पूर्वी माहिती असलेल्या कुटुंबात, नातलगात किंवा मध्यस्थांच्या मार्फत मुलगी देण्याचा प्रघात होता. त्यातून मुलगी जवळच्या जवळ दिली जावी, असेही प्रयत्न असत. पुढे शिक्षण, व्यवसाय, नोकरीच्या विविध संधींमुळे गावाकडची तरुण मंडळी शहरांमध्ये स्थिरावली आणि अपवादात्मक दिसणारी स्वतंत्र कुटुंबपद्धती सर्रास अस्तित्वात आली. ‘आयटी’ क्षेत्राने तर कमालच केली. भारतातून परदेशी जाणार्या तरुण-तरुणींचं प्रमाण लक्षात येण्याजोगं वाढलं. म्हणजे इतकं की वधू-वर सूचक मंडळांमध्ये तर या परदेशी स्थळांचा वेगळा विभागच असतो. अर्थातच या मुलांना वधुपिते कायम पसंतीची पावती देतात. इंटरनेटच्या माध्यमातून ही स्थळं सहजपणे माहितीसाठी उपलब्ध होतात. एरवी अनेक चौकश्या करणारे वधुपिते अमेरिकेचं स्थळ पाहिल्यावर मात्र नि:शंकपणो फारशी चौकशी न करताच मुलगी द्यायला तयार होतात, असं लक्षात येतं. किंबहुना इतकी या फॉरेनच्या जावयांची क्रेझ आहे.
माझ्या परिचयामध्ये असलेल्या किंवा समुपदेशनासाठी आलेल्या जोडप्यांमध्ये अनेक परदेशस्थ जोडपी खरोखर सुखानं परदेशामध्ये नांदत आहेत. पण फसलेल्या लग्नांचं प्रमाणही कमी नाही. अर्थातच यात फसवणूक मुलींची झालेली असते आणि कांगावा मुलं करतात. तरीही हे सर्वसाधारण विधान नाही. अपवादात्मक का होईना मुलांचीही फसवणूक झाल्याची उदाहरणं आहेत.
एका परदेशस्थ स्थळाच्या मोहात पडलेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. सुनेत्रा वय वर्ष चोवीस. इंजिनिअर झालेली. वर्ष दीड वर्ष नोकरी झाल्यावर मुलगी लग्नाची झाली म्हणून घरात तिला उजवण्याची घाई सुरू झाली. एकेठिकाणी हुंड्यामुळे लग्न फिसकटलेलं म्हणून घरात जास्तच नाराजी अन् अस्वस्थता. दरम्यान, हे स्थळ कळलं. मुलगा अमेरिकेत स्थायिक. भरपूर पगार. उंच, देखणा गोरा. अगदी हवा तस्सा. फक्त एक महिन्यासाठी भारतात आलेल्या सचिनला सुनेत्राचं स्थळ दाखवलं गेलं. सुनेत्रा आणि तिचं कुटुंबीय सचिनचं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या अमेरिकेतल्या वास्तव्याच्या वलयाला इतके भुलले की कोणताही विचार न करता, चौकशी न करता पुढच्या सात दिवसांत लग्न करून मोकळे झाले. लग्नात चांगला आठ दहा लाख रुपये खर्च केला. सुनेत्रा सासरी मुंबईला रवाना झाली. तिथे पंधरा दिवस राहून सचिन एकटाच अमेरिकेला जाणार होता. या पंधरा दिवसांतच सुनेत्राला सचिन परका वाटला. पहिल्या दिवशीपासूनच ‘तू मला आवडत नाहीस. आपण एकमेकांना साजेसे नाही. तू फार बारीक आहेस. तुझ्याबरोबर मजा येत नाही.’ असं सचिन म्हणायला लागला. असं असेल तर मग आपल्याशी यांनी लग्न का केलं हेच सुनेत्राला कळेना. तिला त्या घरातलं वातावरणही खूप कोंदट वाटलं. मुंबईच्या वास्तव्यातल्या या पंधरा दिवसांत सुनेत्रानं स्वयंपाकाची सगळी जबाबदारी उचलली. सासू आणि नणंदेनं त्या कामातून हातच काढून घेतले. या पंधरा दिवसांत ते कुठेही फिरायला गेले नाहीत. ‘मला आई-वडिलांजवळ राहू दे. अमेरिकेत हनिमूनच आहे,’ असंही सचिन म्हणाला. मुळातच समजूतदार असलेल्या सुनेत्रानं हे मान्य केलं. पण त्याला आपल्याबद्दल ओढ वाटत नाही हे तिच्या लगेच लक्षात आलं. नव्या नवलाईचे संबंधही तिला यांत्रिक वाटत होते. प्रेमापेक्षा त्यात गरज किंवा वापराचा भाग दिसत होता. कदाचित सचिन नवीन नातं अजून स्वीकारू शकत नसेल पण सवयीनं होईल सगळं नीट, असा सुनेत्राला विश्वास वाटला.
अमेरिकेला जाताना सचिन आधी एकटाच गेला. नोकरी नसलेल्या आपल्या बायकोच्या हातात एक फुटकी दमडीही न देता तो तिकडे रवाना झाला. पुढे चार महिने तिची मोबाईलची हजारो रुपयांची बिलं तिच्या वडिलांनी भरली. इंटरनेटवर चॅटिंग करतानाही तू मला आवडत नाहीस, शोभत नाहीस, फार घाई केली लग्नाला असं म्हणायचा. अमेरिकेतूनही तो तिच्यावर जरब ठेवून होता. तिचे नातेवाईक घरात आलेले चालत नव्हते. खर्चायला पैसे देत नव्हता. अखेर सुनेत्राही चार महिन्यांनी अमेरिकेला रवाना झाली. तिनं सचिनच्या म्हणण्याप्रमाणे स्वत:ला थोडंसं ग्रुम केलं होतं. वजन वाढवलं होतं. त्यानं अगदी थंडपणे स्वागत केल्यामुळे विमानतळावरच तिचा विरस झाला. तू चांगली दिसत नाहीस, तुझ्याजवळ यावंसं वाटत नाही, तुझे कपडे मोलकरणीसारखे आहेत वगैरे वगैरे. सुनेत्राला आधी बारीक आहेस म्हणून मजा येत नाही, असा म्हणणारा सचिन ‘आता तू जाड झाली आहेस,‘ असं म्हणून घरात कपडे आणि भांडी धुण्याची यंत्र असूनही हातानं धुवायला लावायचा. सुनेत्राची इतर बायकांशी तुलना करणं, त्या बायकांकडे मुद्दाम घाणेरड्या नजरेनं बघणं, तिला हिडीसफिडीस करणं हे सुरूच होतं. त्यानं तिचा मोबाईल बंद करून टाकला. घरातली इंटरनेटची सुविधा बंद केली. बाहेर नेलं तरी कोणाशी बोलू द्यायचा नाही. काही वेगळं खायची इच्छा व्यक्त केली तर तिथेही टोमणे मारायचा. पण ‘आवडत नाही तर तू लग्न का केलंस? आधी तू हे का सांगितलं नाहीस?’ असं विचारल्यावर निरुत्तर व्हायचा. आपलं याच्यावर ओझं नको म्हणून सुनेत्रानं तिथे नोकरी करायला सुरुवात केली. त्यातून मिळालेले दीड लाख रुपये सचिनने स्वत:जवळच ठेवून घेतले आणि अखेर एके दिवशी ‘माझ्या आईची तब्येत बिघडली आहे म्हणून तू देखभालीसाठी जा’ असं सांगून सुनेत्राला परत भारतात पाठवून दिलं. सुनेत्रा तीन वर्षांनी भारतात येत होती, इथे आल्यावर बघते तर तिच्या सासूबाई अगदी ठणठणीत होत्या. हे सगळं नाटक होतं तर, आता तिला सगळा उलगडा झाला. त्याला घटस्फोट हवा होता म्हणून त्यानं तिला पाठवून दिलं होतं. परत एकदा सासूसासर्यांनी त्याची समजूत घालून त्याला हे नातं पुढे न्यायला भाग पाडलं. त्यानं तिथूनच ‘तू भारतात आहेस तोपर्यंत व्यक्तिमत्त्व विकासाचे कोर्सेस कर. मी भारतात आल्यावर तुला बघेन आणि मग ठरवेन तुझ्याबरोबर राहायचं की नाही ते!’ असं सांगितलं. इतक्या अपमानास्पद अटीला सुनेत्रा आणि तिच्या घरचे तयार झाले याचंच नवल वाटतं!
सचिन पुन्हा भारतात आला. या वास्तव्यात ठाण्यात एका मान्यवर संस्थेमध्ये ते दोघंही समुपदेशनाला जात होते. पंधरा दिवस सुनेत्राबरोबर राहून, रोज शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर सचिनने ‘तू मला घटस्फोट कधी देतेस?’ असा प्रश्न सुनेत्राला विचारला! सुनेत्राने अर्थातच नकार दिला आणि ‘या संबंधांनंतर मी जर गरोदर राहिले तर काय?’ असा प्रश्न तिनं केल्यावर ‘गर्भपात करून मिळतात भारतात’ असं सांगून तो अमेरिकेला निघून गेला. सुनेत्राशी त्याने पूर्ण संबंध तोडून टाकला. तोपर्यंत ती सासरीच राहत होती. सचिन घरातल्या लोकांशी फोनवर बोलला तरी तिच्याशी बोलत नसे. नंतर फक्त घटस्फोटासाठीच फोन करायचा. सुनेत्राला खूप शिव्या द्यायचा.
अमेरिकन स्थळाला हुरळलेले सुनेत्राचे आईवडील, लग्नानंतर स्वत:च्या बदलणार्या आयुष्याचा थोडासुद्धा विचार न केलेली सुनेत्रा, जातीतल्या मुलीसाठी अडून बसलेले सचिनचे आईवडील आणि स्वत:च्या विचारांशी ठाम नसलेला अन् म्हणूनच लग्नाला पोरखेळ समजणारा सचिन हे सर्व जण या घटनेमध्ये बरोबरीने भागीदार असले तरीही जबरदस्त किंमत मोजली ती मात्र फक्त सुनेत्रानंच. मानसिक, भावनिक, लैंगिक आणि कौटुंबिक अत्याचाराची सुनेत्रा बळी ठरली.
– लीना कुलकर्णी