कुणी आपल्या छंदातील सर्वोच्च कौशल्य प्राप्त करण्याचा ध्यास घेतलेला असतो किंवा कुणी एखादी कला आत्मसात करत असतो. अभ्यासक्रमाचा भार त्याच्याबरोबरच जोडीला आणखी एखादा कोर्स करायचा किंवा वेगळं आणखी काही शिकायचं म्हणजे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार पडत असतो; मात्र आजच्या काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना हा भार पेलणं अनिवार्य बनत चालले आहे.
एकावेळी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकणं, त्यातलं शिक्षण, प्रशिक्षण पूर्ण करत राहणं याला आजच्या जमान्यात पर्याय नाही, असं म्हटलं जातंय. तुमच्याकडे जितकं जास्त आणि जितकं वैविध्यपूर्ण कौशल्य तितकी मार्केटमध्ये तुम्हाला डिमांड जास्त, असं काहीसं कारण त्यामागे दिलं जातं. त्यामुळेच आज अनेक विद्यार्थी आपला नियमित अंडरग्रॅज्युएट कोर्स करत असतानाच जोडीला आणखी एखादा कोर्स करत असतात. हा कोर्स सध्या करत असणार्या कोर्सशी संबंधित असा व्यावसायिक पदवी कोर्स असू शकतो किंवा तो अभ्यासक्रमाशी अजिबातच संबंधित नसूही शकतो. यासंदर्भाने विचार केला, तर आपल्याला जाणवतं, की आपल्यातला कुणी एखादी परकीय भाषा शिकत असतो, कुणी कॉम्प्युटर प्रशिक्षण घेत असतो, तर कुणी ते अपडेट करत असतो, कुणी आपल्या छंदातील सर्वोच्च कौशल्य प्राप्त करण्याचा ध्यास घेतलेला असतो किंवा कुणी एखादी कला आत्मसात करत असतो.अभ्यासक्रमाचा भार त्याच्याबरोबरच जोडीला आणखी एखादा कोर्स करायचा किंवा वेगळं आणखी काही शिकायचं म्हणजे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार पडत असतो; मात्र आजच्या काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना हा भार पेलणं अनिवार्य बनत आहे, हेही तितकंच खरं. अशावेळी एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असा एखादा अतिरिक्त अभ्यासक्रम करण्याचं ठरवता, तेव्हा आपलं नेमकं ध्येय, त्यावर लक्ष केंद्रित करणं, शिस्त अशा सर्वच बाबी लक्षात घ्यायला हव्यात. फक्त या सगळ्या कसरतीत हे विद्यार्थी, विद्यार्थिनी आपला प्राधान्यक्रम ठरवतात की नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्ही अशी कसरत करत असाल, तर पुढील टिप्स तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
सर्वप्रथम जास्तीचा कोर्स आपल्या करिअरसाठी किती उपकारक ठरू शकतो अथवा नाही, हा विचार करा. जो कोर्स/क्लास बराच वेळ असतो किंवा त्या क्लासला येण्या-जाण्यासाठी तुम्हाला बराच वेळ खर्च करावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, तर अशा एखाद्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. असा कोर्स करताना तुम्ही शारीरिक आणि मानसिकरीत्या सशक्त असणं आवश्यक आहे. यासाठी अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप, सुट्टी या सगळ्या गोष्टी समजून त्यानुसार योग्य नियोजन करा. कठीण आहे किंवा थोडं अपयश आलं म्हणून तो मार्ग सोडून देऊ नका. अशी वेळ आलीच, तर तो कोर्स सोडून देण्याआधी आपल्या परिस्थितीचा, कोर्सचा वस्तुनिष्ठपणे विचार करा. काही वेळेस तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा/प्रोत्साहन मिळवावं लागेल आणि त्यात वावगं काही नाही, हेही लक्षात असू द्या.
तुम्ही जो दुसरा कोर्स करत आहात, तो तुमच्या नियमित अभ्यासक्रमाशी संबंधित असेल, तर हा अभ्यासक्रम आणि त्यातील संकल्पना समजून घेण्यासाठी आपला वेळ खर्च करा. या दोन्ही अभ्यासक्रमांची तुलना करण्यात, त्यातील वेगळेपण शोधण्यात वेळ घालवू नका. आपल्या अभ्यासक्रमाचा हा विस्तारित भाग आहे, असं समजून अभ्यास करा. आपल्या नियमित अभ्यासक्रमाबरोबरच या कोर्सच्या अभ्यासाचं नियोजन करा. आपल्या नियमित अभ्यासाबरोबरच या कोर्सवरही लक्ष केंद्रित करा आणि आपल्या रिझ्युममध्ये महत्त्वाची भर घाला.
आपल्या छंदासाठी, त्यात कौशल्य मिळवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी किंवा आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार-रविवारी तुम्ही वेळ देऊ शकता; मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, या कोर्सच्या ध्यासापायी आपल्या नियमित अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केव्हा आणि कुठे थांबायचं आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, याचा विचार करावा लागेल. अर्थात, तुमच्या छंदाकडे अतिरिक्त काम म्हणून पाहू नका, तर तुमच्या दैनंदिन कामातून ब्रेक मिळवून देणारा किंवा तुमची आवड पूर्ण करणारा हा कोर्स आहे, असं माना. छंदासाठी ओढाताण होऊ देऊ नका; पण थोडाबहुत वेळ त्यासाठी काढता येतो का, ते जरुर पाहा आणि त्याद्वारे तुमच्या तनामनाला नक्कीच तजेला मिळणार आहे, याची खात्री बाळगा.
– जगदीश काळे
Source : Pudhari News (Link)