समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य, संगीतमय अविष्कार म्हणजेच प्रयोगात्म लोककला. मौखिकता हा लोककलांचा प्राण असतो. तर या मौखिकतेची प्रयोगात्मकता हा प्रयोगात्म लोककलांचा आत्मा असतो. प्रयोग नेहमीच उपयोजित असेल असे नाही. किंबहुना लोकसाहित्यांर्तंगत असणार्या प्रयोगात्म कला या उपयोजित नसून सहज स्वाभाविक असतात. या सहज स्वभाविक आविष्कारांमध्ये ओवी आणि शिवी हे दोन्हीही मानवी भावभावनांचे सहजोद्गार आहेत. ओवी आणि शिवी ह्या भावनांच्या विरेचनाचा एक मार्ग म्हणूनही ओळखल्या जातात. हे दोन्ही आविष्कार सशक्त मौखिक आविष्कार होत. ओवी आणि शिवी आविष्कृत होतांना त्यामागे काही विशिष्ट संकेतांची परंपरा असते. आणि हे संकेत परंपरेने निश्चित केलेले असतात. स्थल, काल, व्यक्तीपरत्वे ओवी आणि शिव्यांमधील संकेतांमध्ये विविधता दिसली तरी त्यातून प्रगट होणारे कल्पबंध काही वैष्विक तर काही स्थानिय स्वरूपाचे असतात.
ओव्या आणि शिव्यांमधून त्या त्या समाजघटकाची सभ्यता आणि संस्कृती प्रत्ययास येते. ओव्या आणि शिव्यांमागे विशिष्ट हेतू असतो. विशिष्ट रितीरिवाज, नातेसंबंध, स्त्री-पुरूष संबंध, देवदेवतांविषयीची मानसिकता, विशिष्ट संकेत यांचे दर्शन ओव्यांमधून आणि शिव्यांमधून होते. ओव्या ह्या सदैव सकारात्मक असतात. तर शिव्या ह्या नकारात्मक असतात. नकारात्मक शिव्यांना शिमग्याला एक धार्मिक शुचिता प्राप्त होते. मनात सुष्ट भावनांसारख्याच दुष्ट भावना असतात. या दुष्ट भावनांचे विरेचन शिव्यांव्दारे होते. शिव्यांना आपण विवेकशुन्य प्रलाप म्हणू शकतो. ओव्यांमध्ये स्त्रीच्या विविध रूपांचे दर्शन घडते. या रूपांमध्ये खेळण्याच्या अल्लड वयात लग्न झालेल्या मुलीचे बालमन अजूनही माहेरी, आईमध्ये अडकलेले आहे. म्हणूनच
मायलेकीचं भांडण, जशी दुधाची उकळी,
बया मनाची मोकळी।
आईवाचून माया कोणाची दिसेना,
पावसावाचून रान हिरवे दिसेना।
हळवेपणा, सुखदु:खात सहभागी होण्यासाठी आवश्यक सोशिकता, मायेचा ओलावा हे गुण आईच्या जागी एकवटलेले असतात. म्हणूनच प्रत्येक मुलीला –
आईवाचून माहेर, कंथावाचून सासर।
पावसावाचून रान, कसं दिसतं भेसूर।।
आईवाचून माया, कुणाची दिसेना।
पावसावाचून रान, हिरवं दिसेना।।
असंच वाटतं.
विधवा स्त्री ही कुटुंबाच्या दृष्टीने उपेक्षित असते. कदाचित म्हणूनच विधवा स्त्री ही ओव्यांचा विषय झालेली कधीच दिसत नाही. नवर्याच्या आधी अहेवपणी मरण यावे हीच संसारी स्त्रीची इच्छा ओव्यांमधून व्यक्त होताना दिसते –
आहेव मरण, माय बाईनं साधलं।
हळदीकुंकवाचं लेणं, पदरी बांधलं।।
विधवा स्त्रीप्रमाणेच पोटी पुत्र नसलेल्या स्त्रियांची स्थिती देखील दयनीय असते. समाजात तिला वांझोटी म्हणून हिणवले जाते.
वांझोटी, वांझोटी, झाली कशानं वांझोटी।
दैवाची पुरी खोटी।।
अशा ओव्यांमधून तिच्या खोट्या दैवाची कैफियत मांडली जाते. परंपरेने चालत आलेल्या मौखिक वाङ्मयात आईच्या नात्यानंतर मावशी किंवा आत्या या नात्याबाबत आदराने बोलले जाते.
इथून दिसे मला वाटते माझी आई,
नवस फेडू आसली मावशीबाई
साधारणपणे सासूचं वर्णन सुनेचा छळ करणारी, सासुरवास करणारी असं असतं. नशिबाला दोष देत सारं काही सोसल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे
सासूचा सासुरवास सोसावा लेकीने।
कुळवंताच्या लेकीनं।।
किंवा
सासूचा सासुरवास सोसल्याने काय होतं।
दोन्ही कुळा नाव येतं।।
अशा ओव्यांमधून आई आपल्या लेकीची मानसिक तयारी करत असते.
शिव्या या नातेसंबंधांचे दर्शन घडवितात. त्यांच्या अभिधामूलक अर्थापेक्षा लक्षार्थ आणि व्यंगार्थावर अधिक लक्ष केंद्रीत केलेले असते. एखाद्या इंजिनाची वाफ जशी जोरकसपणे बाहेर पडते तषा शिव्यांद्वारे मानवी भावना व्यक्त होतात. शिव्या आणि ओव्या या दोन्हीही लोकसंस्कृतीत नांदताना दिसतात.