पहाटेची चाहूल लागताच; हळूहळू आकाशात तारे-तारका लुप्त होत असतात. केशरी रंगाची छटा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असते. खट्याळ मंद वारा अलगुज करु लागतो. पानापानांमध्ये मंद हालचाल चालू होते. दवबिंदू फुलांपानांवर नाचत-खेळत मातीत उड्या टाकतात. हा पहाटेचा वारा प्रभात फेरीची सैर करवतो. गंध प्रीतीचा अलवार गाली स्पर्शून जातो. केसांच्या बटांना नाहक हा छेडतो. अन् तनमन शहारुन टाकतो. आनंदाच्या लहरी उठतात. उषेच्या गालावर लाली झळकायला लागते. रातराणी, प्राजक्ताचा सडा पडतो आणि अत्तराचे शिंपण करीत वारा मंद वाहत रहातो. कधी नारळाच्या झावळ्यांमधून कधी मोकळ्या अंगणात मुक्या प्राण्यांशी मस्ती करतो. अश्या ह्या झुंजूमुंजूच्या वेळी आठवतात सुरेश भट यांच्या गीताच्या ओळी…
*चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली!
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली!
मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा!
अन् चोरपावलांनी आला पहाटवारा!
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली!*
इंदिरा बाईंच्या ‘कुब्जा’ ह्या कवितेत भणभणारा वारा दिसतो.
*मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण!*
रात्र सरताना,केशरात मावळणारा चंद्र
आणि त्यावेळी त्याच्याभोवती भणभणारा पहाटवारा! मोजक्या शब्दात वातावरणातील आशय प्रकट होतो. पहाटे आपल्याच धुंदीत वाहणारा वारा साऱ्या नभात भिरभिरत फेरी मारतो. सृष्टीच्या चराचरात छेड काढत पळत असतो. त्याच्या अलगद धक्याने मोगरा लाजून गळतो. जास्वंद थरथरतो. ते पाहून सदाफुली खुदकन हसते. मधुमती,गुलाब डौलात डोलत रहातात. खारुताईची उगाच धावपळ सुरु होते. फुलपाखरु ऐटीत भिरभिरते. राघू-मैना एकमेकांना शीळ घालत बसतात. मधूनच कावळा कावकाव करतो. कोंबड्याचे आरवणं ,पक्षांची किलबिल पहाटेच्या जिवंतपणाची साक्षच! हळव्या, नाजूक पानापानांवरुन दवं ओघळते. ध्रुवाची चांदणी ढळते आणि लालिमा गगनात पसरतो. आळस देत सजीव जागा होतो. तोही मरगळ घालवण्यासाठी प्रभात फेरी करुन येतो. मनसोक्त श्वास भरभरुन घेतो. गार वाऱ्याची झुळूक अंगावर येताच ताजातवाना होतो. पहाटेची नवी आशा पल्लवित कामाला लागतो. खरंच…
*”असाच यावा पहाटवारा,जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम,असाच निथळत यावा”*
ह्या शांताराम नांदगावकर यांच्या गीतात, बासरीची मंद धून वितळते तसा हा पहाटवारा मऊ,मुलायम, निरागस सुरात निथळत यावा. मावळतीला झुकलेला चंद्र आणि सप्तरंगी उधळण…त्याचा चढलेला कैफ असे अप्रतिम सौंदर्य वर्णन म्हणजे जणू पहाटेची हालचाल…प्रसन्न, मनमोहक,चैतन्यमय, ताजीतवानी करणारी प्रभात फेरी !!!
*मनिषा विसपुते*
मुंबई.