नमन खेळे

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल` या नाटकात ‘श्री गणनायक नर्तन करी` अशा स्वरूपाच्या पदावर पुणेरी ब्रह्मवृंदाचे नर्तन दाखविले आहे. या नर्तनाची शैली नमन-खेळे प्रकारासारखी आहे. नमन खेळे हा उत्तर कोकणातील अतिशय लोकप्रिय असा लोककला प्रकार आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर या भागातील खेड्यांतून हा प्रकार केला जातो. धार्मिक विधी म्हणून या कला प्रकाराकडे पाहिले जाते. लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा शुभप्रसंगी खेळे केले जातात. हे खेळे पेशवाई काळापासून होत असावेत असा अंदाज आहे, कारण खेळ्यांच्या काही गीतांतून, राघोबादादाच्या नावाचा उल्लेख आढळतो. अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला त्याचे दोन भाग होऊन एक ‘दशावतार` म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावला व ‘नमन खेळे` उत्तर कोकणात होऊ लागला. हा कला प्रकार कुणबी समाज सादर करीत असल्यामुळे व हा समाज अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आणि खालच्या वर्गातील मंडळी तो सादर करीत असल्यामुळे इतर उच्चवर्गाने त्यांच्या लोककलेकडे फारसे लक्ष दिले नाही, म्हणून हा लोककला प्रकार दुर्लक्षित राहिला. पेशवेकालीन प्रभाव खेळ्यांवर असल्यामुळेच पेशवाईवर बेतलेल्या ‘घाशीराम कोतवाल` मधील एक नर्तनशैली खेळ्यांसारखी आहे.

नृत्य, नाट्य व संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार ‘यक्षगान` या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवितो. दोन्हीकडे पायघोळ झगे वापरले जातात. रामायण, महाभारतातील भागांचे गायन कोरसचा वापर करून केले जाते व पात्र त्यावर अभिनय करतात. खेळ्यातील अंगसोंगाचे ‘लळित` या लोकप्रकाराशी साम्य आढळते. यामध्ये ब्राह्मण, गावचा पाटील, सरकारी अधिकारी अशांची सोंगे आणून त्यात त्यांची टिंगल-टवाळी, शब्दांच्या कसरती व अंगविक्षेप करून लोकांना पोटभर हसवणे व त्यांची करमणूक करणे हे दोन्हीकडे केले जाते. यामध्ये चेहर्‍यावरील भावदर्शनाला भरपूर वाव असतो. खेळ्यांतील मुखवटा-नाट्याचे साम्य आदिवासींच्या भवड्यातील मुखवटा-नाट्याशी आढळून येते, मात्र भवड्यातील पात्रे मूक असतात, तर खेळ्यांतील पात्रे बोलतात. खेळे लिखित स्वरूपात फारसे आढळून येत नाहीत. सुरेश चव्हाण या अभ्यासकाने नमन-खेळेवर मूलगामी संशोधन केले आहे.

साधारण फाल्गुन महिन्यात होळीच्या सुमारास कुणबी समाज गावाच्या देवीच्या नावाने नमन-खेळे करण्यास प्रारंभ करतो. याच सुमारास मुंबईतील चाकरमानी कोकणात आपल्या गावी देवीचे खेळे करण्यासाठी आलेले असतात. याच दरम्यान इतरही मंडळी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी आलेली असतात. (देवीच्या पालखीच्या निमित्ताने) वैशाख महिन्यापर्यंत वेगवेगळ्या गावांतून हा लोककला प्रकार चाललेला असतो. हा विधी धार्मिक विधी म्हणून ओळखला जातो. गावातील देवीची पालखी आणि खेळे कलावंत बरोबरच बाहेर पडतात म्हणून यांना ‘देवीचे खेळे` असेही संबोधिले जाते. प्रत्येक गावची ग्रामदेवता व तिची पालखी स्वतंत्र असते. देवीची नावेही वेगवेगळी असतात. उदा. सोमजाई, चंडिका, जाखमाता वगैरे. ‘रवळनाथ` हा देव मात्र सगळीकडे आढळून येतो. हे खंडोबाचेच एक नाव असून दोन्ही मूर्तींतही साम्य आढळते. ग्रामदेवता या मातृदेवता म्हणूनही ओळखल्या जातात.

देवीची सजवलेली पालखी त्या गावातील प्रत्येक घरात ढोल-ताशांच्या गजरात फिरवली जाते. यजमान पुढे होऊन पालखी खांद्यावर घेऊन पालखीचे स्वागत करतो. पालखीबरोबर आलेला गुरव (पुजारी) प्रथम पालखीची पूजा करतो. (इथे ब्राह्मण पुजारी नसतो) नंतर घरातील इतर मंडळी पूजा करतात. याचवेळी देवीचे नवस दिले जातात. नवीन नवस बोलले जातात. या वेळेस गावातील बलुतेदार देवीला गार्‍हाणे घालण्यासाठी उपस्थित असतात. गावातील तरूण वर्ग हौसेने ढोलाच्या तालावर पालखी नाचवत असतो. पालखी गेल्यावर एक-दोन दिवसांनी खेळे येतात. पायघोळ झगे, उपरणे, डोक्यावर पगडी, हातात टाळ अशी वेशभूषा केलेली दहा-बारा मंडळी अंगणात येऊन देवीची नमने म्हणायला सुरूवात करतात. या वेळेस मृदुंगवादक, संखासूर व स्त्रीवेषातील पुरूष (कोळीण) खेळ्यांपुढे नाचत असतात. काही नमने झाल्यावर यजमानांकडून आरती व दक्षिणा घेऊन ही मंडळी पुढील घरी जातात. हा खेळ्यांचा मान समजला जातो.

ग्रामदेवता हे संपूर्ण गावाचे दैवत मानले जाते. गावावर कुठली आपत्ती आली, रोगराई आली की देवीचा कौल घेतला जातो. देवी जो कौल देईल तो संपूर्ण गावाला बंधनकारक असतो. देवी गावाचे रक्षण करते ही त्यामागची समजूत. खेळ्यांनी त्यांचा पोषाख अंगावर चढवला की ते देवीचे खेळे होतात ही समजूत (श्रद्धा) त्यामुळे खेळ्यांनाही नवस बोलण्याची प्रथा तसेच भुते-खेते, करणी यावर विश्वास असलेला आढळतो. खेळे करणारी मंडळी जेव्हा घरोघरी जातात तेव्हा त्यांना फिरतीचे खेळे असे म्हणतात. परंतु लग्नकार्य, पूजा, नामकरण विधी अशा प्रसंगी किंवा गावातील खोत, प्रतिष्टित पुढारी मंडळींकडे वर्षातून एकदा संपूर्ण रात्रभर खेळे करण्याची पद्धत आहे. याबद्दल त्यांना मानधनही दिले जाते. या ठिकाणी धार्मिक विधीपेक्षा करमणुकीवर जास्त भर दिलेला असतो. या ठिकाणी खेळे आपला खेळ सादर करतात. घरासमोरील अंगणात मंडप घातलेला असतो. आंब्याच्या डहाळ्यांनी, नारळाच्या झावळ्यांनी व रंगीत कागदाच्या पताकांनी तो सुशोभित केलेला असतो. रात्रीची जेवणे आटोपून त्या गावातील लहान थोर मंडळी खेळे पाहण्यासाठी त्या घरासमोरील अंगणात जमू लागतात. खेळे करणारी मंडळी संध्याकाळीच यजमानाच्या घरी आलेली असते. त्यांची जेवणे आटोपल्यावर खेळे सजायला (वेशभूषा) सुरूवात करतात. यातील कलावंत स्वत:ची मुखसज्जा स्वत:च करतात. सात्विक पात्रांची मुखसज्जा आकाशी निळ्या रंगाची असते, तर तामसी पात्रांची लाल काळ्या रंगाची असते.

मंडपाच्या एका कोपर्‍यातून खेळे कलावंत मृदुंग वाजवत येऊ लागले व अंगणात उभे राहिले की, आपोआप रंगमंच तयार होतो. नमनाची सुरवात करण्यापूर्वी दोन वाजूला दोन मृदुंगवादक उभे असतात, मध्यभागी सूत्रधार असतो. नमनाची सुरूवात सूत्रधार करतो व त्याच्यामागून इतर मंडळी त्याच ओळींची आवर्तन करतात. उदा. ‘देव पयला नमान,देव गणेश देवाला। दैव आगाशी मेघाला, देव पाताली शेषाला।।` अशा तर्‍हेने बारा नमने होतात. यात देवादिकाबरोबर चंद्र, सूर्य, समुद्र, गावचा पाटील व प्रेक्षक यांनाही अभिवादन असते. ही मंडळी अशिक्षित असल्यामुळे त्यांची भाषा थोडीफार अशुध्द असते. बारा नमनानंतर संखासूर प्रवेश करतो. याला ‘असुर` म्हणून खेळयात म्हटले जात नाही. याचा पोषाख दशावतारातील शखासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. त्या टोपीने त्याचा संपूर्ण चेहरा झाकलेला असतो. दिसण्याकरीता दोन छिद्रे ठेवलेली असतात. हा मूकपणे नृत्य करीत असतो. कधी कधी त्याच्या बरोबर स्त्री वेषातील पुरूष ही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा शखासूर मृदुंगवादक व कोळीण (स्त्रीवेशातील पुरूष) यांचा गाण्याच्या व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो.

यानंतर गणपतीचे सोंग आणले जाते. जवळजवळ सर्वच लोककलांतून सुरूवातीला गणपतीची आराधना केली जाते. इथे सूत्रधार गणपतीच्या जन्माची कथा गीतातून सांगत असतो. पेक्षकांसमोर पडदा धरला जातो. (यक्षगानातही तो पात्राच्या आगमनापूर्वी धरला जातो) सूत्रधाराच्या गणपती स्तवनाबरोबर पडदा मृदुंगाच्या तालावर हलत असतो आणि थोड्याच वेळात पडद्यावर गणपतीचा मुखवटा दिसू लागतो. गाण्याच्या व मृदूंगाच्या ठेक्यावर मुखवटा डोलू लागतो. सूत्रधार गणपतीचे स्तवन गाऊ लागतो. त्याचे बोल असे असतात.’ देव नाचत आले गणपती हो। देवा पायी पौलेर वाजती हो।देवा मृदूंग वाजती हो।।` गणपतीच्या निर्गमनानंतर ‘नटवा` हे पात्र प्रवेश करते. जो नटतो तो नटवा. म्हणून नटवा या पात्राने माणसाचा मुखवटा घातलेला असतो. सूत्रधार त्याला अनेक प्रश्न् विचारतो. त्यामध्ये तो कोठून आला असे विचारता, तो देशावरून आल्याचे सांगतो. नटवा आणि सूत्रधार यांचे संवाद हे नटव्याचे देशावरून (घाटावरून) कोकणात केलेल्या प्रवासावर आधारित असतात व त्यातून हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न असतो. लळितात जशी वनमाळी, गावदिंडीगाण, गावभाट ही पात्रे विनोदनिर्मिती करतात तसेच नमनखेळयामध्ये ‘नेटवा` हे पात्र असते. वनमाळी, गावदिंडीगाण, आदी पात्रे लौकिक असतात तसाच ‘नेटवा` लौकिक असतो.

खेळ्यातील ‘गौळण` व तमाशातील गौळण यांत थोडेफार साम्य आढळते. खेळ्यातील गौळणी म्हणजे स्त्रीवेश धारण केलेले पुरूश असतात. ते मथुरेच्या बाजारात निघतात बरोबर मावशी असते (ही तमाशातही असते) पेंद्या गौळणींना अडवतो. गौळणी व पेंद्या यांच्या संवादातून विनोदनिर्मिती होते. श्रीकृष्ण व गौळणीचे संवाद पद्यमय असतात. पात्रे आपली ओळख गीतातून करून देतात. उदा. पेंद्या श्रीकृष्णाला सांगतो ‘माझी काठीन काळी घोगडी रे रघुरामा । मला आयकत नाय गवळ्याच्या बाया रे रघुरामा।।` यावर गौळणी श्रीकृष्णाला सांगतात ‘आम्ही गरीब गवळ्याच्या नारी हो। देवा करू नका मस्करी हो।। यानंतर काही अंगसोंगे येतात. त्यामध्ये दोन तीन कलावंत मिळून एखादा घटनेवर उत्स्फूर्त संवादातून नाट्य उभे करतात. इथे पूर्वरंग संपतो.

उत्तरंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकांचा समावेश असलेले एखादे आख्यान लावले जाते. यामध्ये रामायण-महाभारतातील कथांचा विशेष समावेश असतो. काही लाकडी मुखवटे घातलेली देवदिकांची व प्राण्यांची सोंगेही आणली जातात.(उदा. वाद्य,हरिण,गाय इत्यादी) शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल ताषाच्या तालावर नाचत आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युध्द होते व रावण मारला जातो. रावणवधानंतर खेळयांचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात. रात्रभर चाललेला हा कलाप्रकार पहाटे (उजाडता उजाडता) समाप्त होतो. यातील कथा सादर होताना त्यातील नाट्य पुरेपूर फुलवण्यासाठी गद्य-पद्य मिश्रित निवेदनशैलीचा वापर केला जातो व ताल वाद्यांची (टाळ-मृदुंग) अखंड लय हे यांचे वैशिष्टय असते.

Leave a Reply

Your email address will not be published.