेल्या या आणि अन्य शिक्षकांनी दाखवलेल्या स्वप्नांच्या शिदोरीवर पुढची वाटचाल करणं, हे सारं मुळातूनच वाचायला हवं. आठवणींचा हा प्रवास मुणगेकरांबरोबर आपल्याला कधी थेट कोकणात, तर कधी परळच्या नवभारत विद्यालयात घेऊन जातो आणि मन हेलावून जातं. या सार्या प्रवासात मुणगेकरांना आणखी एका महामानवाची साथ असते. ते महामानव म्हणजे अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मुणगेकरांच्या जीवनावर असलेला त्यांचा प्रभाव या छोट्या आत्मकथेतही पानोपानी जाणवत राहतो आणि त्याचवेळी मुणगेकरांच्या आगामी जीवनप्रवासाची दिशाही सूचित करत जातो….