मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि नंतरच्या वर्षी प्रिपरेटरी. प्रत्यक्ष कोर्सला प्रवेश घेण्यापुर्वी किमान 3 वर्ष मी अविनाश धर्माधिकारी हे नाव ऐकत होतो. दहावीच्या शेवटी शेवटी मी ‘आपण त्यांच्या समान व्हावे’ ही धर्माधिकारी सरांची व्याख्यानमाला ऐकली होती. माझ्या सुदैवानी मला संपूर्ण व्याख्यानमाला मिळाली नव्हती. (सुदैव हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे) साधारण दहावीच्या शेवटीपासून बारावीच्या निकालापर्यंत मी फक्त शिवाजी आणि महात्मा गांधी यांच्यावरची व्याख्यानं ऐकत होतो. त्याच्या जोडीला शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर हे होते. या तिघांची बोलण्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी होती. शिवाजीराव अतिशय शांत, संथ पण मंत्रमुग्ध करणारं बोलायचे. राम शेवाळकर मात्र आवेशपुर्ण पण गंभीर आणि विचारप्रवृत्त करणारं बोलायचे. धर्माधिकारी सरांची स्टाईलही वेगळी होती.

आता या सर्व गोष्टी घडून, उलटून जवळ जवळ 10 वर्ष होत आली. आता मी थोडा सेट झालो, आता चार लोकं कौतुकानी बघतात, 2 लोकं कौतुक करतात, एखादा तर आदरानीही बघतो. मधल्या 10 वर्षांत खुप गोष्टी पुढे सरकल्या. आता लोकं आई बाबांना सांगतात की मुकुल वेगळा आहे, खुप शांत आहे, खुप विचार करतो, असा मुलगा मिळणं भाग्य असतं वगैरे.. या सगळ्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा विचार करतो की मी काय केलं? काय वेगळं केलं ज्यामुळे मी समजूतदार झालो? विचारी झालो? आणि मला आठवतं की मी या लोकांच्या भाषणांची पारायणं केली होती. त्यातली अनेक तर माझी अजुनही पाठ आहेत. या भाषणांनी मला खुप प्रगल्भ केलं आणि त्यामध्ये धर्माधिकारी सरांचा खुप मोठा वाटा आहे. जवळ जवळ मी 10 वर्ष सरांना ऐकतो आहे. सरांकडून खुप विषय ऐकले, पण योग्य वयात मला शिवाजी आणि गांधी यांची भाषणं ऐकायला मिळाली यासारखं दुसरं भाग्य नाही.

10वी पर्यंत समाज, धर्म, कर्तव्य, सामाजिक जाणीव, जातीव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता, देश, राष्ट्रप्रेम या कशाही विषयी माझी काहीही भुमिका नव्हती. आणि ते वय असं असतं कीे त्या वयात असले विचार मनाला शिवतही नाहीत. मला वाचायची आवड नव्हती. मी शाळेतला एक अगदी समान्य मुलगा होतो. स्वाभाविकपणे माझे कोणतेही ठाम विचार तयार झालेले नव्हते. घरचं वातावरण प्रसन्न होतं. आई वडिलांना वाचायची आवड होती. काही कारणांनी मलाही वाचायची आवड लागली, पण माझ्या दादाचा आग्रह होता की स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. त्याच्या आग्रहानी मला चाणक्यमधल्या कोर्सला घातलं. पण त्याच्याही आधी दोन अडीच वर्षं मी सरांची भाषणं ऐकत होतो. मुख्यतः शिवाजी आणि गांधी. बाकीची भाषणं मला खूप नंतर मिळाली. या दोन भाषणांतून सर खूप काही वेगळं सांगत नव्हते. पण सर नकळत मला समजावून सांगत होते की जातीव्यवस्था वाईट असते. ती पाळायची नसते, नव्हे नव्हे ती मोडून काढण्यासाठी आपण काम करायचं असतं. माझ्या घरची पार्श्वभूमी ही काही कर्मठ किंवा सनातनी नव्हती. पण मुद्दाम कोणीही जाती पाळाव्यात असं सांगत नाही, आणि पाळू नयेत असंही सांगत नाही. एकूण घरच्या वातावरणात मी जर पूर्णपणे बुडून राहिलो असतो तर कदचित मी ठामपणे जातीव्यवस्थेचा विरोध केला नसता. पण नकळत सर मला सांगत होते की ती प्रथा वाईट आहे, या देशाचं तिने खूप नुकसान केलं आहे. आपण गुलामगिरीत गेलो ते त्या जातिव्यवस्थेमुळेच. आपण आपल्यासारख्याच एका माणसाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी प्यायला बंदी घातली ती त्या व्यवस्थेमुळेच. योग्य वयात जर सरांच्या क्षमतेचं कोणी मला समजावून सांगणारं मिळालं नसतं तर कदाचित मीही रुळलेल्या वाटेनीच गेलो असतो. पण प्रत्यक्ष एकदाही न भेटता सर खूप मोठी शिकवण देत होते.

सरांची अनेक भाषणं तर माझी पाठ आहेतच हे मी सांगितलंच. पण काही भाषणांचा मी मुद्दाम उल्लेख करणार आहे. धर्माधिकारी सरांची ‘चित्तथरारक कथा’ नावाची एक व्याख्यानमाला आहे. त्यात एकेका देशाच्या उत्थानाची कथा सरांनी सांगितली आहे. इस्रायल, चीन, अमेरिका, जपान, भारत, फ्रान्स यांच्या संपूर्ण देशाला आकार देणार्‍या मध्यवर्ती गोष्टी सरांनी त्यात सांगितल्या आहेत. त्यामध्ये फ्रान्स देशाची गोष्ट म्हणून ‘जोन ऑफ आर्क’ची गोष्ट आहे. त्या व्याख्यानातल्या पहिल्या 10 मिनिटांची तर मी असंख्य वेळा पारायणं केलेली आहेत. त्यात सर सांगतात की, ‘स्त्री ही पत्नी असू शकते, बहिण असू शकते, आई असू शकते, प्रेयसी असू शकते, मैत्रीण असू शकते. पण आपण सगळ्या स्त्रियांना जे बनवतो त्याचा मी स्टेजवरून उच्चार करणार नाही. आणि त्यानंतर सर सांगतात की, स्त्रीशी समतापूर्ण मैत्रीपूर्ण वागल्यानं जीवन जास्त सुंदर होणार आहे, आनंदी होणार आहे, हेही न कळण्याइतके आपण स्वतःचे शत्रू झाल्यासारखे वागतो. तेव्हा ही जोन ऑफ आर्कची गोष्ट ऐकून तसं आपल्या आयुष्यात आपल्याला वागता येईल का। असा प्रयत्न आपण करायचा आहे.’ त्यामध्ये सरांची सांगण्याची पद्धत, खुप उद्विग्नपणे सर सांगत आहेत, हा त्यांचा टोन खुप काही परिणाम करून जातो. सर्वप्रथम मी हे ऐकलं तेव्हा इतका भारावून गेलो होतो की पहिल्या ऐकण्यात माझ्या हे पाठ झालेलं आहे.

त्याच कथामालेमध्ये ‘कारगिल आणि इतर कथा’ नावाचं सरांचं व्याख्यान आहे. त्या व्याख्यानातली अशीच शेवटची १० मिनिटं. सर त्यात सांगतात की या देशातल्या भ्रष्टाचाराने आपलं किती नुकसान केलेलं आहे. गाईसालला १९९९ साली एक रेल्वेचा अपघात झाला, त्यामध्ये ईशान्य भारतात ड्युटीवर जाणारे भारतीय जवान होते, अपघातात ते भारतीय जवान गेले. त्या गेलेल्या जवानांची संख्या संपूर्ण कारगिलच्या युद्धात मारले गेले त्यापेक्षा कमी होती. आणि अपघात का झाला, तर एकाच रुळावरून दोन ट्रेन समोरासमोरून आल्या आणि टक्कर झाली. त्यापैकी दिल्लीहून आसामला जाणारी ट्रेन ९० किलोमीटर अंतर चुकीच्या रुळावरून आली होती. त्या ९० किलोमीटरमध्ये ३ स्टेशनांवर त्या ट्रेनला हिरवा सिग्नल मिळाला. याचा अर्थ ज्या एक माणसानी एक खटका ओढून रूळ बदलायचा होता, त्यानी आपलं काम व्यवस्थित केलं नाही, आणि तीन स्टेशनांवर तीन जणांनी बेजबाबदारपणे काम केलं, त्याची किंमत आपण काय मोजली तर, कारगिलहून अधिक जवानांचा मृत्यू झाला. भुसावळ जवळ राहणाऱ्या एका जवानाला सैन्याचं पत्र आलं की अमुक अमुक दिवशी तुमची ड्युटी सुरू होणार आहे, आणि तुमची सुट्टी रद्द करण्यात येत आहे, कारण युद्ध सुरू झालं आहे. त्याच्या घरी त्याचे वृद्ध आई-वडील होते. त्यानी एक टेम्पोमधून आई वडिलांना भुसावळच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार केला. भुसावळच्या बाहेर वर्दीतल्या ६ पोलिसांनी त्याला आडवंल आणि म्हणले हे वाहन प्रवासी वाहतुकीचं नाहे, तो पाकिस्तानशी लढायला जाणारा जवान दंड भरायला तयार होता पण पोलिसांना नुसता दंड नको होता. त्यांनी त्या जनावाकडे पैसे मागितले. चिडून सैनिकानी वर्दीतल्या पोलिसाची गचांडी पकडली. वर्दीतल्या पोलिसाची गचांडी पकडली हा ‘इंडियन पिनल कोड’ खाली अपराध झाला. त्या जवानाला अटक झाली. त्याला ती रात्र तुरुंगात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटनी त्याला निर्दोष ठरवलं. तो जवान घरी आला आणि विष खाऊन त्यानी आत्महत्या केली. ही गोष्ट सांगून सर त्या व्याख्यानात म्हणतात, “ज्या पाकिस्तानच्या गोळ्यांचा सामना जो बेदरकारपणे करू शकत होता, त्याचा पराभव आपल्याच देशातला भ्रष्टाचार करू शकतो.” गाईसालच्या अपघातावर सर म्हणतात, “आपला जास्त मोठ शत्रू चीन नाहे, पाकिस्तान नाही. आज आम्ही आमचे जास्त मोठे शत्रू होऊन बसलेलो आहोत. आणि या युद्धांच्या कहाण्या ऐकायच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी करायच्या, याचा अर्थ प्रत्येकानी सैन्यात गेलं पाहिजे असं नाही. आपण जगतो तो क्षण अन क्षण लढाईचा क्षण आहे. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करणे हीच देशसेवा आहे. देश कोणीतरी दोन-चार नेते होतात म्हणून मोठा होत नाही, हजारोंच्या संख्यांनी सामान्य माणसं आपल्या वैयक्तिक जीवनात सामाजिक समतेसहित आपलं काम प्रामाणिकपणे करतात तेव्हा देश मोठा होतो.” ही वाक्य सरांच्या आवाजात ऐकताना माझ्या डोळ्यात कायम पाणी उभं राहिलेलं आहे. हे व्याख्यान मी पहिल्यांदा ऐकलं त्याला आता जवळजवळ १० वर्षं होत आली. हा लेख लिहायच्या निमित्तानी मी पुन्हा एकदा ते व्याख्यानं ऐकतोय. आजही जो परिणाम १० वर्षांपूर्वी त्या शब्दांनी केला होता, तसा परिणाम ते शब्द अजूनही करू शकत आहेत.

‘आपण त्यांच्या समान व्हावे’ या चरित्रमालेत सर सावरकर, शिवाजी, आंबेडकर, विवेकानंद, फुले दाम्पत्य, शाहूमहाराज यांच्यावर बोलले आहेत. त्यात सरांनी एक मुद्दा सांगितला होता की, या सगळ्या महापुरुषांचा अभ्यास कसा करायचा? सरांनी त्यासाठी वापरलेला शब्द होता ‘चिकित्सक भक्तीभाव’. ते महापुरुष होते तरीही ती माणसंच होती. त्यामुळे त्यांच्या हातूनही चुका झाल्या असल्याची शक्यता आहेच. त्यामुळे त्यांची चिकित्सा ही केली पाहिजेच. पण त्यासाठी चिखलफेक करण्याची गरज नसते. भक्तीभाव ठेवून अभ्यास करता आला पाहिजे. गोष्ट खूप साधी होती, पण ज्या काळात समाजात खूप प्रकारचं विष कालवणं सुरू आहे, त्या काळात इतका सम्यक विचार कोणीतरी समजावून सांगणारं हवं असतं.

या खूप लोकांना बाबी खूप सामान्य वाटू शकतील, पण माझ्यासाठी या सर्वच गोष्टी माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या ठरल्या. या सर्व भाषणांतून मी अभ्यास कसा करायचा हे शिकत होतोच, पण हे जे संस्कार आहेत, ते खूप नकळत माझ्यावर होत होते. तेव्हा ते कळले नाहीत, मात्र आज पावला पावलाला आठवतात.

मी स्वतंत्र नागरिकसाठी काम करत असताना एका साप्ताहिक मीटिंगमध्ये सर मला खूप ओरडले, आणि तेव्हा त्यांनी माझ्या स्वभावाचं वर्णन केलं होतं. कोणतं तरी काम मला दिलेलं माझ्याकडून पूर्ण झालं नाही, आणि ते अपूर्ण राहिलेलं आहे, हे मी सरांना सांगितलं ही नाही. मिटिंगमध्ये विषय निघाल्यावर सरांनी माझ्याकडे पाहिलं, आणि तेव्हा मी सरांना का झालं नाही याचं कारण सांगितलं. तेव्हा सर मला ओरडता ओरडता म्हणाले होते की, ‘मुकुल, तुझा स्वभाव थंडा करके खाओ, वाला आहे. तू काम पूर्ण करशीलही पण तुझ्या सोयीनी.’ याला सोनारानी कान टोचणे म्हणतात. ‘अक्षर मैफल’ सुरू केल्यावर माझ्याकडून कोणतंही काम वेळेत होत नसेल तर मला सरांची ती वाक्य आठवतात. एकदा घरी काम काढलं होतं. आणि मी आवरा-आवरी करत होतो. थोडा वेळ झाल्यावर मला कंटाळा आला आणि मी ते काम अर्धवट टाकलं, किंवा टाळाटाळ करायला लागलो. तेव्हा अशाच एका मिटिंगमधली सरांची वाक्य मला आठवली, सर सांगत होते की, ‘आपल्या देशाचा हा मूलभूत प्रॉब्लेम आहे की आपण काम अर्धवट करतो.’ सरकारी व्यवस्थेबद्दल ते बोलत होते की, तिथे कोणीही कोणाला उत्तरदायी नाही, त्यामुळे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावरही नाही. प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकानच उचलेली पाहिजे. मला माझ्या परिनी जमेल तेवढं मी आता ते पाळण्याचा प्रयत्न करतो. पण धर्माधिकारी नावाच्या सोनारानी माझे कान अनेकदा टोचले आहेत.

सरांनी घेतलेली काही काही लेक्चर्स मला आज जवळ जवळ 5-6 वर्षं होत आली तर लख्ख आठवतात. आमचा दोन दिवसीय अभ्यास महोत्सव होता. पहिले दोन दिवस वेगवेगळी सत्रं होती. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या विषयावरची सत्र होती. आणि समारोपाचं सत्र सर स्वतः घेणार होते. संपूर्ण चाणक्य मंडल त्या दिवशी बालगंधर्वमध्ये उपस्थित होतं. त्यादिवशी 1200 च्या आसपास मुलं तिथे उपस्थित होती. आणि आम्ही आदल्या दिवशी सरांना विनंती केली होती त्याप्रमाणे सर अर्थशास्त्रावर बोलणार होते. दोन दिवस अनेक विषयांची अनेक सत्रं ऐकून आम्ही भयंकर थकलो होतो आणि त्यात संध्याकाळी 6 ते 8 बालगंधर्वमधल्या एसीमध्ये सर दोन तास अर्थशास्त्रावर बोलणार होते. पण सरांनी ज्या पद्धतीने ते लेक्चर हाताळलं, ते मला अजूनही आठवतं आहे. दोन तास आम्ही अर्थशास्त्रावर ऐकून सुद्धा आम्ही थकलो नाही. एखाद्याला अर्थशास्त्रामध्ये अजिबात रुची नसणार्‍या विद्यार्थ्यालाही ते लेक्चर गुंतवून टाकणारं होतं.

चाणक्यमध्ये सरांनी देशप्रश्न अभ्यास मंडळ नावाचा एक गट सुरू केला होता. कल्पना अशी होती की, एकेका मुलानी एक एक असा विषय अभ्यासाला घ्यायचा. पाच वर्ष त्या एका विषयाचा अभ्यास करायचा. पाच वर्षात त्या विषयाचा तो मुलगा तज्ज्ञ झाला पाहिजे. त्या मुलानी त्या विषयात डॉक्टरेट मिळवायची. त्या विषयावर एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहायचं, वगैरे. त्या अभ्यास गटाचं पाहिलं लेक्चर सरांनी स्वतः घेतलं होतं. तेव्हा या ‘गटाचा उद्देश काय आहे’, या विषयावर ते बोलले होते. सर ते जे काय बोलले होते, त्यानी मी हालून गेलो होतो. चाणक्यमधल्या इतर अनेक गटांप्रमाणे त्या गटाचीही पुढे वाताहात झाली. पण माझ्यासाठी मात्र ते भाषण कायम लक्षात राहील. त्याच अभ्यास गटाचा उत्साहही हळूहळू कमी होत गेला. पुढे पुढे मुलांची संख्याही कमी होत गेली. ज्या वर्गात सुरवातीला दीडशे मुलं होती, त्याच वर्गात दोन महिन्यांनी पंधरा मुलं होती. पण तरीही सर आले होते. आणि अशा पंधरा मुलासाठी सर फक्त वीस मिनिटं बोलले होते. तीही वीस मिनिटं मला अजुनही आठवतात.

चाणक्यमध्ये सरांनी देशप्रश्न अभ्यास मंडळ नावाचा एक गट सुरू केला होता. कल्पना अशी होती की, एकेका मुलानी एक एक असा विषय अभ्यासाला घ्यायचा. पाच वर्ष त्या एका विषयाचा अभ्यास करायचा. पाच वर्षात त्या विषयाचा तो मुलगा तज्ज्ञ झाला पाहिजे. त्या मुलानी त्या विषयात डॉक्टरेट मिळवायची. त्या विषयावर एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहायचं, वगैरे. त्या अभ्यास गटाचं पाहिलं लेक्चर सरांनी स्वतः घेतलं होतं. तेव्हा या ‘गटाचा उद्देश काय आहे’, या विषयावर ते बोलले होते. सर ते जे काय बोलले होते, त्यानी मी हालून गेलो होतो. चाणक्यमधल्या इतर अनेक गटांप्रमाणे त्या गटाचीही पुढे वाताहात झाली. पण माझ्यासाठी मात्र ते भाषण कायम लक्षात राहील. त्याच अभ्यास गटाचा उत्साहही हळूहळू कमी होत गेला. पुढे पुढे मुलांची संख्याही कमी होत गेली. ज्या वर्गात सुरवातीला दीडशे मुलं होती, त्याच वर्गात दोन महिन्यांनी पंधरा मुलं होती. पण तरीही सर आले होते. आणि अशा पंधरा मुलासाठी सर फक्त वीस मिनिटं बोलले होते. तीही वीस मिनिटं मला अजुनही आठवतात.

रघुनाथ माशेलकर यांच्या रीइंव्हेंटिंग इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. स्टेजवर स्वतः रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, प्रकाशक सागर देशपांडे आणि धर्माधिकारी सर. इतके मोठे लोकं स्टेजवर असताना धर्माधिकारी सरांना केवळ शेवटची 20 मिनिटं मिळाली होती. पण त्या वीस मिनिटांत सर इतकं अभ्यासपूर्ण बोलले होते, ते अनेकांना बोलायला आयुष्य पुरत नाही. या व्याख्यानाला मी आणि माझी एक मैत्रीण गेलो होतो. आम्ही समोर श्रोत्यांमध्ये बसलेलो आणि सर आईल्समधून स्टेजकडे जात होते, मला पाहून सर थांबले आणि पाठीवर हात ठेऊन हासून म्हणाले ‘मी लेख वाचला बर का, very good’. त्याच्या काही दिवस आधी ‘स्वतंत्र नागरिक’साठी मी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचा परिचय करून देणारा लेख दिला होता.

2014च्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल 16 मे रोजी लागणार होते. आणि 13-14 मे रोजी चाणक्यचा भीमाशंकर-खांडसचा ट्रेक आयोजित केला होता. 13 मेच्या रात्री भीमाशंकरच्या मंदिराच्या परिसरात आम्हाला 16 मेला काय निकाल लागतील हे सरांनी सांगितलं होतं. तो एक अंदाज होता. पण सर म्हणत होते की, ‘आमच्या पिढीची निर्णायक घटना होती आणीबाणी. आमच्या पिढीतले अनेक कार्यकर्ते आणीबाणीच्या नंतरच्या लोकचळवळीतून सार्वजनिक जीवनात आले आहेत. आमच्या पिढीचा तो डिफायनिंग मोमेंट होता. तसा 2014ची निवडणूक हा तुमच्या पिढीसाठी डिफायनिंग मोमेंट असणार आहे, आणि ते किती खरं होतं हे मधल्या पाच वर्षांनी सिद्ध केलं.

चाणक्य मंडलची नवीन बिल्डींग पुण्यातल्या वारज्यात उभी राहिली. त्याच्या उद्घाटनाला दलाई लामा येणार होते. त्याच्या संपूर्ण तयारीसाठी चाणक्य मधली सगळी टीम दिवसरात्र दोन महिने कष्ट करत होती. पण सरांनी मला त्यांना मदतनीस म्हणून निवडलं होतं. प्रत्यक्ष उद्घाटनाच्या दिवशी सरांनी त्यांचा फोन माझ्याकडे दिला होता. खूप महत्त्वाचा फोन आला तरच मला द्यायचा अन्यथा तू उत्तर देऊन विषय संपवायचा, असं सांगितलं होतं. पण सरांनी मला निवडलं याचा मला इतका आनंद झाला होता, की तो शब्दांत सांगता येत नाही. आता तो आनंद बालीश वाटतो, पण सरांनी माझ्यावर विश्वास टाकला होता.

लेक्चर्स तर खूप आहेत, पण त्यातून मी जे शिकलो आहे ते आयुष्यभराचं माझ्यासाठी संचित आहे. चाणक्य मी फार आनंदानी सोडलं नाही. भांडणं झाली, आणि मला ते सोडावं लागलं. आता गेली 4 वर्षं सरांशी काहीही थेट संपर्क नाही. पण अजूनही काही निराश वाटत असेल, असहाय वाटत असेल तर मी हमखास सरांचं एखादं व्याख्यान लावून बसतो. रिचार्ड बाख या लेखकाचं ‘जोनाथन लिविंगस्टन सीगल’ नावाचं एक अफलातून पुस्तक आहे. त्या जोनाथनची गोष्ट सरांकडून ऐकणे म्हणजे पर्वणी. चित्तथरारक कथामालेमध्ये शेवटचं व्याख्यान जोनाथनचं आहे. ते व्याख्यान म्हणजे अमृततुल्य आहे. कोणाही माणसाला आयुष्याबद्दल कोणतेही प्रश्न असतील, शंका असतील, आयुष्याकडून कोणतीही आशा राहिलेली नाही अशांसाठी ‘जोनाथन’ची गोष्ट म्हणजे संजीवनी ठरू शकते इतकी ती अप्रतिम आहे. ती जोनाथनची गोष्ट तर मी अनेकदा ऐकतो. त्यांची कथामाला, सुवर्णयुगाच्या स्वप्नासाठी ही व्याख्यानमाला सतत ऐकत राहावी अशीच आहे. सीओइपीच्या हिस्ट्री क्लबमध्ये सरांचं ईशान्य भारतावर एक व्याख्यान झालं होतं. ते भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा सुंदर नमुना आहे.

इतकचं नाही, विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत झालं होतं. त्यामध्ये सरांचं एक भाषण झालं होतं. त्या भाषणात गंगाधर गाडगीळ यांच्या एका कथेचा सरांनी संदर्भ देऊन एक गोष्ट सांगितली होती. आयुष्य बेदरकारपणे जगण्याची प्रेरणा मराठी माणूस हरवून बसला आहे, हे त्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं होतं. सरांच्या भाषणात येणारे इंग्लिश कवितांचे संदर्भ, वर उल्लेख केलेल्या कारगिलच्या गोष्टीत सर लॉर्ड टेनिसस एका कवितेचा संदर्भ देतात. सीओइपीतल्या एक भाषणात सर बोरकरांच्या एका कवितेचा संदर्भ देतात. हे सगळं आता लक्षात येतं की सरांनी त्यांच्या वक्तृत्वावर विशेष कष्ट घेतलेले आहेत. कारण दोन दोन तासांच्या भाषणांमध्ये एक मिनिट सुद्धा श्रोत्यांचं मन विचलित झालं आहे, लोकं कंटाळली आहेत, विषय भरकटलाय वगैरे बाबी सरांच्या भाषणात मी कधी पाहिलेल्या नाहीत.

खरं तर 10 वर्षातले असे अनेक किस्से आहेत जे मुद्दाम सांगितले पाहिजेत. मी सरांच्या लेखनाबद्दल तर बोललोच नाही. सरांच्या कवितांबद्दल बोललो नाही. सरांचं माझ्यावर किती प्रेम होतं त्याबद्दल बोललेलो नाही. सरांच्या ‘अस्वस्थ दशकाच्या डायरी’बद्दल बोललो नाही. सरांनी त्यांना भारावून टाकणाऱ्या पुस्तकांबद्दल एक लेख लिहिला होता. तो लेखही मी अनेक भाषणांप्रमाणे अनेकदा काढून वाचतो. जसं अर्थशास्त्रावरचं सरांचं लेक्चर आठवतं तसं स्टीफन हॉकिंगच्या निमित्तानं सर विज्ञानावर बोलले होते. ‘अध्यात्म आणि विज्ञान’ हा असाच एक सरांचा खास विषय, मतभेद बाजूला ठेवले तरी त्या व्याख्यानाचा पहिला भाग सर विज्ञानावर बोलतात ते अफलातून आहे. थॉमस फ्रिडमनच्या निमित्तानं सर जागतिकीकरणावर बोलले होते. रेचल कार्सनच्या निमित्तानं सर पर्यावरणावर बोलले होते. त्यांनी स्वतः अनुभवलेले विषयही खूप होते. राम जन्मभूमी आंदोलन, काश्मीर प्रश्न, ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळी. सर कारगीलच्या युद्धाच्या दरम्यान कारगील भागात होते. 79 मधलं आंध्रमधलं चक्रीवादळ.

या सगळ्याला काही मर्यादा आहेत, त्या आम्ही जवळून पहिल्या. धर्माधिकारी सर या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही मी जी वर सांगितली आणि माझ्या आयुष्यासाठी जी दिशादर्शक ठरली ती एक. आणि दुसरी थोडीशी काळी म्हणता येणार नाही, करडी. आता सरांच्याहून अधिक अनुभवी अभ्यासू लोकांच्या संपर्कात आल्यावर सरांच्या बोलण्याच्या मर्यादा लक्षात येतात. त्या मर्यादा वाचनाच्या असतात, अनुभवाच्या असतात. बोलण्याच्या आवेगात असेल पण सर मर्यादा ओलांडून बोलतात. अनेकदा बोलण्याच्या आवेगात होणाऱ्या तपशिलाच्या चुका लक्षात येतात. आता सरांशी निष्कर्षांचे मतभेदही निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ ‘इस्लाम’ बद्दल सरांची मतं अजूनही बाळबोध आहेत. विज्ञान आणि अध्यात्माबद्दल सर करतात ती सरमिसळ अनावश्यक वाटते. भारताची फाळणी हा असाच एक विषय आहे. गेल्या 5 वर्षात सर खूप बदलले. ते बदल आम्ही जवळून बघत होतो. ते बदल फार समाधानकारक नव्हते. पण ते एक माणूस म्हणून माणसाचं वैशिष्ट्य आहे, तो परिपूर्ण असत नाही, म्हणूनच मोठा ठरतो. त्या थोड्याश्या करड्या बाजूबद्दल तिच्याबद्दल आज बोलायचं नाही. कारण आज त्यांच्या साठीनिमित्त आपण बोलतोय. पण मी तीही बाजू खूप जवळून अनुभवली. चाणक्य सुटलं, सरांशी संपर्क संपला, तो याच कारणामुळे. पण माझ्या मनात त्या असंख्य व्याख्यानांबद्दल, लेक्चर्सबद्दल, सरांच्या प्रचंड वाचनाच्या सवयीबद्दल आणि त्यानं मला मिळालेल्या प्रेरणेबद्दल मी सरांच्याप्रति कायम कृतज्ञ असेन. याचं कारणही त्यांनी शिकवलेला चिकित्सक भक्तीभवाच आहे.

आता मर्यादा लक्षात येतात, मतभेत होतात, हे सरांनी बोलायला नको होतं, असं वाटतं तरी सरांची ‘क्रेझ’ कमी होत नाही. अजूनही ती मतभेद निर्माण करणारी व्याख्यान ऐकूनही मी तेवढाच हरकून जातो जेवढा १० वर्षापूर्वी जात होतो.

हा सरांच्यावर लेख लिहिण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा सरांची व्याख्यानं ऐकली, सरांच्या कविता ऐकल्या, अस्वस्थ दशकाची डायरी वाचली. डायरी वाचतानाच मी ठरवलं होतं की या लेखाला नाव काय द्यायचं. सरांनाही त्यांच्या तरुणपणी ‘कीस रास्तेसे जाना हैं?’ हा प्रश्न पडला होता, आणि त्यांनी त्यांच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, ते त्यांच्या ‘डायरी’मधल्या ‘इस रास्तेसे जाना हैं’ या प्रकरणात आहे. आपापल्या आयुष्यातही ज्याला हा प्रश्न पडेल की ‘कीस रास्ते से जाना हैं?’ त्यांनी हे प्रकरण वाचावं आणि आपलं उत्तर शोधावं. मी माझ्यासाठी ठरवलं की आपल्याला ‘इस रास्ते से जाना हैं…!’

आता जखमी झालेल्या सिंहांवर जसे कोल्हे हल्ले करतात तसं कोणीही उठतं आणि धर्माधिकारी सरांना सोशल मिडियावर ट्रोल करतं. ट्रोल करणाऱ्यांचे मुद्दे बरोबर असले तरी सरांवर कोणीतरी टीका करतंय हे मनाला पटत नाही. ज्या माणसाकडून मी इतकं शिकलो, किंबहुना घडलो त्याच्यावर भलेही योग्य कारणांसाठी कोणी टीका करतं हे सहन होत नाही.

सरांचे माझ्यावर खूप ऋण आहेत. कधीतरी पुन्हा सर फेसबुकवर एखाद्या फोटोवर एखादी मिश्कील कमेंट करतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, सर्वकाळ सर्व शुभेच्छा, असं म्हणून एखादा मेल करतील, किंवा मी लिहि

लेल्या एखाद्या लेखावर ‘मी लेख वाचला, very good’ म्हणून शाबासकी देतील, अशी मला अजूनही आशा आहे

Leave a Reply

Your email address will not be published.