मिथिला नगरीत लगबग चालली होती.जनक राज्याच्या प्रिय कन्येचं स्वयंवर होतं. लहानपणी घोडा घोडा करून शिवधनुष्यवर स्वार होणारी सीता,कुणाला द्यावी,या चिंतेत असलेल्या जनकाने, शिवधनुष्य पेलणाऱ्या राजकुमाराला सीता वरमाला घालेल अशी अट घातली.देशोदेशीचे राजकुमार मिथिलेत दाखल झाले.श्रीराम आणि त्यांचे बंधू आल्याची वार्ता मिथिला नरेशाला मिळाली, तो लगबगीने त्यांच्या स्वागताला आला.एव्हाना जनकाचा भाऊ कुशध्वज आपल्या कुटुंबाला घेऊन दाखल झाला होता.त्याच्या मुली,मांडवी आणि श्रुतकीर्ती यौवनाच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या.स्वयंवरात त्यांना आणण्याची जनकाची मागणी मुलींनी पित्याच्या मागे लागून पूर्ण करून घेतली होती.

तिकडे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न मिथिलेत पोहोचण्याआधी काही वेळापूर्वीच कुशध्वज लवाजमा घेऊन आला.
“किती दिवसांनी भेटतोय गं, सुकून गेलीस अगदी,”रथातून उतरणाऱ्या श्रुतकीर्तीला मिठी मारून सीता एका हाताने मंडवीला बिलगली.
“तू,मात्र आता लग्न होणार म्हणून तेजस्वी दिसतेस.”श्रुतकीर्ती सीतेचा हात कुरवाळत म्हणाली
“प्रवासाचा त्रास झाला का?”
“थोडासा,पण तुझा विवाह चुकू नये म्हणून आम्ही तो सहन करू”,येणाऱ्या उर्मिलेला आपल्या कवेत घेऊन श्रुतकीर्ती ने तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले,ऊर्मिला तिला बिलगली. जनक कन्या सीता,ऊर्मिला आणि कुशध्वजाच्या मांडवी,श्रुतकीर्ती चौरसाच्या चार सारख्या बाजू,नेहमी एकमेकींना सावरणाऱ्या!!!सीतेचं स्वयंवर झालं की आपण एका बाजूला मुकणार ही रुखरुख सर्वांच्या मनात पण दुसरीकडे पण जिंकणाऱ्या राजकुमाराला पाहण्याची प्रचंड उत्कंठा,त्यांना लागली होती.
“दारातच उभ्या राहणार आहात की आम्हां भावाना भेटायला मिळणार आहे आज?”जनकाने विचारलेल्या प्रश्नाने त्या भानावर आल्या. हातात हात घालून चिवचिवाट करीत सीता त्यांना घेऊन आपल्या प्रसादात गेली.जनकाने कुशध्वजाचे यथासांग आदरातिथ्य केले.दोघे राजे स्वयंवराचे यजमानपद सांभाळण्याच्या तयारीला लागले.
“सीते,असं ऐकलय की अयोध्या राजकुमार आपल्या बरोबर तीन भावांना घेऊन आले आहेत.त्यांच्या काही अटी आहेत का?नाही म्हणजे आम्ही तिघी  प्रयत्न करू “,श्रुतकीर्ती च्या स्पष्ट बोलण्याला सीतेसकट तिघीनी हसत दाद दिली.
“हो,बाई,मी सुद्धा पिताश्री म्हणाले तेव्हा ऐकलं की श्रीराम,आपले बंधू लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह आले आहेत,पण त्यांनी शिवधनुष्य पेललं तर ना,मला काळजी वाटते”
“एका माणसाच्या मनात श्रीराम भरून राहिलेत म्हणे,आणि राजकन्येला जे हवं ते देवाला सुद्धा द्यावेच लागेल,”श्रुतकीर्ती नाटकी अविर्भाव आणून म्हणाली.
“माता नेहमी म्हणते की श्रुतकीर्तीच्या जिव्हेवर सरस्वती आहे,सीते,पटकन इच्छा माग आणि श्रुतकीर्तीचा हात धर,बघ बाई,तुझी इच्छा पूर्ण होईल,”मांडवी सीतेला खट्याळ स्वरात सांगत होती.सीतेने डोळे मोठे करीत उर्मिलेला खूण केली,तिनं मान डोलावून हो म्हटले.सीतेने श्रीरामाची काल खिडकीतून पाहिलेली प्रतिमा डोळ्यासमोर आणली,श्रुतकीर्ती चे हात हळुवार हातात घेतले,श्रुतकीर्तीने प्रेमाने सीतेचा हात दाबला आणि सगळ्या खुदकन हसल्या.
“श्रुती ताई,खरंच जर तुझ्या जिव्हेवर स्वरस्वती असेल तर आपल्या तिघींचे विवाह,श्रीरामांच्या बंधूंबरोबर झाले तर!!!!”उर्मिलेला सीतेचा विरह इतक्या दिवसात व्यक्त करता आला नव्हता,तिची व्यथा अचानक उघडी झाली.सीतेने मायेने तिला जवळ ओढले.विवाह होणार या कल्पनेने मोहरलेल्या सीतेचे अलीकडे उर्मिलेकडे लक्षच जात नव्हते,ऊर्मिला हल्ली हिरमुसली झाली होती,मातेने कष्टाने समजूत काढून तिचे मन हलके केले होते.
“खरं सांगू,काल उद्यानात फिरताना मी त्या राजकुमाराना एकत्र पाहिलं ,मला त्यांचा हेवा वाटला,विवाह झाला तरी त्यांची ताटातूट होणार नाही,पण आपण मात्र सीतेच्या विवाहानंतर दूर जाणार”,मांडवी,एरवी अबोल असली तरी आज तिला मनातला सल स्वस्थ बसू देत नव्हता.”
श्रुतकीर्ती ने प्रेमाने सर्व भगिनींना जवळ घेतले.”
भगिनींनो,माझ्या जिव्हेवर सरस्वती आहे की नाही,ठाऊक नाही,पण माझी दुर्दम्य इच्छा ईश्वर पूर्ण करतो हे गुपित मी आज तुम्हांला सांगत आहे,उद्या स्वयंवर आहे,श्रीराम शिवधनुष्य उचलतील या बाबत कुणालाही शंका नाही,त्यामुळे राम-सीता विवाह होईल,त्याचवेळी लक्ष्मण-ऊर्मिला,भरत-मांडवी आणि शत्रुघ्न-श्रुतकीर्ती यांचे विवाह होतील,असे स्वप्न मला पडले होते,पाहू दैव काय देते ते”
क्षणभर सगळ्याजणी एकमेकींना पहात राहिल्या,अगदी मनात वरलेल्या राजकुमाराचे नाव श्रुतकीर्ती च्या तोंडातून निघाले होते,श्रुतकीर्ती ने भुवया उंचावून खट्याळ भाव चेहऱ्यावर आणले तशी भानावर येऊन लाजल्या.
“खरं सांगू,विवाह होणार याचा मला आनंद होतोय,पण तात, माता,प्रियजन आणि विशेष म्हणजे तुम्हा तिघींना सोडून जाण्याची कल्पना मला सहन होत नाही.मी रोज शिवशंकराना प्रार्थना करताना आम्हांला एकत्र ठेव,अशी याचना करते.”
“तुझ्या मनासारखं होईल पुत्री,काळजी करू नको,”शंकराच्या मुद्रेत उभी राहून श्रुतकीर्ती म्हणाली.संवाद गंभीर होता तो हलका झाला.
स्वयंवराचा दिवस उजाडला.सर्व राजकुमारी तयार होऊन सीतेमगोमाग दरबारात पोहोचल्या,उर्मिलेने वरमाला सीतेच्या हाती दिली आणि ती मागे जाऊन उभी राहिली. सीतेने एकवार नजर फिरवून दरबार न्याहाळला.श्रीरामांच्या नजरेला नजर मिळताच ती लाजली.तिच्या हातातील वरमाला थरथरली.
जनक नरेशाने पुढे येत सर्व उपस्थितांचे स्वागत केले,सीता स्वयंवराचा पण ऐकवला.एक एक राजा पुढे येत शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करी आणि असफल होत माघारी जाई. सीतेच्या घशाला कोरड पडू लागे, मागे उभी असलेली श्रुतकीर्ती तिला खुणेने धीर देई.श्रीरामांच्या नावाची घोषणा झाली आणि सर्वांनी नजरा सुकुमार,तेजस्वी राजकुमारावर खिळवल्या. सीतेने हळूच पापण्या उचलत त्यांचे दर्शन घेतले आणि नजर पायाशी खिळवली. गुरूंना वंदन करून श्रीराम धनुष्यापाशी आहे,एका हाताने धनुष्य उचलून प्रत्यंचा लावण्यापूर्वीच कडकडाट झाला,धनुष्याचे दोन तुकडे झाले,सर्व दरबारी विस्मयीत होऊन पहात होते.स्वयंवराचा पण पूर्ण करण्यासाठी श्रीरामांनी प्रत्यंचा लावली.सीता एकटक श्रीरामाना बघत राहिली.मागून घातलेल्या श्रुतकीर्ती च्या हाताच्या विळख्याने ती भानावर आली.सीतेने पुढे होत थरथरत्या हाताने श्रीरामाना वरमाला घातली.जनक राजा आपल्या भावाचा कुशध्वजाचा हात घेऊन पुढे आला.राम,सीतेने पुढे होऊन त्यांना चरणस्पर्श केला,
“अयोध्या कुमार,श्रीराम आपण मला आज धन्य केलेत,माझ्या सीतेचे पाणीग्रहण करून मला उपकृत केलेत,अजून एक विनंती करावीशी वाटते”,रामानी प्रश्नार्थक मुद्रेने गुरुजींकडे पाहिले,त्यांनी होकारार्थी मान डोलावली.
“आर्य,जशी सीता तश्याच मला ऊर्मिला,मांडवी आणि श्रुतकीर्ती प्रिय आहेत,त्यांची ताटातूट होऊ नये असे मला आणि कुशध्वजाला वाटते,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न या राजकुमारांशी त्यांचे विवाह व्हावे ही आमची इच्छा आहे.”श्रीरामांच्या चेहऱ्यावर स्मित फुलले,गुरूवर्यांकडे कटाक्ष टाकला,इशारा झाला आणि श्रीरामांनी मान डोलावली.सीतेने श्रुतकीर्ती कडे कटाक्ष टाकला,ती गालात जीभ घालून नेहमीचं खट्याळ हसली.
अयोध्येत चौफेर आनंद होता,चार राजकुमार आपल्या नवोदित स्त्रियांना घेऊन राज्यात परतले होते.राजमार्गावर  प्रजा त्यांचे फुले उधळून,नाचून त्यांचे स्वागत करत होती.श्रुतकीर्ती च्या मागे टूमणे लावून बाकीच्या तिघीनी तिच्या चतुरपणाची गोष्ट ऐकली.पिता कुशध्वज आणि सम्राट जनक यांना आपल्या लाघवी वाणीने समजवून श्रुतकीर्तीने चार राजकुमारांचे विवाह चार राजकुमारीनंबरोबर लावून घेतले होते.अयोध्येत श्रीराम आणि सीता यांचे कौतुक होत होते पण राजकुमारी आणि श्रीराम सोडून बाकी राजकुमार मनातून श्रुतकीर्तीला धन्यवाद देत होते.
दशरथ महाराज्याना श्रीरामाला राज्याभिषेक करून राजा म्हणून पाहण्याची इच्छा होती.प्रजेला श्रीराम सिंहासनावर बसलेले पहायचे होते.श्रुतकीर्तीला काहीतरी अशुभ होण्याची कुणकुण लागत होती.कैकयी महाराणीची दासी,मंथरा हिचं संशयास्पद वागणं श्रुतकीर्तीला खटकत होतं, मंथरा श्रुतकीर्ती समोर आली की नजर चुकवत असे,घाईने रस्ता बदलत असे.महाराणी कैकयीला भेटायला जाताना मंथरा थबकत तिच्या दालनात शिरायची.श्रुतकीर्ती फार जागरूक होती,तिनं शत्रुघ्नला सावध करण्याचा प्रयत्न केलाही होता,पण दुर्दैवाने त्याने गंभीरपणे त्याकडे लक्ष दिले नव्हते.आणि मग जे घडायचं ते घडलं.कैकयीने पूर्वीच्या ‘वर’मागण्याची इच्छा दशरथकडे प्रकट केली.वर मागितला,’भरताला सिंहासन, श्रीरामाला 14 वर्षे वनवास’अयोध्या या अचानक झालेल्या आघाताने हादरली.श्रीरामांनी विलंब न करता राज्य सोडून वनवासात जाण्याची घोषणा केली. तत्पूर्वी आप्त जनांना बोलाविले,
“माझ्या प्रिय जनानो, कैकयी मातेची  आज्ञा मानून मी वनवासी जात आहे,भरता,तू राज्य चालवावेस,लक्ष्मण आणि शत्रुघ्न मदतीला आहेत.सीते तू मोठी स्नुषा म्हणून बाकीच्या राजस्त्रियांना सांभाळ”.
“आर्य,मी पतिव्रता आहे,जिथे माझे स्वामी,तिथे मी”सीतेचे मन वळविण्याचा श्रीरामांचा प्रयत्न विफल झाला.लक्ष्मण म्हणाला,”बंधू,मी तुमची सावली,तुम्ही शरीर,मी तुमची साथ सोडणार नाही.”उर्मिलेला हे ऐकून धक्का बसला,तिच्या मुखातून शब्द फुटेना. भरताने माता कैकईची निर्भत्सना केली.श्रीरामांनी त्याचा राग शांत केला.”तुम्ही माझे वडील,गुरू,सखा आहात, मी सिंहासनावर बसणार नाही,तिथे तुमच्या पादुका रहातील”.श्रुतकीर्ती हे सर्व पहात होती.सर्वात कनिष्ठ भ्रात्याची पत्नी म्हणून श्रीरामाचे श्रुतकीर्ती वर विशेष ममत्व होते.
“श्रुतकीर्ती, तू का काही बोलत नाहीस?”कायम बडबड करणारी,बुद्धिमान श्रुती गप्प पाहून श्रीरामाना आश्चर्य वाटले.
“महाराज,आपण मातृ इच्छा पूर्ण करीत आहात ते पाहून मी धन्य झाले,या कुळात आल्याचा मला अभिमान वाटतो,पण तरीही एक सांगावेसे वाटते…..”
“बोल,पुत्री,तू मला मुलीप्रमाणे आहेस.”श्रीराम उतरले
“तात, आपण क्षत्रिय आहात, आणि क्षत्रिय वानप्रस्थाश्रम आयुष्याच्या उत्तरार्धात जातो,मला वाटते की आपणही ते करावे,म्हणजे वचन ही राहील आणि जनतेचा राजा ही त्यांना परत मिळेल.”श्रुतकीर्तीचे चतुर बोलणे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली.श्रीरामांना तिचे कौतुक वाटले.
“तू म्हणतेस ते खरे आहे पण मी एकवचनी आहे,मातेला शब्द दिला आहे की भरताला राज्य देऊन चौदा वर्षे वनवासात जाईन, तिच्या हयातीत हे वचन मला पूर्ण करावे लागेल.”श्रीरामांच्या बोलण्याने सर्वांच्या आशेला पूर्णविराम मिळाला,अयोध्या दुखः सागरात बुडाली.
श्रीराम आणि सीता वनवासात जाण्याची घटका जवळ आली.सर्व अलंकार,भरजरी वस्त्रे उतरवून श्रीराम दान करीत होते. डोळ्याला लागलेल्या धारा सहन न होऊन भरत,शत्रुघ्न कोपऱ्यात बसले होते,ऊर्मिला लक्ष्मणाने केलेले दुर्लक्ष्य कापऱ्या शरीरात दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत होती.मांडवी  असहाय श्रुतकीर्ती चा हात घट्ट धरून कावऱ्या बावऱ्या नजरेने मान खाली घालून उभ्या भरताकडे पहात स्वतः मान झुकवीत होती.
प्रत्येकाने पुढे होऊन श्रीरामाना,नंतर सीतेचा चरणस्पर्श केला,आशीर्वाद घेतले.श्रुतकीर्ती सर्वात शेवटी पुढे आली,सीतेचा बांध फुटला.ती श्रुतकीर्ती ला मिठीत घेऊन रडू लागली,श्रुतकीर्ती ने आपल्या उत्तरीयाने सीतेचे डोळे पुसले,हातां लपविलेला अबोली चे गजरे सीतेच्या मनगटावर बांधले.अलंकाराशिवाय सीता पाहायची कुणाला सवय नव्हती,पण प्रसंगावधान राखून तिचा वनवासी शृंगार करण्याची कल्पना श्रुतकीर्ती च करू जाणे!सर्वांच्या तोंडून श्रुतकीर्ती साठी गौरवोद्गार निघाले.श्रुतकीर्ती ने वाकून श्रीरामांच्या पायांना स्पर्श केला,नकळत दोन अश्रू त्यांच्या पायावर पडले,त्यांनी श्रुतकीर्ती ला उठवले,तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले.
“तात, मला काही हवे आहे तुमच्याकडून.”
“माग”.
“तुमचे उत्तरेय मला तुमची आठवण म्हणून द्या.”
श्रीरामांनी उत्तरेय खांद्यावरून उतरवून श्रुतकीर्ती च्या हाती दिले,तिने ते मस्तकी लावले.
श्रीराम सीतेसह वनवासाला गेले.मागे सर्व जबाबदारी राजा या नात्याने भरत तर सर्वांना सांभाळणारी स्त्री म्हणून श्रुतकीर्ती ने घेतली. उर्मिलेला धक्क्याने आलेली मरगळ,मांडवी पासून दूर गेलेला भरत,लाडक्या मुलापासून तुटलेला दशरथ,त्याला सांभाळणारी पण स्वतः कोसळणारी कौसल्या ह्या सर्वांची पालक होती श्रुतकीर्ती!!!
ज्या मंथरेमुळे रामायण घडले तिला शिक्षा करण्यासाठी श्रुतकीर्ती,शत्रुघ्न च्या मागे लागली.श्रीरामांनी हे मान्य केले नसते,असे सांगून त्याने अंग काढून घेतले.श्रुतकीर्ती मात्र मंथरेचे कपट विसरली नाही,आपल्या परीने तिला प्रायश्चित्त देण्याचा तिचा निर्णय पक्का होता.
दिवस कधी हळू,कधी भरभर जात होते,दशरथ महाराज पुत्रवियोगाने निवर्तले, काहींना वाटले आता श्रीराम परत येतील,पण तसे झाले नाही.कैकयी सुद्धा स्वतः ला बोल लावून सर्वांची क्षमा मागत फिरू लागली.तिची केविलवाणी अवस्था पाहून एक स्त्री म्हणून श्रुतकीर्ती तिला सांभाळू लागली.मंथरेचे अस्तित्व श्रुतकीर्तीने संपवले.
श्रीरामांचा वनवास संपला.भरत, शत्रुघ्न, ऊर्मिला,मांडवी राज्याच्या वेशीपाशी श्रीरामांचे स्वागत करायला पोहोचल्या,श्रुतकीर्ती घरच्या जेष्ठ ,वयस्कर परिजनांची काळजी घेत थांबली.प्रजेचे डोळे भरून दर्शन झाले तेव्हा कुठे श्रीराम राजवाड्यात आले.सर्व वयस्कराना वंदन करून बंधूगण एकत्र जमले.
“माझ्या प्रिय जनानो,माझ्या खडतर वनवासात तुम्ही मला मोलाची साथ दिलीत,सांगा, मी तुम्हाला काय देऊ?”
“बंधू,तुमच्यजवळ भौतिक सुख का मागावे,आम्हाला तुमच्या चरणाशी जागा द्या.”भरत, शत्रुघ्न एक सुरात म्हणाले.मांडवी आणि उर्मिलेने ही त्यांना साथ दिली.श्रुतकीर्ती शांत उभी होती.
“पुत्री,तू काय हवे ते सांग,शांत राहू नकोस,आजवर वयाने सर्वात लहान असून सगळ्यांची जवाबदारी तू समर्थपणे पेलली आहेस,काय देऊ तुला?”
“तात,आपण आयुष्याच्या ऐन भरात आनंदाने वनवास भोगून इतिहास रचला आहात, या साठी आपले नाव सदैव घेतले जाईल.चौदा वर्षाचा वनवास ज्या वल्कलात आपण सोसलात,ती मला द्यावी,ही माझी मागणी आहे.”सर्वांनी एकमेकांना प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
“ठीक आहे,पण असे का बरे.”
“तात,वनवासात जाताना आपण आपले उत्तरीय मला दिलेत ,आता आपली वल्कले मी मजजवळ ठेवीत आहे.ज्या वेळी आयुष्य उपभोगायचे त्यावेळी वनवासाची आठवण ही राहू दिली पाहिजे,हे मनावर बिंबविण्यासाठी मी हे मागत आहे.”
तिच्या उत्तराने सर्वजण खुश झाले.श्रीराम,सीतेने तिला जवळ घेऊन आशीर्वाद दिला,
“कलियुगात नवरामायण लिहिले जाईल, त्याची नायिका श्रुतकीर्ती असेल”
श्रुतकीर्ती

Leave a Reply

Your email address will not be published.