कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास निळ्याशार समुद्र किनार्‍यासोबतच थंड हवेची ठिकाणेही लाभली आहेत. सावंतवाडीपासून जवळच समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर असलेले अंबोली हे त्यापैकीच एक.

अंबोली घाटाचा सुंदर व रम्य परिसर घनदाट अरण्य व समुद्राने वेढलेला आहे. तिन्ही ऋतूत सृष्टीच्या विविध रूपांचा साक्षात्कार घडवून पर्यटक व निसर्गप्रेमींना आनंद देणार्‍या मोजक्या ठिकाणात अंबोलीचा समावेश करता येईल. सह्याद्रीचे कडे ढगांना आग्रहाने थांबवत असल्याने येथे विक्रमी पाऊस कोसळतो. परिणामी पावसाळ्यात येथील दर्‍याखोर्‍यातून सगळीकडे शुभ्र तुषार उडवत धबधबे कोसळताना दिसतात.
पर्यटक व तरूणाई धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद अनुभवतात. हिरवेगार डोंगर, वाहणारे निर्झर व धबधब्यांमुळे निर्माण होणारे चैतन्य पर्यटकांना साद घालतात. उन्हाळ्यातही येथील वातावरण आल्हाददायक असते. सावंतवाडीकडून अंबोलीकडे कूच करतानाच येथील निसर्गसौदर्याची साक्ष पटते. शिवाय जैवविविधतेचा शालू पांघरलेल्या हिरव्यागार टेकड्यांची अभ्यासकांनाही भूल पडते.
हिवाळ्यातही येथील दर्‍याखोर्‍यातून मुक्तपणे भटकत सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यातील आनंद निव्वळ अवर्णनीय. महादेवगड, मनोहरगड, श्रीरगावंकर पॉईंट या कड्यांवरून विस्तीर्ण पसरलेल्या दर्‍याखोर्‍या पाहताना विलोभनीय आनंद मिळतो. सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य तर अक्षरशः वेड़ लावते. क्षितिजास नारंगी, लाल व गुलाबी रंगछटांची आभा देत सूर्य अस्ताला जातो.
निसर्गप्रेमीशिवाय साहसी व अभ्यासू पर्यटकांनाही अंबोली निराश करत नाही. ह्या भागास धार्मिक महात्म्यही लाभले आहे. हिरण्यकेशी ह्या भगवान ‍शंकराच्या पवि‍त्र स्थानी महाशिवरात्रीस हजारो भाविक भेट देतात. येथून हिरण्यकेशी नदी उगम पावून संपूर्ण परिसरास हिरवाईचे लेणे देते.
येथील नदीच्या खोर्‍यात भटकत तासनतांस मासेमारीचा आनंदही अनुभवता येतो. शिवलिंगास लागून साहसी पर्यटकांना आव्हान देणारी तीनशे मीटर रूंदीची गुहाही येथे आहे. अंगावर शहारेआणणारा काळोख, चावणारे डास, रक्त शोषणाऱ्या जळवा व जीव गुदमरवणारी कोदंट हवा यासारखी आव्हाने झेलून मार्ग काढावा लागतो. गुफेत सात डबकी आहेत.
शेवटच्या डबक्यात सूर्याचे दर्शन घडते. हेही एक आश्चर्यच. मात्र, त्या उजेडाच्या रहस्यावर अद्यापपर्यंत रहस्याचे आवरण आहे. अंबोलीत ऐतिहासिक व समृद्ध बॉटॅनिकल गार्डनही आहे. मित्र किंवा कुटुंबीयांसोबत मुक्तपणे येथील जंगलात भटकत जैवविवधतेच्या निरीक्षणाचा अनुभवही अतुलनीय आहे. भटकंतीमुळे थकल्यावर वनभोजन घेऊन ही भेट अविस्मरणीय करता येते. येथे राहण्याचीही सोय आहे. विविध हॉटेल्स आहेत. शिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहायची सोयही आहे.
जाण्याचा मार्ग : मुंबईपासून अंबोली घाटाचे अंतर सुमारे साडेपाचशे किलोमीटर आहे. मुंबईहून येथे बस व रेल्वेनेही पोहचता येते. सावंतवाडीहून अंबोली अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. कोकण रेल्वेने आपणांस सावंतवाडीस पोहचता येते. कोल्हापूरहून हे ठिकाण चार तासांच्या अंतरावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.