समाजाचे आपण देणे लागतो हे मी लहान पणापासून शाळेत ऐकत मोठी झाले त्यामुळे या समाजाने आपल्याला जे काही दिले आहे त्याचे मनन करत राहायला लागले . शाळा ,सुरक्षित घर ,बहरलेली खेळाची मैदाने आरोग्य सेवा ,हॉस्पिटल्स,मनोरंजनासाठी चित्रपटगृहे, वाचनालये , मंदिरे, जीवन जगण्यासाठी नवीन व्यवसायांची नांदी याच समाजाने आपणास दिलेली आहे. ” साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना…. साथी हाथ बढाना” हे नया दौर मधील गाणे ऐकताना मिळून मिसळून कामात मदत करून देशासाठी, समाजासाठी आपण कसे कटिबद्ध रहातो ह्यावर खूप चांगल्या रीतीने प्रकाश टाकला आहे. समाजसेवा म्हटले तर खूप काही आहे आणि जर मानले नाही तर काहीच नाही.

आपण ज्या शाळेत शिकतो, मोठे होतो त्या शाळेसाठी काही खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. शाळेत कधीतरी फेरफटका मारून भावी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची पुस्तके, बेंचेस, फळा, खडू, खाण्याच्या काही वस्तू आपण आपल्या कुवती नुसार द्यायला हवे. आपले घर आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपली गल्ली ,शहर जर सर्वांच्या मदतीने स्वच्छ ठेवले तर किती छान होणार? आपण स्वतःला असलेले ज्ञान थोडे थोडे का होईना दुसऱ्यांना देत राहिले पाहिजे जेणेकरून ” थेंबे थेंबे तळे साचे” ही उक्ती सार्थ होईल. गरिबांना अन्न देऊ शकतो, गरजूंना वस्त्र देऊ शकतो. यांच्याकडे शिक्षण घेण्यास पैसे नाहीत पण शिकण्याची खूप तीव्र इच्छा आहे अशांना शिक्षण देऊ शकतो. ही समाजसेवा तर आहे पण हे व्रत कसोशीने पाळायला हवे .यात फक्त शुद्धता, सच्चाई, पावित्र्य असले पाहिजे. त्याचा बाजार करता कामा नये. आपण आपल्या आसपास पाहतो की किती मुले भीक मागतात. त्या मुलांना भविष्यात काय देऊ शकतो हे मोठ-मोठ्या सेवाभावी संस्थांनी विचार केला पाहिजे. मागे एक उदाहरण वाचनात आले होते की एक व्यक्ती नोकरीधंदा करून रात्रीच्या वेळी स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या मुलांना शिकवायची. किती हे पुण्याचे काम? बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे त्यांनी केलेल्या समाजसेवेला तर तोड नाही. किती कुष्ठरोगी पीडितांना त्यांनी सहारा दिला. जगण्याची उमेद दिली. त्यांनी चालविलेले व्रत त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा मनापासून केले. यासाठी एक धीरगंभीर आणि सचोटीची वृत्ती लागते . मानवतेला अभिमान वाटावा अशीही कर्तव्यदक्षता त्यांच्या ठायी भरलेली होती.

करोना काळात सुद्धा सर्व माणसे मनाने हतबल झालेली होती. जगायच्या वाटाच जणू ह्या महामारी ने बंद केल्या होत्या. त्यातून जे जगले ते देवाचे आभार मानतात. अशा या कठीण प्रसंगात घरातून जेवण बनवून किंवा छोट्या जागेत अन्न बनवून ते उपाशी आणि कर्तव्य ड्युटीवर असणाऱ्या लोकां पर्यंत पोचवून त्यांची क्षुधा आणि तृष्णा भागविण्याचे महान काम केले गेले. अनेक समाजसेवी संस्थांनी या काळात मोलाची मदत केली. या स्थितीत सुद्धा अनेक व्यवसाय उदयास आले. समाजसेवेचे व्रत घेतलेल्यांनी वृद्धांना औषधे पुरवण्याचे कार्य केले. ज्यांचा थोडा जम व्यवसायात बसला होता त्यांनी जमेल तेवढ्यांना काम देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. होम डिलिव्हरी ला प्राधान्य आले त्यातून एक व्यवसाय उभा राहिला. समाजाची सेवा करताना स्वतःची सुद्धा काळजी घेणे हे अपरिहार्य होते पण ह्या कठीण करोना काळात हे समाजसेवीच जास्त मृत्युमुखी पडले. किती पोलीस, डॉक्टर, नर्सेस, ड्रायव्हर रुग्णांना सेवा देताना स्वर्गवासी झाले त्यांच्या या महान सेवेला प्रणाम करायला हवा. देशाला उच्चस्थानी नेताना आणि सुरक्षित ठेवताना बेरोजगारी वाढणार नाही याची दक्षता घेणे जरुरी आहे. मोठे मोठे राजकीय नेते, मोठी मोठी हॉस्पिटल्स समाजसेवेच्या नावाखाली जनतेची पिळवणूक करतात, त्यांना लुबाडतात तेव्हा दुःख होते. तुम्हाला काय वाटते?….. सांगा हां……..

परत भेटूया पुढच्या लेखात….

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.