स्त्री हा मुळातच अनादी काळापासून दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आधीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रीची गणनाच केली जात नसे म्हणजे तिचे अस्तित्वच नाकारण्या सारखे होते. स्त्री म्हणुन जन्म घेतल्यानंतर अगदी जगण्याच्या शर्यतीला सुरुवात होते, स्त्रीगर्भ हा जन्म घेऊ शकतो की नाही इथूनच लढाईची सुरुवात होते. खरे तर आज एक स्त्री म्हणून जगत असताना मला माझ्या सभोवतालच्या स्त्रियांचे जीवन अवकाश हे वेगवेगळ्या पद्धतीने बदलणारे ,उमलणारे ,बंदिस्त असे जाणवते. आज एक स्वतंत्र स्त्री म्हणून स्वातंत्र्य अनुभवत असताना “तुम्ही किती ग भाग्यवान !किती छान निर्णय घेऊ शकता, आमच्या वेळी नव्हते बाई “असे म्हणून पुटपुटणारया आजीला पाहिले की वाईट वाटते आणि आपण अशा कर्तुत्ववान आहोत असे वाटत असतानाच पुढच्या पिढीतील कोणी स्वतःचे आर्थिक नियोजन करताना आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुषार आहेत हे मान्य करतानाच मनोमन त्यांचा हेवाही वाटल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांचे अवकाश आता केवळ ‘चूल आणि मूल’ इतकेच मर्यादित राहिलेले नाही आहे तर त्यामध्ये तिचे स्वातंत्र्य ,अधिकार कर्तव्य या सर्व गोष्टींची जाणीव तिला सजगपणे आहे. आमच्या आधीची स्त्री पिढी ही नक्कीच कमावणारी होती परंतु स्वतः कमवलेल्या पैशाचे स्वतः नियोजन करणे, वापर करणे हे तिच्या हातात नव्हते आत्ताच्या पिढीच्या हातात हे नक्कीच आहे. जागोजागी साजरा होणारा ‘जागतिक महिला दिन’ आणि त्यादिवशी सगळीकडे सुरू असणारा बायकांचा चिवचिवाट त्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. पण आजचे जग जाहिरातीचे जग आहे येथे स्त्रियांवर ‘सुपरवुमन’ असणे हे थोपवले जात आहे .म्हणजे आजची स्त्री ही एका चक्रव्युहा मध्ये अडकलेली आहे. यामध्ये तिच्यावर स्त्री म्हणून प्रचंड दडपण व दबाव हा जाणवत राहतो घरातील व्रतवैकल्ये करत असतानाच कार्पोरेट जगामध्ये ही तिला टिकून राहायचे आहे. मुलांच्या विकासासाठी आजही आईलाच जबाबदार धरले जाते .काही ठिकाणी चौकोनी कुटुंब, त्रिकोणी कुटुंब असतात त्यामुळे कुटुंबाकडून मिळणारा आधार हा नसल्यातच जमा आहे. मुलांना ‘पाळणा’ घरात ठेवून दिवसभर अपराधीपणाच्या भावनेत आजची ‘आई’ भरडली जात आहे. हे झाले बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांचे पण जी स्त्री घरात राहून घरातील सर्व कामे करते तिला तर नेहमीच गृहीत धरले जाण्याची भावना ही छळत असते कधी नाईलाज म्हणून किंवा कधी आवड म्हणून स्त्रिया घरी राहून घराची देखभाल करतात तेव्हा ‘मी घरीच असते’, ‘मी काहीच करत नाही’ असे जेव्हा चार चौघात ती सांगते तेव्हा तिच्यातला तो न्यूनगंड आपल्याला आत्ता पर्यंत पोखरून टाकतो. आपल्या समाजामध्ये तसेही कधी श्रमाला प्रतिष्ठा नव्हती श्रमापेक्षा नेहमी बुद्धीला महत्त्व दिले गेले आहे. जिथे श्रमाला प्रतिष्ठा नाही तेथे स्त्रीयांच्या श्रमाची काय मोजदाद आणि काय दखल घेतली जाणार. शहरांमध्ये स्त्रियांना मिळणार्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावलेल्या निश्चितच आहेत परंतु ग्रामीण भागात स्त्री अजूनही जोखडातच आहे हे कळल्याशिवाय राहत नाही. श्रीमंत घरच्या सधन कुटुंबातील स्त्रिया या घरात राहून घराचा कारभार पाहतात तोही जेवढे स्वातंत्र्य इतरांनी दिलेले आहे त्याच्या कक्षेत राहूनच. ज्या ठिकाणी स्त्री उमेदवार हे पद राखीव असते अशा राजकीय पातळीवर केवळ नावासाठी उमेदवार निवडून येतात आणि कारभार मात्र दुसऱ्याच्या हातात असतो .मजूर वर्गामध्ये दिवसभर राब राब राबून काबाडकष्ट करून स्त्रियांना मिळणारी मजुरी ही पुरुषांच्या मानाने कमीच असते .आपण जरी पुढारलेल्या स्वतंत्र झाल्याच्या खूप गप्पा मारत असलो तरीही आजही मजुरी करून घरी आलेल्या स्त्रीला परत स्वयंपाक करून दारुड्या नवर्याचा मार हा ठरलेलाच असतो. ती तो सहन करते आणि उसने अवसान आणून परत दुसर्या दिवशीच्या जगण्याला सुरुवात करते. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते एकदा रस्त्यावर एक जोडपे चाललेलं असतं नवर्याच्या हातात एक काठी असते व ती काठी टेकत टेकत चाललेला असतो आणि बायकोच्या डोक्यावर भली मोठी टोपली असते कडेवर एक मूल असतं तसेच तिच्या पोटी ही एक जीवन आकार घेत असतो. जेव्हा त्या नवऱ्याला विचारले की तू हिचा हातातले काही समान का घेत नाहीस त्या वेळी त्याचे उत्तर असते की ‘मी तिची रक्षा करत आहे’! हे अतिशय दुर्दैवी असे वास्तव आहे. आजच्या स्त्रीची अवस्थाही अशीच आहे .
बस मध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या राखीव जागा बद्दल नेहमी ओरड केली जाते तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये बरोबरी करता मग तुम्हाला कशाला हव्या राखीव जागा एक स्त्री म्हणून झेलाव्या लागणाऱ्या गलिच्छ नजरा, नकोसे स्पर्श काय असतात ते एक स्त्री म्हणून जन्माला आल्या शिवाय कधीच कोणाला कळणार नाही .शारिरिक रित्या स्त्रिया जरी नाजूक असल्या तरी मनाने त्या खूप खंबीर असतात प्रचंड कर्जबाजारी झाल्यामुळे एका उद्योजकाने आत्महत्येचा पर्याय निवडला कोणालाही कोलमडून टाकणारी ही घटना परंतु अशाही परिस्थितीत त्या उद्योजकाच्या पत्नीने धीरोदात्तपणे येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत आपल्या नवर्याने घेतलेले कर्ज फेडून आज त्याच उद्योगांमध्ये ती खंबीरपणे उभी आहे. मग आपण कसे म्हणू शकतो की स्त्री ही दुबळी असते !आपल्या सभोवताली स्त्रिया कधीच आत्महत्या करताना दिसत नाहीत. स्त्री ही स्वतःच्याही आधी कुणाची आई, कुणाची मुलगी कुणाची पत्नी तर कुणाची बहीण असते. त्यामुळे जिवंत राहून येणार्या संकटांना तोंड देताना मरण्याचा पळपुटेपणा कुठली स्त्री करत नाही. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे नगण्य प्रमाण हेच सूचित करते. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर स्वतःचा ताबा मिळवला त्या वेळेला तिथे सगळ्यात जास्त भरडल्या जात आहेत तिथल्या स्त्रिया . स्त्रियांना जेरबंद करून त्यांच्यावर अत्याचार करून स्वतःला खूप कर्तबगार समजणे हे अगदी पूर्वीपासून चालत आलेले आहे. तेथील स्त्रियांच्या परिस्थितीची कल्पनाही करवत नाही. सर्व जगाने तिकडे पाठ फिरवली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये . तिथल्या निडर स्त्रिया पाशवी राज्यकर्त्यांच्या विरोधात उभे राहून तिथे एकाकी लढाई लढत आहेत.
समाज प्रगत होत आहे तसा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात वाढच होताना दिसत आहे .सत्तर वर्षाच्या आजीबाई असून ते सहा महिन्याच्या बालीकेपर्यंत कोणीही सुरक्षित नाही असे खेदाने म्हणावे लागते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी स्त्रिया करत असणारी वेशभूषाच कारणीभूत आहे ही होणारी ओरड म्हणजे समाजाच्या दांभिकपणा चे धडधडीत उदाहरणच म्हणावे लागेल. प्रगत समाज तोच असतो ज्यामध्ये स्त्री ही भयमुक्त वावरू शकते पण दुर्दैवाने आज तशी परिस्थिती नाही आहे असेच म्हणावे लागेल. मला माझ्या सभोवतालच्या स्त्रियांमध्ये प्रकर्षाने जाणवलेला एक बदल म्हणजे आजची स्त्री ही दुसर्या स्त्रीचे कौतुक करण्यामध्ये ,तिला प्रोत्साहन देण्यामध्ये कुठेही मागे नाही ‘ स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते’ ही समाजमान्य गोष्ट स्त्रीने कधीच मोडीत काढली आहे. स्वतःच्या लेकी सोबतच स्वतःच्या सूनेचेही तितकेच कौतुक करणाऱ्या स्त्रिया आपण समाजामध्ये पाहतो. तसेच स्वतःच्या सासरचे करत असताना स्वतःच्या आई-वडिलांचाही भक्कम भावनिक व आर्थिक आधार या मुली बनत आहेत .स्वतःसोबत जे घडले ते माझ्या पुढच्या पिढीला सोसावे लागू नये यासाठी स्त्रीमन अधिक काळजी करते,आणि हा एक खूपच आशादायी बदल मला जाणवतो. खरं तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था स्त्रियांच्या खांद्यावर पेललेली असते स्त्री सुखी तर आपोआपच कुटुंब व पर्यायाने समाज सुखी.म्हणून स्त्रियांनी स्वतः एक स्त्री म्हणून स्वतःच्या अधिकारांबद्दल, कर्तव्याबद्दल, हक्कांबद्दल जितके जागृत असायला हवे तितकेच आपल्या सभोवतालच्या स्त्रियांबद्दल ही सह्रद असायला हवे,आणि माझ्या सभोवतालच्या स्त्रियांमध्ये मला हा बदल प्रकर्षाने जाणवतो ज्यायोगे स्त्रियांचे भवितव्य नक्कीच उज्वल असणार आहे. ….
लेखिका- कल्पना उबाळे