फ्लेवर्ड मिल्क ः नुसते दूध प्यायचा कंटाळा येतो. कारण, नुसत्या दुधाची चव काही वेळा मुलांना आवडत नाही. मग शेवटी काही तरी चव बदलून मुलांनी दूध प्यावे, यासाठी चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर टाकून दूध प्यायला द्यावे. त्यामुळे कदाचित मुले आवडीने दूध प्यायला लागतील. तसेच दुधामध्ये फळे घालून त्याचा मिल्कशेक करून दिल्यास मुले आवडीने दूध पितात. मुलांच्या आवडीची फळे वापरली तर मुले आनंदाने आवडीने दूध पितात.
न्याहारीआधी दूध ः मुले भुकेली असतात, तेव्हा दूध पटकन पिऊन टाकतात. त्यासाठी न्याहारी देण्यापूर्वी मुलांना दूध प्यायला द्यावे. भुकेपोटी मुले दूध चटकन पिऊन टाकतात. अगदी लहान मुलांशी खेळता खेळता दूध प्यायला द्यावे. खेळण्याकडे लक्ष असल्याने मुले मुकाट्याने दूध पिऊन टाकतील.
रोज मिल्क ः हा प्रकार मुलांना खूप आवडतो. कारण, त्याची चव आणि गुलबट रंग. थंड दूध घेऊन त्यात गुलाबाचे इसेन्स आणि साखर घालावी. त्यातच बदाम, काजूचे काप घालून छान मिसळावे. मोसमात उपलब्ध असल्यास स्ट्रॉबेरी कापून त्याचे तुकडे दुधात टाकून ते मुलांना प्यायला द्यावे. यामध्येही कॅल्शियमचे प्रमाण वाढते. हाडे आणि दातांच्या वाढीसाठी ते उपयुक्त ठरते.
कार्टूनचा फेव्हरिट कप : मुलांना टीव्हीवरील एखादे कार्टून आवडत असतेच. मग मुलांना दूध प्यायला देताना त्यांच्या आवडीच्या कार्टूनच्या कपात देऊन पाहा. आवडीच्या कपामध्ये रमून मुले दूध पिऊन टाकतील. आवडत्या कार्टूनमुळे दूध प्यायची कटकट ते करणार नाहीत. या काही क्लृप्त्या लढवून मुलांना दूध प्यायला लावून त्यांचे पोषण घडवण्याचे उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो.