कोल्हापूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरचं छोटंसं गाव खिद्रापूर. कोल्हापूरहून जयसिंगपूर-कुरुंदवाड मार्गे खिद्रापूरला जाता येते. सकाळी लवकर निघून नरसोबाची वाडी, खिद्रापूर, बाहुबली असे सगळे फिरून संध्याकाळपर्यँत मुक्कामाला कोल्हापूरला पोहोचता येते. खिद्रापूरला जाण्याचा रस्ता तितकासा चांगला नाही पण जर वाट थोडी वाकडी कराल तर खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची कोरीव शिल्पे दिवस सार्थकी लावल्याचे पुरेपूर माप तुमच्या पदरात टाकतील.
मंदिराचा परिसर तसा सुनासुनाच वाटेल. आजकाल बर्याच देवादिकांच्या नशीबी जसा भक्तगणांचा आणि पैशाचा ओघ असतो तसा अजून तरी या कोपेश्वराच्या नशीबी नाही. पाच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचा भरभक्कम इतिहास पाठीशी असून आणि कोरीव शिल्पाकृतींचे अनमोल लेणे लेवूनही हे ठिकाण भक्तगण, कलाप्रेमी किंवा पर्यटक सर्वांकडून तसे उपेक्षितच राहिले आहे. कदाचित त्यामुळेच मंदिराच्या ठायी अपेक्षित असणारा निवांतपणा मात्र इथे भरपूर लाभतो.
हत्ती हा जरी वैभवाचं प्रतीक मानला जात असला तरी या मंदिराचं वैभव हेच की या मंदिराचा भार 92 हत्तीनी आपल्या शिरावर पेलला आहे. मंदिर तसे दुर्लक्षित राहिल्यामुळे असेल किंवा इतर काही विध्वंसक कृतींमुळे असेल आज मात्र हे मंदिर सोंड तुटलेल्या हत्तींच्या शिरावर असल्यासारखे वाटते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेले १२ खाब १२ राशींचे मानले जातात. पूर्वीच्या काळी मंदिरं बांधणारे आपल्या भौगोलिक, खगोलशास्त्र विषयक किंवा अन्य ज्ञानाचा प्रत्यय अशा प्रकारे देत असावेत किंवा नंतर ते पाहणारे आपल्या परीने त्याचा अर्थ लावत असावेत. मंदिरात प्रवेश केल्या-केल्याच मध्यभागी गोलाकार खुल्या छताचा भाग लक्ष वेधून घेतो. तिथे केल्या जाणा-या होमाचा धूर थेट बाहेर जावा म्हणून छताचा केलेली ही सोय. होमाचे हे स्थान म्हणजे मंदिरातील स्वर्गमंडप.
मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेले १२ खाब १२ राशींचे मानले जातात. पूर्वीच्या काळी मंदिरं बांधणारे आपल्या भौगोलिक, खगोलशास्त्र विषयक किंवा अन्य ज्ञानाचा प्रत्यय अशा प्रकारे देत असावेत किंवा नंतर ते पाहणारे आपल्या परीने त्याचा अर्थ लावत असावेत. मंदिरात प्रवेश केल्या-केल्याच मध्यभागी गोलाकार खुल्या छताचा भाग लक्ष वेधून घेतो. तिथे केल्या जाणा-या होमाचा धूर थेट बाहेर जावा म्हणून छताचा केलेली ही सोय. होमाचे हे स्थान म्हणजे मंदिरातील स्वर्गमंडप.
खिद्रापुरचे शिवमंदिर कोपेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराची माहिती देणारी पुस्तके किंवा कसलेही फलक इथे आढळत नाहीत. मंदिरासमोर खिद्रापूर गावाची लोकसंख्या २२०७ असल्याची माहिती दर्शवणारा एक छोटा फलक तेव्हढा आढळतो. जनगणना कधीची त्याचाही उल्लेख नाही. मंदिराची व्यवस्था पाहणा-या कुटुंबातील बाईंनी मंदिराची माहिती दिली. पाहुण्यांना आपले घर दाखवावे अशा अगत्याने मंदिर दाखवले आणि कोपेश्वराची सर्वश्रुत कथाही सांगितली. खिद्रापूर महाराष्ट्राच्या सीमेवर, कृष्णा नदीच्या काठी. पलीकडच्या काठावर कर्नाटकात येडूर गाव. खिद्रापुरात शिव-पार्वतीचे वास्तव्य, तर दक्षिणेला येडूर गावी पार्वतीचे माहेर. एकदा पार्वतीच्या माहेरी एक यज्ञ होणार होता, पण शिव-पार्वतीला यज्ञाचे निमंत्रण नव्हते. पार्वती विचार करते, नव-याला माहेरी निमंत्रण नसताना त्याने जाणे बरोबर नाही पण मला माझ्या वडिलांकडे जायाला निमंत्रण कशाला हवे? पार्वती नंदीला सोबत घेऊन आपल्या माहेरी जाते. निमंत्रण नसताना आल्याबद्दल पार्वतीच्या बहिणी तिचा अपमान करतात. अपमान सहन न होऊन पार्वती यज्ञात उडी घेऊन आत्मसमर्पण करते. शंकराला जेंव्हा खिद्रापुरात हे वृत्त कळते तेंव्हा तो संतप्त होतो व तांडव नृत्य सुरू करतो. त्याला शांत करण्यासाठी विष्णू येतो. शिव कोपला म्हणून इथे त्याला कोपेश्वर शिव महणून ओळखले जाते. मंदिरात शिव आणि विष्णू (हरि-हर) दोघेही लिंगरूपात आहेत.
येडूर गाव दक्षिणेला. त्या दिशेला गेलेल्या पार्वतीची वाट पाहणारा शिव दक्षिणाभिमुख आहे. दक्षिणाभिमुख असणारे हे बहुधा एकमेव मंदिर. मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या गणपती आदि देवादिकांच्या मूर्तीही पार्वतीच्या प्रतीक्षेत दक्षिणेला तोंड करून आहेत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिवमंदिर असूनही मंदिरासमोर नंदी नाही. कसा असेल? तो तर पार्वतीसोबत येडूरला गेला होता ना! पार्वतीशिवाय परतणार कोणत्या तोंडाने ? येडूरहून तो परत आलाच नाही. कृष्णेच्या पलीकडच्या काठावरच्या त्या येडूर गावात बिचारा नंदी उत्तरेला तोंड करून एकटाच बसला आहे म्हणे. मंदिराशी संबंधित ही कथा, ज्या आपुलकीने ती सांगितली गेली त्यातला आपलेपणा, कथेतील देवादिकांचे मानवीकरण विलक्षण आवडलं आणि मनात आलं. एकदा त्या येडूर गावात जाऊन एकट्याच बसलेल्या उत्तराभिमुख नंदीलाही भेटून यायला हवं.
परत निघताना लक्षात आलं की इथे जेवणाखाण्याची सोय तर सोडाच साधी चहाची टपरीही नाही. हल्ली काही कुटुंबं पूर्वसूचना दिल्यास जेवणाची व्यवस्था करतात असे समजले, पण खात्री नाही. चहाची चौकशी केली तर जयसिंगपुरात जावे लागेल असे सांगण्यात आले. मंदिराच्या कोरीव शिल्पाकृती पयर्टकांच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे हे खरे; पण पयर्टकांना आकर्षित करू शकतील अशा सोयी-सुविधा मात्र आज तरी इथे उपलब्ध नाहीत. पर्यटन क्षेत्र म्हणून मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याचे ऐकले. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आणि विनियोग कधी आणि कसा होईल ते कोपेश्वरच जाणे. कोपेश्वराची पार्वती प्रतीक्षा भले न संपणारी असेल पण मंदिर परिसराच्या विकासाची मात्र फार काळ प्रतीक्षा करावी लागू नये.
छाया राजे