कोणत्याही कार्यालयाच्या ‘चौकशी’ खिडकीचा अनुभव आपण प्रत्येकाने केव्हा तरी घेतलेलाच असतो. तो फारसा चांगलाही आलेला नसतो. चौकशी खिडकीवरील त्या कर्मचाऱ्याचा त्रासिक चेहरा, तुटक उत्तर, चौकशी करुन आपल्याला अपेक्षित माहिती न मिळणे असं बरंच काही आपल्याला सोसावं लागत. प्रवासातही बहुतांशी वेळ आपल्याला कटू अनुभवाचा प्रत्यंतर येत असतो. पण बऱ्याच दिवसांनी मला एस.टी. प्रवासाचा योग आला. हा प्रवास केव्हाच संपू नये अशा या झकास एस. टी. प्रवासाची अनुभूती.
सकाळची 6.30 ची वेळ. रत्नागिरी एस.टी. बसस्थानकावर थंडगार वातावरण हळुवारपणे प्रवाशांची लगबग वाढत होती. रत्नागिरी- सावंतवाडी बसची मी वाट पाहत होतो. 6.45 वाजता सावंतवाडी गाडी फलाटावर आली. रत्नागिरी कार्यालयाचा प्रभारी कार्यभार असल्याने तेथील काम उरकून मी सिंधुदुर्गनगरीच्या परतीच्या प्रवासासाठी बऱ्याच दिवसांनी सावंतवाडी एस.टी. बसमध्ये चढलो. या बसचे वाहक दिलीप लाड मध्यम उंचीचे, रुबाबदार दाढी व कल्लेदार मिशा कपाळावर गुलाल टिळा यांनी हसतमुख स्वागत केलं आणि नम्रपणे 9, 10,16 व 17 आसन आरक्षित असल्याची माहिती दिली. मला आश्चर्ययुक्त धक्का बसला. मनात विचार केला प्रवासी सौजन्य सप्ताह आहे काय ? मग हे वाहक महाशय एवढं सौजन्यपूर्ण व नम्रपणे का बर सांगत असावेत! असो मी 7 आसन क्रमांकावर स्थानापन्न झालो. सात वाजता आमची एस.टी. निघाली. कुवारबांव, हातखंबा पर्यंत निम्म्याहून अधिक बस भरली. वाहक दिलीप लाड बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना अगोदर बसून घ्या, पैसे नंतर द्या, हे तिकट अगोदर घ्या. विद्यार्थी मुले- मुली, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन महिला अशा प्रत्येक प्रवाशांबरोबर ते मालवणीतून विनोद वृत्तीने संवाद साधत होते. हातखंबा गेला पण त्यांच्या या स्वभावामुळे तसचं प्रवाशांशी आपुलकीने वागतात म्हणून मी कुतुहूल व कौतुकाने निरीक्षण करीत राहिलो. पालीला एक वृध्द गृहस्थ चढले. श्री. लाड यांनी त्यांना आपण स्वत: उभे राहून त्यांना बसायला जागा दिली. ‘खय जावूचा आजोबा’ असे म्हणून त्यांना तिकीट दिले आणि ते बसच्या केबीन मध्ये रिकामी सिटवर जाऊन बसले. त्यांची साथीदार चालक सुभाष चव्हाण यांचेवरही माझी बारीक नजर होती. तेही उत्साही दिसले. सारखे हातवारे करायचे, MH-07 पासिंग ओळखीची गाडी दिसली आनंदाने हॉर्न वाजवून त्या गाडीला बाय – बाय करायचे.
थोड – थोड धुक होते. चालक श्री. चव्हाण अत्यंत सफाईदारपणे बस चालवत होते. थोड्या वेळानं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गाण्याचे’ स्वर ऐकू आले. कोण गातयं असा मला प्रश्न पडला. अहो आश्चर्ययम् दिलीप लाड तल्लीन होऊन गाण म्हणत होते. चालक श्री. चव्हाण त्याला उत्स्फूर्त दाद देत होते. लांजा स्थानक आलं. गडबडीने श्री.लाड खाली उतरले. तिथे एक वयस्कर गृहस्थ उभे होते. त्यांची कागदपत्रांची पिशवी आदल्या दिवशीच्या प्रवासात एस. टी. मध्ये राहिली होती. ती पिशवी हसतमुखाने श्री. लाड यांनी त्या गृहस्थाच्या हातात दिली. त्या गृहस्थाचे डोळे पाणावलेले दिसले त्यांची महत्वा. ची कागदपत्रे असलेली पिशवी त्यांना परत मिळाल्याचा आनंद त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे दिसत होता.
चरवेली – कावडगावच्या वळणावर एस.टी. आली. शाळेत जाणारी सुमारे चाळीसभर मुले- मुलांनी एकच गलका केला. श्री. लाड यांनी सर्वांना शिस्तीत चढा, रिकाम्या जागी बसा, बाळग्या दंगा करु नको असा मालवणीत प्रेमाचा दम भरला. सर्वांचे पास पाहिले ज्या पासवर नाव नव्हती त्या विद्यार्थ्यांकडून पासवर नाव लिहून घेतली. त्याच्यानंतर ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ हे गाण लाड यांनी सुरु केलं. एस. टीतील प्रवाशांनाही त्यांचे गाणे म्हणणे आवडले होते.
तिथुन पुढेही अगदी सिंधुदुर्गनगरी स्टॉप येईपर्यंत श्री. लाड यांच सौजन्यपूर्ण प्रवाशांशी संवाद सुरुच होता दोन- तीन ठिकाणी स्टॉप नसतानाही चालक सुभाष चव्हाण यांनी वृध्द पुरुष, महिला यांना गाडी थांबवून गाडीत घेतलं. या दोघांची केमेस्ट्री चांगलीच जुळलेली दिसली. शेवटी मला राहवेना म्हणून कणकवली स्थानकावर मी लाड व चव्हाण यांची भेट घेतली आणि त्या उभयतांशी संवाद साधला.
श्री. लाड कृतज्ञतापूर्वक सांगू लागले साहेब प्रवाशांची सेवा हे पुण्याचं काम. मला ते करायला मिळत हे माझं भाग्य आहे. प्रवाशांना प्रामाणिक व सौजन्यपूर्ण सेवा देण हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो. हसत राहण्यामुळे आनंदी वृतीने काम केल्यामुळे मला मोठं समाधान मिळत. 27 वर्षे सेवा झाली. मी फोंडा गावचा रहिवाशी आहे. धार्मिक ग्रंथाच मोठ्या प्रमाणावर वाचन करतो. त्यामुळं माझी चित्तवृत्ती शुध्द आहे. बऱ्याच वेळा मी उभारुन प्रवास करतो. पण वृध्द महिला-पुरुष यांना माझी जागा देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला वेगळी उर्मी देऊन जाते.
बऱ्याच दिवसांनी केलेला एस. टी. प्रवास हा प्रवास संपू नये असचं मला वाटतं होत. केवळ सौजन्य सप्ताहातच जिभेवर साखर ठेवणारी पण इतर वेळी प्रवशांशी तिरसटपणे बोलणारे वाहक – चालक यांच्या पेक्षा मला या प्रवासात वेगळा अनुभव आला. बहुजन हिताय – बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य श्री. लाड व श्री. चव्हाण या जोडगोळीने अंगी बाणावलेलं आहे. सर्व वाहक – चालकांनी याचं अनुकरण केलं तर एस.टी. बसेस प्रवाशांनी ओसंडून जातील, असा मला विश्वास वाटतो. हल्ली वडापच्या जमान्यातील प्रवासाच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवासासाठी ‘गड्या आपली यस्टीच लई भारी’ असं वाटतयं. रत्नागिरी ते सिंधुदुर्गनगरी हा एस.टी. चा चार- साडेचार तासांचा प्रवास मला आनंददाई अनुभूती देऊन गेला.
-मिलिंद बांदिवडेकर,
जिल्हा माहिती अधिकारी
सिंधुदुर्ग