एका शब्दात किती सामर्थ्य दडलेले आहे. भारदस्त असा हा शब्द आधारस्तंभ. क्षीण झालेल्या मनाला ताजेतवाने करणारा, खचून गेलेल्यांना उचलून उभे करणारा आधार जेव्हा कोणाला मिळतो तेव्हा त्यांचे आयुष्यच बदलून जाते. घाबरू नका मी आहे ना? असे शब्द कानावर पडतात तेव्हा हृदयातील एक गोड संवेदना जागृत होते. डोळे त्या दिशेला अधीरतेने, आतुरतेने टक लावून बसतात. कोमेजलेल्या मनाला आणि तनाला एक जोर येतो. प्राणवायूचे काम करतात हे शब्द. लहान असतो तेव्हा आई-वडिलांच्या हाताचा किती आधार असतो? संकटकाळी ढाल बनून उभी असतात आपल्या पाठी, दुःखाचे सर्व क्षण आपल्या वर घेऊन आई-वडील आपल्याला किती जपतात. लहान बहीण भावाला आपल्या मोठ्या ताई दादाचा आधार असाच मोलाचा असतो. श्री स्वामी समर्थांचे ” भिऊ नको मी पाठीशी आहे” हे वाक्य किती आधार देऊन जाते. प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न असतो.

आपण काही झाले की देवाचा धावा करतो कारण देवाची कृपा अपरंपार असते. मनापासून धावा केला की देव पावतोच. हाच जीवनाचा आधारस्तंभ असतो. जो आपले जीवन सुखकर करतो, आपल्याला वादळ वाऱ्यापासून वाचवतो, सुखाचे दिवस दाखवतो. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणारे सैनिक देशाचे आधारस्तंभ आहेत. देशाला समृद्ध बनवणारा प्रत्येकजण देशाचा आधारच असतो. अनाथालय, वृद्धाश्रम यांचे आधारस्तंभ हे स्वतः धीर गंभीर आणि कडक शिस्तीतील असतात. एका कुटुंबाच्या प्रमुखा प्रमाणे त्यांचे बारीक लक्ष असते. आता काही ठिकाणी अपवाद सापडतो पण एका चुकीच्या व्यक्तीसाठी सर्वच तसे असतील असे नाही. वाऱ्यावर सोडलेल्या मुलांना अचूक मार्ग दाखवणे, त्यांच्या वैयक्तिक उत्कर्ष यावर भर देऊन प्रशिक्षण देणे, आई-वडिलांचे प्रेम देणे, घराची उब देणे असे अमूल्य योगदान आधार स्तंभां कडून मिळते. रिटायर्ड माणसाला जसा पेन्शन हा आधारस्तंभ वाटतो ते यथार्थ आहे. शरीराच्या बदलत्या कार्य क्षमतेमुळे उतारवयात नोकरीची समाप्ती आली की प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनची किती आतुरतेने वाट पाहत असतो. सरकारने दिलेले हे आधार सर्वांनाच मिळतात असे नाही. याचे कारण सर्वापर्यंत  या योजना किंवा लाभार्थ्यांच्या गोष्टी पोचतच नाही. मग ज्यांना माहीत असते त्यांना त्याचा लाभ होतो पण वंचित ते वंचितच राहतात. यासाठी जनजागृतीची गरज आहे. प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क आहे आणि त्या जगण्यासाठी लढण्याचा पण हक्क आहे. मला माहित असलेली माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. आपण अशा उपेक्षितांचे आधारस्तंभ झाले पाहिजे. तुम्हाला काय वाटते?…..

सांगा हा… भेटूया पुढच्या लेखात………

धन्यवाद
लेखिका : सौ.साधना अणवेकर

Leave a Reply

Your email address will not be published.