सहवास तुझ्या प्रेमाचा

love

‘सहवास’ ह्या शब्दात माया, आपलेपणा ,सुरक्षेचा वास आहे. सहवासातच प्रेम दडलंय. पशूपक्षी असू दे नाहीतर अनोळखी माणसं,एकत्र वेळ घालवू लागली की ओढ निर्माण होते. सहवासात एकमेकांबद्दल प्रेम,आदर,आकर्षण, काळजी नकळत घेतली जाते आणि तो सहवास प्रेमाचा असेल तर जन्मभर साथ लाभते. हिंस्र पशूही प्रेमाच्या सहवासात राहून शांत होतो. चांगल्या गुणी मुलांची संगतही चांगलेच संस्कार घडविते. पाळीव प्राण्यांना माया लावली तर ते आपल्यालाही माया लावतात. रोज दाणे खायला येणारे पक्षी अलवार लळा लावतात. पोपट आणि आता तर कावळाही सहवासात बोलायला लागला आहे. सहवास तुझ्या प्रेमाचा माणुसकीचा धडा शिकवून जातो.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सहवास महत्वाचा असतो. बालपणी लाभलेले सवंगडी, तारुण्यातील मित्र-मैत्रीणी, जेष्ठत्वामधला जोडीदार आणि वार्धक्यात असणारा साथीदार ह्यांना जीवनात अनमोल स्थान आहे. ह्यांचा सहवास माणसाला प्रेमळ, आनंदी,यशस्वी, ताकदवान तर बनवतोच पण आयुष्याच्या प्रवासात मोलाची साथ देतो. सुखदुःखाच्या वाटेवर हाती मदतीचा हात देऊन चालतो. पण त्याबरोबरच संसारात येणारे ऋणानुबंधही अमुल्य! नातं तुझं नि माझं जर द्वेष,मत्सर,राग, ईर्षा बाजूला ठेवून निभावलं तर सहवास तुझ्या प्रेमाचा अनंत काळ टिकेल. त्यातल्या सुखाचा मकरंद नेहमीच चाखता येईल. व.पू म्हणतात, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला ते समजत नाही… *”सहवास ही अशी गोष्ट आहे जी नातं दृढ करायला मदत करते.”*

तरीपण सर्वात जास्त सहवास हा आपला आपल्या स्वतःशीच असतो. आपल्यासह आपणच वास करत असतो. कधी स्वतःवर रागवतो तर कधी प्रेम करतो. अभिमान वाटतो तर कधी कौतुक! स्वतःची काळजी घेतो. प्रेमाने स्व हितगुज साधतो. सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतो. कधी कधी एकांताच्या कातरवेळी स्वतःमध्ये मग्न होतो. मनाचा मनाशी चालू असतो संवाद! अतुलनीय अशी साथ मिळते… स्वतः च्याच सहवासाची. हरवून जातो. हरखून जातो. स्वतः वरच्या प्रेमाची साद पार अंतःकरणात उतरते. मनाच्या गाभाऱ्यात लपलेला आनंद अलवार तरंगत, तनमन लपेटून घेतो. आत्मविश्वासाचा हा सहवास असतो. शरीरासह इंद्रियांच्या प्रेमाच्या सहवासात सुदृढ, निरोगी आरोग्य मिळते. ह्याच सहवासावर शांता शेळके यांच्या ओळी लिहिण्याचा मोह आवरत नाही….

*”फसवा वरुन राग, रुसव्यात गाढ प्रिती….होता क्षणिक दूर,वेडी मनात भिती दूरातही नसावा, दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने, हा जीव मोहरावा.”*

मनिषा विसपुते
मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *