आध्यात्मिक
नारायण सूर्याजीपंत ठोसर या नावाच्या मुलाचे लग्न ठरले होते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे मुलगा दहा-बारा वर्षांचा होता. लग्नाचे विधी सुरू झाले. मुलासमोर अंतरपाट धरला गेला. मुलीला आणून उभे केले. मंगलाष्टके सुरु झाली आणि मंगलाष्टकातील ‘शुभमंगल सावधान’ हे शब्द ऐकताच तो बारा वर्षांचा मुलगा एकदम ‘सावध’ झाला आणि या भरल्या लग्नमंडपातूनच त्याने धूम ठोकली. त्याला सांसारिक प्रपंचात रस नव्हता. विश्वाचा प्रपंच आपण करावा, अशी ओढ त्याला अगदी कोवळ्या बालपणातच लागलेली होती. या ओढीने त्याला लग्नमंडपातून खेचून नेले. त्याच्या हातून तपश्चर्या घडली. अनुष्ठाने घडली आणि तो मुलगा श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणून जगाला ज्ञात झाला.
विवाहमंडपात ऐकलेले ‘सावधान’ हे शब्द अवधान म्हणजे लक्ष आणि सावधान म्हणजे लक्षपूर्वक हा अर्थ त्याने मनाच्या गाभार्‍यात इतका जपून ठेवला की सावधानतेची शिकवणूक आयुष्यभर विविध प्रसंगी या मुलाने महाराष्ट्राला दिली. ‘सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळ मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले नवजे’ मोक्ष मिळवावयाचा असेल तर, सावध, साक्षेपी आणि दक्ष राहाणे आवश्यक आहे. हे समर्थ परखडपणे सांगतात. ‘सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयाशी साधन सायास करणेचि न लगे’ असा समर्थांचा स्वानुभवपूर्ण निर्वाळा आहे. समर्थ स्वत: तर सावधानपणे वागलेच पण या महाराष्ट्रालाही त्यांनी सावधानतेचा मंत्र दिला.
समर्थानी रूढ अर्थाने संसाराचा त्याग केला होता. पण त्यांच्याजवळ जी कुबडी होती तिच्यात गुप्ती दडवलेली असे. ही त्यांच्या अखंड सावधानतेची एक प्रकारे निशाणी होय आणि त्यांचे हे सावधानपण सगळ्या ठिकाणी होते. खबरदारी आणि वेगी तेणे सामर्थ्य चढे अंगी असा उपदेश समर्थांनी केला आहे. आणि ‘इशारतीचे बोलू नये बोलायाचे लिहू नये लिहावयाचे सांगू नये जबाबीनें असे व्यवहाराचे शाश्वत सूत्रही पुढल्या पिढीसाठी शब्दबद्ध करून ठेवले आहे. प्रपंचातही हे सावधानपण किती आवश्यक असते ते सांगताना समर्थ म्हणतात, सावधानपणे प्रपंच केला तेणें सुखचि पावला दीर्घ प्रयत्ने मांडला कार्यभाग साधे आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा असा नव्या पिढीला आदेश देतांना ‘विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाचि करणे’ या शब्दात सावधपणे वागण्याची आवश्यकता समर्थांनी प्रतिपादिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाल्यानंतर समर्थांनी संभाजी महाराजांना ज्या पत्राद्वारे उपदेश केला त्या पत्राचा प्रारंभच मुळी ‘अखंड सावधान असावें दुश्चित कदापि नसावें तजवीजा करीत बसावें एकंत स्थळीं’ ‘अखंड सावधान असावे’ असा सल्ला किंवा उपदेश जो समर्थांनी दिला होता तो दुर्लक्षित झाल्यामुळेच की काय संभाजी महाराजांना एका दुष्ट कारस्थानाला बळी पडावे लागले आणि या तडफदार, शूर आणि कर्तबगार राजाला महाराष्ट्राला मुकावे लागले.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Leave a Reply

Your email address will not be published.