भारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा ही प्रामुख्याने दशावतारी मंडळांची कर्मभूमी. बाबी नालंग या दशावतारी कलावंताला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन नॅशनल थिएटर लोककला संशोधन विभागाने १९८० च्या दरम्यान दशावतार या लोककलेवर अमुलाग्र संशोधन केले. आय.एन.टी.चे संचालक अशोक परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तुलसी बेहेर यांनी दशावतारावर संशोधन केले. दशावतारी राजा नावाच नाटक लिहिले आणि या कलेवर प्रबंध सिद्ध केला.
रामायण, महाभारत आणि पुराणातील कथानके नाट्यरुपाने दशावतारात सादर होतात तो दशावताराचा उत्तररंग होय. गणपती, रिद्धी-सिद्धी, सरस्वती, शंकासूर, ब्रह्मदेव, विष्णू आदी पात्रांच्या साथीने रंगणारा पूर्वरंग म्हणजे आडदशावतार होय. विष्णुच्या दहा अवतारांचे संकीर्तन दशावताराच्या पूर्वरंगात असते. चि.कृ. दीक्षितांच्या मते शामजी नाईक काळे हे कर्नाटक प्रांती होते. तेथून ते आडिवर्यात आले त्यावेळी त्यांनी सोबत ‘दशावतार नाटक’ आणले. हा काळ इ.स.१७२८ होय.
समर्थ रामदासांच्या दासबोधात दशावतारी खेळाचा उल्लेख आहे तो असा –
खेळता नेटके दशावतारी तेथे येती सुंदर नारी
नेत्र मोडती नानापरी परी ते अवघे धटींगण
दशावतारात स्त्रीपात्र पुरुषच साकार करीत. त्यामुळे दशावतार सुंदर आणि ‘धटिंगण’ असल्याचा उल्लेख समर्थांनी केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यात १३६७ ते १४६८ या कालावधीत दशावतार व भागवत मेळ्या सारखे खेळ होत असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. गोरे नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने कर्नाटकातून दक्षिण कोकणात दशावतार आणला असे म्हटले जाते. वालावल ता. कणकवली येथील नारायणाच्या देवळात गोरेंनी आणलेल्या दशावताराची स्थापना झाली त्याची खूण म्हणून तेथे दगडाची स्थापना करण्यात आली. तो दगड अद्याप वालावल येथे आहे. दशावतार हा ग्रामोत्सवातील लोककला प्रकार आहे. कोकणात खळनाथ, सातेरी, सोनुर्ली, भूमिकर, केपादेवी, नारायण, रामेश्वर, पूर्वरत, वेतोबा, माऊली, खादनादेवी आदी देवदेवता आहेत. त्यांच्या ग्रामोत्सवात दशावतारी खेळ होतात.
ग्रामोत्सवात आधी पालखी निघते. या पालखीपुढे झांज, पखवाज वाजविले जातात. ढोल वाजविला जातो. भाविण या पालखीपुढे नाचते. पालखीनंतर दशावताराचा खेळ रंगतो. त्याआधी दशावताराच्या पेटार्यांचे पूजन केले जाते. दशावतारानंतर दहीकाला होतो. दशावतारात कृष्णाचे काम करणारा कलाकार दहीहंडी फोडतो.
दशावताराच्या इतिहासाचा शोध घेतला असता कळसुत्री बाहुल्या व चित्रकथी परंपरेचे मानुषीकरण म्हणजेच दशावतार होय असा सिद्धांत कॅप्टन मा.कृ. शिंदे यांनी मांडला आहे. ज्या दक्षिण कोकणात दशावताराची परंपरा आहे तेथेच म्हणजे आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथे चित्रकथी आणि कळसुत्री बाहुल्यांची परंपरा आहे.
नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम असणार्या दशावतारात गायक, सूत्रधार आणि वाद्यवृंद यांना विशेष महत्त्व असते. हार्मोनियम, पखवाज, झांज चकवा ही प्रमुख वाद्ये दशावतारात असतात. पूर्वरंगात विष्णूच्या दहा अवतारांचा उल्लेख गाण्यातून सूत्रधार गायक करतो. ‘नमन गणराया पहिले नमन गणराया गणपतीया तुझे नाम तव स्मरणे हो’ अशा सूत्रधाराच्या आवाहनात गणपती रंगस्थळी येतो. ‘मूषक वाहना गजानना थैया’ अशा आवाहनात रिद्धी-सिद्धी यांच्या नर्तनासह गणपती येतो.
धाव जगदंबिके पाव वेगे त्वरे
मयूरावर बैसोनि पाव तू सरस्वते
असे आवाहन सूत्रधार करतो. मग सरस्वती येते. शंकासूर ब्रह्मदेवाचे वेद चोरून नेतो, शंकासूर-विष्णू यांचे युद्ध होते. विष्णूच्या गदाप्रहाराने संकासूर जर्जर होतो व वरदान मागतो. ‘माझ्या आधी तुझी म्हणजे शंकाची पूजा होईल.’ असे वरदान विष्णू शंकासुराला देतो. या पूर्वरंगानंतर मग उत्तररंगात नाट्यरूपाने कथा सादर होते.
राजा रुक्मांगर, श्रीयाळ-चांगुणा, राज हरिश्चंद्र, द्रौपदी वस्त्रहरण, कीचक वध, आदी कथा दशावतारात सादर होतात. दशावताराच्या उत्तररंगात जी कथा सादर होते ती प्रामुख्याने नाटकासारखी सादर होते. या नाट्यरुप कथेतील कवने ही नाट्यसंगीताच्या बाजाची असतात. ओमप्रकाश चव्हाण नावाच्या दशावतारी कलावंताने स्त्री पात्र अतिशय उत्तमरित्या सादर करुन दशावतार कलेचा लौकिक वाढविला आहे. मोचेमाडकर, पार्सेकर, कलिंगण, वालावलकर, चंदवणकर आदी दशावतारी कंपन्या कोकणात प्रसिद्ध आहेत.
‘दशावतार’ ही कोकणातील अस्सल लोककला असून काळाच्या ओघातही ही कला टिकून आहे. कारण स्थल, काल सापेक्ष बदल दशावतारात लोककलावंतांनी केले आहेत.