निसर्ग आणि सहजीवन
विवाह विच्छेदाचं उच्चाटन
जागतिक पर्यावरण दिनी ज्याप्रमाणे आपण वृक्षावरोपण तसेच लहान रोपांची लागवड करुन आपल्या परिसरात पर्यावरणाचे संवर्धन करतो, त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालच्या प्राणीमात्रांचे, पक्ष्यांचे दाणे, पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करत असतो. आपणही सर्व मनुष्यप्राणी, ह्या निसर्गाचा एक घटक आहोत. सर्व प्राणीमात्रांपेक्षा सर्वश्रेष्ठ अशी बुद्धिमत्ता देवाने माणसाला बहाल केली आहे, तरीही आपण माणसं आपल्या परस्परांतील नातं टिकवण्यासाठी, त्या नात्याला नव्यानं खतपाणी घालून त्याचं संवर्धन करण्यासाठी काही प्रयत्न करतो कां? कोणत्याही नात्याला नवसंजीवनी मिळते ती सकारात्मक विचाराने, सद् भावनेच्या सिंचनाने व प्रेमपूर्वक स्विकाराने. आपण डोळसपणे ह्या सृष्टीकडे पाहिलं तर उमजेल की, आपण माणसं बुध्दी असूनही विचारपूर्वक न वागता, माणसा-माणसातल्या नात्याला दुरावतोय. आज आपल्या समाजाला कुटुंब व्यवस्था टिकवून सामाजिक स्वास्थ्य जोपासण्याची नितांत आवश्यकता आहे.
आजच्या ‘यूज-अँड-थ्रो’च्या युगात नातंही किती सहजपणे झिडकारलं जातंय. घटस्फोटाची वाढती संख्या व कोलमडणारी कुटुंब व्यवस्था पाहिली की वाटतं, नव्यानं ह्या नात्याकडे व सहजीवनाशी संबंधित अन्य नात्यांकडे तसेच जगाशी जोडल्या जाणार्या इतर भावनिक नातेसंबंधांकडे निसर्गाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण माणसंही एकमेकांची शक्ति बनू शकतो.
एकमेकांची एकजूट दर्शविणारा मेंढ्यांचा, गाई-गुरांचा कळप, आकाशात एकमेकांच्या साथीने विहार करणार्या पक्ष्यांचा थवा, फुलांचे ताटवे, बहरलेले वृक्ष, टवटवीत दिसणार्या वेली, जलाशयातील आगळंवेगळं नेत्रसुख देणारे विविधरंगी जलचर प्राणी. हे सारे त्यांच्या विभिन्नतेतूनही एकता दाखवतात. परस्परांच्या विश्वात दखल न देताही एकमेकांना पूरक राहून निसर्गाचा समतोल सांभाळतात.
निसर्ग नियमानुसार मनुष्याची वाढ, ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल, सूर्याचे धरतीला प्रकाशमान करण्याचे, पावसाने न्हाऊन चिंब करण्याचे व हवेचे वहन करण्याचे कार्य युगानुयुगे अविरत चालू आहे. मानवाने आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती केली; संगणक युगात वेगवेगळ्या प्रसार माध्यमांनी जरी जग जोडलं गेलं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र माणसांची नाती व प्रत्यक्ष भेटी-गाठी दुरावल्या आहेत.
वर्तमानपत्रातल्या अत्याचाराच्या, अमानवी कृत्यांच्या, नात्यांची चिरफाड करणार्या बातम्या वाचल्या की मन विषण्ण होतं. देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत, ते सत्कर्म करण्यासाठी, परस्परांना साथ देण्यासाठी आणि आपल्या वाणीचा उपयोग सुसंवादाने जगाशी नाते जोडून, एकमेकांत आपुलकी वाढवण्यासाठी. अविचारी माणसं आपली अर्धी अधिक उर्जा ही वायफळ गोष्टींवर चर्चा करण्यात, दुसर्यांवर टिका करण्यात, वाद-विवादात व दुष्कृत्य करण्यात वापरून, स्वतःची आणि पर्यायाने समाजाची हानी करुन घेत आहेत. वैवाहिक जीवनात जोडीदारांनी आपले ‘इगो’ जपण्यासाठी टोकाची भूमिका घेतल्यामुळे कौटुंबिक घडी विस्कळीत झाली आहे. भाऊबंदकीत व इतरही नात्यांत संपत्ती, जमीन-जुमला व पैशावरून तंटे व वादविवाद सुरुच असतात व ते न्यायालयात पिढ्या न पिढ्या चालू राहतात.
गंमत म्हणजे मूक पशू-पक्ष्यांच्या विश्वात केवळ चोच, पंख व पायांच्या बळावर, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारे त्यांचे नित्य व्यवहार पैशाशिवायही सुरळीत सुरु असतात. तेही आनंदाने जगाला प्रसन्नता, सुंदरता बहाल करत असतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या जगात कोणतेही ‘घोटाळे’ न करता ! म्हणूनच की काय, आपल्याला कोणताही प्राणी, पक्षी, फुले-पाने सजीव असूनही माणसांप्रमाणे दुःखी व तणावपूर्ण दिसत नाहीत. चिखलात राहूनही न कुरकुरता कमळ सौंदर्याने खुलते. काट्यांमध्ये राहूनही गुलाब प्रसन्नतेने फुलतो. आपण माणसं मात्र आपल्या दुःखांचा केवढा बाऊ करतो. दुसर्यांकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे आपण दुःखालाच कवटाळून बसतो. म्हणूनच आपल्याला सुख जवाएवढे व दुःख पर्वताएवढे दिसते.
निर्मळ निसर्ग, निरपेक्ष प्रेम व समाधान देणारे पशु-पक्षी पाहिले की वाटतं, भौतिक सुखाच्या मागे धावणार्या, यंत्र-सामुग्रीसह जीवन व्यतीत करणार्या, प्रसार माध्यमांच्या व डिजिटल गॅजेट्सच्या मोहजालात अडकणार्या माणसा, भरभरुन देणार्या या निसर्गाकडे डोळसपणे पाहून घटकाभर श्वास घे! निसर्गाच्या हिरव्या कुशीत विसावा घे, खळखळ वाहणार्या पाण्यात, निर्झर झर्यात, कोसळणार्या धबधब्यांत स्वतःला झोकून दे! रंगीबेरंगी फुलपाखरांकडे नुसतं कुतूहलाने पाहिलं तरी मनाला प्रसन्न वाटतं. ‘मन पाखरू पाखरू’ खुणावत आपल्यालाही त्यांच्यासारखं क्षणांत आकाशी उडणारी अन् क्षणांत भुईवर परतून येणारी, इकडे-तिकडे भिरभिरणारी फुलपाखरे वेगळाच आनंद देतात. ही पाखरं जणू आपल्याला त्यांच्यासारखं मन हलकं-फुलकं, ताजं-तवानं ठेवण्याचा संदेश देतात.
जीवन सुखी, समाधानी व सुसह्य करण्याचा कानमंत्र ऐकायचा आणि अनुभवायचा आहे कां? पशु-पक्ष्यांच्या रमणीय जगतातील दाखले ऐकत, निसर्गात रममाण करणारा, त्याचं आपल्या सहजीवनाशी महत्व सांगणारा, मनमोराचा पिसारा फुलविणारा हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल.
निसर्ग देवतेचे स्मरण करून, भूमातेला वंदन करुन, समस्त वाचकांसाठी मी माझं उर्वरित मनोगत माझ्या ‘निसर्ग आणि सहजीवन’ ह्या कार्यक्रमात मांडते. त्यासाठी तुमच्या मंडळातर्फे, सार्वजनिक संस्थेतर्फे, बचत गट-युवक-युवती गटातर्फे मला खालील मोबाईल (व्हॉट्स अप) क्रमांकावर संपर्क साधावा.
‘निसर्ग आणि सहजीवन’
निसर्गाप्रमाणेच मन प्रसन्न करणारा,
सकारात्मक विचार देणारा,
सहजीवनावरील कवितांचा निखळ आनंद देणारा,
एक आगळा वेगळा अभिवाचन
व सुसंवादाचा कार्यक्रम!
वैवाहिक जीवन समृद्ध करणारे सादरीकरण !
‘घटस्फोट टाळा, विवाह वाचवा’
संपर्क :
निसर्गप्रेमी अॅड. सुजाता त्रिंबककर टिपणीस
Mob/What’s App: 9870324965
Email – sujatatipnis@gmail.com
(वसई, जिल्हा पालघर)*