सन १९०८ साली अमेरिकेतील आंतर्राष्ट्रीय महिला वस्त्र कामगार युनियनच्या १५००० महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने वेतन, मतदानाचे हक्क आदी विषयांवर यशस्वी आंदोलन केले होते, त्याच घटनेचे स्मरण म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. पाश्चिमात्य देश एकविसाव्या शतकात प्रगतीशील असलयाचे कदाचित एक कारण हे देखील असेल की तेथील महिला वर्गास पुरुषांच्या बरोबरीचे हक्क विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच मिळाले होते. आपल्या देशात याच काळी मुलींना शाळेत पाठविले जात नसे, सती, बालविवाह, केशवपन आदी क्रुर प्रकार रुढ होते. आजही देशात आपल्या सरकारला स्त्रीभ्रुण हत्ये विरुध्द जनजागरण करावे लागते ही बाब म्हणजे आपला समाज म्हणुन एक प्रकारचा पराभवच.
स्त्री ही जो पर्यंत सामाजिक, आर्थिक व सर्वच क्षेत्रात स्वातंत्र होत नाही तो पर्यंत आपण स्त्री सबलीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले असे म्हणता येणार नाही. १९९१ नंतर आपल्या देशाने स्वीकारलेले आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे वाढलेला चंगळवाद, ग्रामीण भागात कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांच्या वाढणा-या आत्महत्येचे प्रकार, शहरी भागात नोकरीचे अस्थैर्य आदी कारणामुळे केवळ घरातील पुरुषाच्या आधाराने संसाराचा गाढा ओढण्याचे दिवस आज राहिले नाहीत. त्यामुळे महिला वर्गाने नोकरी किंवा स्वयंरोजगार करणे हे दोनच उपाय उरतात. घरातील जबाबदा-यांमुळे बरेचवेळा इ्च्छा असुनदेखील महिलांना घराबाहेर पडून नोकरी करणे शक्य होत नाही. तर दुसरीकडे स्वतःच्या हिंमतीवर स्वयंरोजगार करण्याचे धाडस ब-याच महिला करत नाहीत. मग यातील ख-या अर्थाने सुवर्णमध्य म्हणजे बचत गट.
बचत गट म्हणजे सामान्यतः १० ते २० लोकांनी / महिलांचा अनौपचारिक समूह, एका निश्चित स्वरुपाचे उद्दीष्ट घेऊन व स्वेच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा / महिलांचा समूह म्हणजेच बचत गट. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने बचत गट आहेत. तरी बचत गटांच्या विषयी अनेक समज, गैरसमज आहेत. बचत गटांच्या मोहिमेची सुरुवात देखील अपघाती रुपातच झाली, बांग्लादेशचे अर्थशास्त्री डॉ.महमूद यूनूस हे जोबरा या खेड्यात गेले असता, त्यांनी पाहिले की तेथील महिला टोपल्या बनवितात, मात्र कच्चा माल घेण्यासाठी या सर्व महिला सावकाराकडून अधिक व्याजदराने कर्ज घेत, टोपल्या विकल्यानंतर, कर्ज फेडल्यावर या महिलांच्या हाती काहीच राहत नसे. डॉ. यूनूस यांनी ४२ महिलांना एकत्र करुन त्यांना त्याकाळाचे ५०० टाका कर्ज म्हणून दिले व हे कर्ज एका महिलेचे नसुन तुमच्या गटाचे आहे असे सांगितले. महिलांनी टोपल्या बनवून विकल्या व त्यांना त्या व्यवहारातून कर्ज फेडल्यावर नफा देखील झाला. याच घटनेनंतर डॉ. महमूद यूनूस यांना सूक्ष्म वित्त व बचत गटांची ताकत दिसली, पुढे याच मोहिमेची परिणिती म्हणजे बांग्लादेशमधील ग्रामीण बॅंक, डॉ. यूनूस यांना या कामासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
बचत गटांची सर्वात मोठी ताकद म्हणजे महिलांचे संघटन बळ वाढते, आपण बरेच वेळा वृत्तपत्रात वाचतो की बचत गटांच्या महिलांनी गावातील दारुचे गुत्ते व इतर अनिष्ट व असामाजिक कामे बंद पाडली, ही या सामान्य महिलांना ताकत येते कुठुन ? तर बचत गटाच्या माध्यमातून वाढलेले संघटन बळातून. या व्यतिरिक्त महिलांना आडीअडचनीच्या वेळेस कमी व्याजदराने उपलब्ध होणारे हक्काचे अर्थसहाय्य. महिला वर्ग व विशेषतः ग्रामीण महिला वर्ग घरा बाहेर पडून नव्या बाबी शिकू लागतात. त्यामूळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला पाहण्यास मिळतो. बॅंकेचे व इतर शासकीय व्यवहार व योजनांची माहिती महिला वर्गास याच बचतगटांच्या मार्गाने मिळते.
आज अनेक बचत गट केवळ बचत करत नसुन त्यापुढे जाऊन यशस्वीरीत्या स्वयंरोजगार करीत आहेत. असे बचत गट पाहण्यात आले आहेत की ज्यांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु केली आहे व आज या गटातील महिला या कंपनीच्या संचालिका आहेत, काही बचत गटांनी आपली बॅंक सुरु केलीय. वार्षिक ०५ कोटीच्या वरची उलाढाल करणारे गट देखील पाहण्यात आले आहेत.
बचत गटाची विभागणी लिंग, वास्तव्य व आर्थिक उत्पन्न आदी बाबींवर होते, याप्रमाणे बचत गटाचे प्रकार म्हणजे महिला बचत गट, पुरुष बचत गट, ग्रामीण बचत गट, शहरी बचत गट व दारिद्र्य रेषेवरील व दारिद्र्य रेषेखालील बचत गट. मिश्र बचत गट, म्हणजे पुरुष व महिला एकत्र असलेले गट बनवू नयेत. मिश्र गटांमधे पुरुषांचे वर्चस्व असते व असे गट बनविण्याची परवानगी देखील मिळत नाही. गटाची नोंदणी करणे बंधनकारक नसते मात्र बॅंकेत बचत गटाच्या नावाने खाते उघडणे आवश्यक असते. गटाची नोंदणी करावयाची असेल तर शहरी विभागात महापालिकेत / नगरपरिषदेत तर ग्रामीण भागात पंचायत समितीच्या कार्यालयात करावे.
बचत गट बनविणे अगदी सोपे आहे. शासनाने जास्तीत जास्त महिला या मोहिमेत सहभागी व्हाव्यात याच उद्देश्याने बचत गटांना कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकविले नाही. बचत गट बनवायचा असेल तर फक्त एका वाडीतील, वस्तीतील किंवा गावातील दहा ते वीस महिलांनचा एक गट बनवावा त्यांना आपली संकल्पना सांगावी, गटास नाव द्यावे, गटाचे नियम बनवावेत, दर महिन्यास गोळा करावयाची रक्कम सर्वानुमते ठरवावी व पदाधिका-यांची निवड करुन ते ठराव पारीत करुन बॅंकेत बचत गटाचे खाते उघडावे. पदाधिका-यांमधे अध्यक्षा, सचिव व खजिनदार ही पद आवश्यक असतात, मात्र काही मोठे गट उपाध्यक्ष, सह सचिव, सच खजिनदार, सल्लागार आदी पद देखील ठेवतात.
एक गोष्ट अगदी आवर्जून सांगाविशी वाटते, ती म्हणजे केवळ काही शासकीय योजनांचा किंवा कर्जयोजनेचा एकवेळ लाभ मिळावा इतक्या संकीर्ण उद्देश्यापोटी बचत गट बनवू नये, बचत गटांची वर नमूद केलेली ताकद लक्षात ठेवावी व गट स्थापन करुन स्वयंरोजगार सुरु करण्याचा प्रयत्न करावा. स्वयंसिध्दा होऊन स्वतःस व इतरांस आपली खरी शक्ती काय आहे याची प्रचिती द्यावी. एक स्त्री जी संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकते तिला हे करणे अजिबात अशक्य नाही. मात्र हे साध्य करण्यास लागेल ती फक्त तुमच्यातील इच्छाशक्ती जी सुप्तावस्थेत आहे, ती जाग्रुत करा, दुरदृष्टी बाळगा, मोठी स्वप्ने पाहा व ती स्वप्ने पुर्ण करण्याची जिद्द निर्माण करा. यश तुमचेच असेल. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई