करदात्याने विवरणपत्र भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल हे जाणून घेतले पाहिजे. या वर्षी प्राप्तिकर विवरणपत्रात झालेले बदल, भरावयाची अतिरिक्त माहिती, फॉर्म १६ मिळण्यात झालेला उशीर यामुळे विवरणपत्र भरण्याची मुदत एक महिन्याने वाढविली आहे. आता लेखापरीक्षण बंधनकारक नसलेल्या करदात्यांना विवरणपत्र ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत भरता येईल.
या स्तंभातील मागील लेखात (सोमवार, २२ जुलै २०१९) कोणते उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनी कोणता फॉर्म निवडावा हे बघितले. आता योग्य फॉर्म निवडल्यानंतर आपली आणि आपल्या उत्पन्नाची योग्य माहिती देणे गरजेचे आहे. माहिती चुकीची असल्यास जास्त कर, व्याज, दंड भरावा लागू शकतो. करदात्याने विवरणपत्र भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल हे जाणून घेतले पाहिजे.
वैयक्तिक माहिती :
या माहितीमध्ये नाव, पत्ता, ई-मेल अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राप्तिकर खात्यातर्फे पत्र व्यवहार, ई-मेलद्वारे आणि पोस्टल पत्त्यावर पाठविले जातात. त्यामुळे हे दोन्ही अचूक असणे गरजेचे आहे. बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अचूक भरावा. हा चुकीचा भरल्यास कर-परतावा (रिफंड) मिळण्यास विलंब लागू शकतो आणि त्राससुद्धा सहन करावा लागू शकतो. परदेशात असलेली संपत्ती, बँक खाती, शेअर बाजारात नोंदणी नसलेल्या कंपन्याच्या शेअर्सची माहिती, कंपन्याच्या संचालकपदाची माहिती, वगरे अतिरिक्त माहिती देणे करदात्यांना बंधनकारक आहे. ज्या करदात्यांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची आणि कर्जाची माहिती देणे बंधनकारक आहे.
उत्पन्नाची अचूक माहिती :
करदात्याने आपल्या आर्थिक व्यवहारांची नोंद करून ती वेळोवेळी अद्ययावत करावी जेणेकरून वार्षकि उत्पन्न, वजावटी, गुंतवणूक वगरेची माहिती विवरणपत्र भरताना सहज उपलब्ध होईल. एखादे उत्पन्न मुद्दाम न दाखविणे किंवा कमी दाखविणे हे महागात पडू शकते. उत्पन्न करपात्र नसले तरी उत्पन्न विवरणपत्रात दाखवावे लागते. उदा. करदात्याने एक घर विकून दुसरे घर खरेदी केल्यास कलम ५४ नुसार वजावट घेतल्याने घरविक्रीवर झालेला नफा करपात्र नाही, तरीही हे खरेदी आणि विक्रीचे दोन्ही व्यवहार विवरणपत्रात दाखविणे बंधनकारक आहे. प्राप्तिकर खात्याकडे बऱ्याच व्यवहारांची माहिती विविध संस्था, बँका, सरकारी कार्यालये वगरेंकडून वेळोवेळी जमा होत असते आणि त्याची पडताळणी प्राप्तिकर खाते करत असते. एखादे उत्पन्न जाणते किंवा अजाणतेपणे दाखवायचे राहून गेल्यास त्यावर पुढे कर तर भरावाच लागेल शिवाय व्याज आणि दंडसुद्धा भरावा लागू शकेल.
उत्पन्न योग्य स्रोतांमध्ये दाखविणे :
करदात्याला आपले उत्पन्न हे योग्य स्रोतांमध्ये दाखविले पाहिजे. उत्पन्न चुकीच्या स्रोतांमध्ये दाखविल्यास त्या संदर्भातील वजावटी चुकीच्या घेतल्या जातात. उदा. कुटुंब पेन्शन हे ‘इतर उत्पन्न’ या उत्पन्नाच्या स्रोतात करपात्र आहे आणि त्यावर १/३ किंवा १५,००० रुपये (जे कमी आहे) एवढी वजावट मिळते, करदात्याला मिळालेले पेन्शन (निवृत्तिवेतन) हे ‘पगारातील उत्पन्न’ या स्रोतात करपात्र आहे आणि या उत्पन्नावर ४०,००० रुपयांची प्रमाणित वजावट मिळते.
वजावटी तपासून बघा :
पगारदार करदात्यांनी आपला फॉर्म १६ तपासून बघावा आणि वजावटी बरोबर घेतल्या आहेत याची खातरजमा करून घ्यावी. एखादी गुंतवणूक/वजावट फॉर्म १६ मध्ये घेतली गेली नसेल तर ती करदात्याला विवरणपत्राद्वारे घेता येते. विवरणपत्र दाखल करताना कोणताही पुरावा किंवा कागदपत्र जोडावे लागत नसले तरी, कोणतीही वजावट घेण्यापूर्वी करदात्याकडे त्या वजावटी संदर्भातील पुरावा आहे आणि वजावटीची रक्कम अचूक घेतली आहे याची खात्री केली पाहिजे. उदा. गृह कर्जावरील व्याज, देणगी पावत्या, वगरे.
करमुक्त उत्पन्न :
जसे करपात्र उत्पन्न विवरणपत्रात दाखविणे गरजेचे आहे तसेच करमुक्त उत्पन्न दाखविणेसुद्धा गरजेचे आहे. अनेक जणांची अशी समजूत असते की करमुक्त उत्पन्न दाखविले नाही तरी चालते आणि या उत्पन्नावर कर भरावा लागत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कंपन्यांकडून मिळालेला लाभांश, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावरील (पीपीएफ) व्याज, वगरे विवरणपत्रात दाखवावे लागते. या वर्षीपासून नव्याने सुरू झालेल्या ‘कलम ११२ अ’द्वारे १ लाख रुपयांपर्यंत भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही, करदात्याचा या कलमानुसार भांडवली नफा १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरी हा विक्री व्यवहार ‘भांडवली नफा’ या सदरात दाखवावा लागतो.
‘फॉर्म २६ एएस’मधील माहिती तपासून बघणे :
‘फॉर्म २६ एएस’मध्ये करदात्याला विविध व्यक्तींनी दिलेले उत्पन्न आणि त्यावर कापलेला उद्गम कर (टीडीएस) या विषयीची माहिती असते. करदात्याने ही माहिती तपासली पाहिजे. आपल्या नोंदीनुसार उत्पन्न आणि उद्गम कर २६ एएसमधील तपशिलाशी जुळवून घ्यावा. जेणेकरून विवरणपत्रात उत्पन्न आणि उद्गम कर अचूक दाखविला जाईल आणि कर-परतावा (रिफंड) लवकर मिळेल. ऑनलाइन विवरणपत्र दाखल करताना संग़णकावर ‘फॉर्म २६ एएस’ तपासण्यासंबंधी संदेश दिसतो. एखादी रक्कम आणि उद्गम कर ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दर्शविली गेली नसेल तर उत्पन्न देणाऱ्या व्यक्तीकडे पाठपुरावा करावा लागेल. त्याशिवाय करदात्याला उद्गम कराचा फायदा घेता येणार नाही.
चुकांची दुरुस्ती :
करदात्याने विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी ते तपासून बघावे आणि चुका असल्यास त्या सुधारून मगच दाखल करावे. विवरणपत्र दाखल केल्यानंतर एखादी चूक लक्षात आली तर घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा चुका सुधारण्याची तरतूद प्राप्तिकर कायद्यात आहे. करदात्याला विवरणपत्रात झालेल्या चुका सुधारून ‘सुधारित विवरणपत्र’ दाखल करता येते. या सुधारित विवरणपत्रात, जे दाखल केलेले विवरणपत्र सुधारावयाचे आहे त्याचा पावती क्रमांक देणे गरजेचे आहे. हे सुधारित विवरणपत्र, करनिर्धारण वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०२० पूर्वी (आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी) किंवा निर्धारण पूर्ण होण्यापूर्वी (जे आधी पूर्ण होईल) दाखल करता येते. मागील वर्षांपर्यंत सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची मुदत, करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्ष इतकी होती. तसेच मागील वर्षांपर्यंत फक्त मुदतीत दाखल केलेले विवरणपत्र सुधारता येत होते. या वर्षीपासून मुदतीनंतर दाखल केलेले विवरणपत्रसुद्धा सुधारता येते. हे विवरणपत्र करदात्याने किती वेळा सुधारित करावे याला मर्यादा नाही.
विवरणपत्र ऑनलाइन दाखल केल्यानंतर ई-तपासणी :
करदात्याने विवरणपत्र दाखल केल्यानंतर त्याची तपासणी (ई-व्हेरिफाय) करणे बंधनकारक आहे. ही तपासणी झाल्याशिवाय विवरणपत्र ग्राह्य़ समजले जात नाही. ही तपासणी आधार क्रमांकावर आधारित एक वेळ पासवर्ड (ओटीपी) किंवा नेट बँकिंगद्वारे किंवा डिजिटल स्वाक्षरी किंवा आयटीआर सही करून बंगळूरु येथे पोस्टाने १२० दिवसांच्या आत पाठवून करता येते. करदात्याने आपले सुधारित विवरणपत्रसुद्धा वरील पद्धतीपकी एका पद्धतीने तपासणी करणे बंधनकारक आहे.
ज्या करदात्यांनी अद्याप विवरणपत्र भरले नसेल त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न बघता विवरणपत्र लवकरात लवकर भरून चिंतामुक्त होणे शहाणपणाचे ठरेल.
प्रवीण देशपांडे
Source : Loksatta (Link)