स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही? सर्वांनाच ते प्रिय असते. स्वतःचे तंत्र, स्वतःला मोकळेपणाने जगण्याची  मुभा, मोकळा श्वास, स्वावलंबनाची आस, ना कोणाची हुकूमशाही ना कोणाची दादागिरी, ना कुणाची अरेरावी, निर्मळ, शांत, अहिंसेच्या मार्गाचा वापर करून आकाश आपल्या मिठीत आणि  मुठीत सामावून घेण्याची एक प्रदीर्घ आस, या आशेपोटीच माणसाला जगण्याची एक दिशा मिळते. स्वतःला हवे तसे पण कायद्याच्या चौकटीत राहूनच आपले जीवन आनंदात अखंड प्रवास. मोकळ्या रानामध्ये घुमत असलेला वारा हा एक नाद निर्माण करतो, एक सुंदर  ध्वनि तरंग पसरतो. त्या लयी मध्ये मुक्तविहार  असतो. फुलपाखरे जशी मनसोक्त बागडतात. पक्षी जसे मनमोकळे गुंजन करतात. पाण्याची धार जशी अडखळत का होईना पण बिंधास्त धावत असते तसे आपले जीवन सुद्धा असेच मनमोकळे, सुरेख असावे असे वाटते.

आपल्या देशात लोकशाही आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, भाषा स्वतंत्र आहे. असंख्य प्रदेशातील वेगवेगळ्या भाषा बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी याला अपवाद आहे पण आपल्या मातृभाषेला जपण्याचे आणि तिला वाढवण्याचे अहम् काम प्रत्येकाने करायचं असते. बोलण्याचे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आपली मते ठामपणे मांडण्याचे अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण” हम करे सो कायदा” या उक्तीप्रमाणे कायदे दिवसेंदिवस बदलत राहतात. एकदा दिलेला निकाल 28 -30 वर्षानंतर सुद्धा बदलल्याचे आपण पाहतो. स्वातंत्र्याचा खरा अर्थ बाजूला राहून त्याचा दुरुपयोग होताना दिसतो. आपल्या आयुष्यात लहानपणापासून मोठे होऊन मरे पर्यंत त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना देशासाठी मनामध्ये उपकाराची भावना आणि प्रेम जागृत ठेवणे गरजेचे आहे. आज आपण जो मोकळा श्वास घेतो, रात्री अपरात्री बाहेर फिरतो, आपले आवडते जेवण जेवतो, आपले आवडते कपडे परिधान करतो यासाठी असंख्य देशभक्त पूर्वजांनी आणि क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताची जीवनाची आहुती दिली आहे हे कदापि विसरून चालणार नाही. देशाला अखंड ठेवण्यासाठी, देशाची शान अशीच उंचावत नेण्यासाठी  आपण भारतीय म्हणून काम करायला मला नक्की आवडते. तुम्हाला काय वाटते ?  सांगा हां……

भेटूया पुढच्या लेखात………

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.