देवाने प्रत्येक जीव निर्माण करताना खूप काळजीपूर्वक त्याची जडणघडण केलेली असते. आपल्याला लाभलेला हा जन्म देवाचे देणे असे आपण मानतो आणि तो जन्म सार्थकी लावायचा प्रयत्न करतो. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा जपत जपत त्यात पश्चिमात्य लोकांचे आचार विचार आपल्यावर भारी पडणार नाही ना याची काळजी घेत असतो. तरीसुद्धा कधीकधी ही परिस्थिती आपल्या अंगाशी येणार आणि आपल्या संस्कृतीचा नाश करणार असे वाटत राहते. मनाने घट्ट, खंबीर रहाणे आणि त्याच्या आदेशाने आपल्या जीवनाचा हा महामेरू उचलून धरणे सहाजिकच सर्वांना शक्य होत नाही आणि अशा अवस्थेत पाय घसरतात, तोल जातो, मन अस्वस्थ होते, अंध:कार जाणवायला लागतो, एका विषिण्ण भुयारात आपण पडलो आहोत असे होते. कुटुंबाचा आधार म्हणूनच फार महत्त्वाचा ठरतो. एकमेकांना सहाय्य करून, मने जपून आपल्या समस्या चुटकीसरशी सोडू शकतो.
कुटुंबापासून मनाने नाही पण तनाने कामानिमित्त लांब गेलेल्यांची दूरध्वनीवरून का होईना विचारपूस करत राहिले पाहिजे. अनोख्या देशात गेलेली व्यक्ती आपल्यापासून तुटणार नाही ना यासाठी सतत संपर्कात राहायला पाहिजे. आजच्या युगात व्हॉट्सऍप, व्हिडिओ कॉल, फेसबूक अशा डिजिटल युगामुळे आपण एकमेकांच्या जवळच आहोत असे वाटते. त्यामुळे या संगणकीय युगाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. पूर्वी लांब गेलेल्या व्यक्तीला भेटणे म्हणजे एक दिव्यच होते. त्यांची खुशखबर मिळेपर्यंत महिनोंमहिने जायचे.
आपल्या जीवनात सहजतेने मिळते त्या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही. आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधान मानून ते जतन करून त्यात उत्कर्ष करत गेले पाहिजे. जगावर आलेल्या संकटावर प्रत्येक राष्ट्र जसे आपापल्या परीने लढा देत आहे. आधुनिकीकरण करण्याच्या नादात आपण नैसर्गिक संपत्तीचा नाश तर नाही ना करत या कडे डोळे उघडून सतर्कतेने पहाण्याची गरज त्यामुळेच निर्माण होते. महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वाढत असलेला धोका मग तो नैसर्गिक असो किंवा मानव निर्मित आपण पेपर मध्ये वाचतो आणि मग छातीत धस्स् होते. आपण कशाप्रकारे हा नाश थांबवू शकतो यावर विचार करणे गरजेचे आहे नाही तर आणखीन काही वर्षांनी मुंबई ही स्वप्नांची नगरी होती असे फक्त गोष्टींमध्ये सांगायची वेळ येईल असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? सांगा हां……
भेटूया पुढच्या लेखात…….. धन्यवाद
लेखिका:- सौ. साधना अणवेकर